शुक्रवार, ३० जानेवारी, २०१५

घोळ.

  घोळ
म्हणतात असं
गोष्टीची प्रत्येक
असे एक वेळ.
त्यावेळी वेळीच
साधायला हवा  
अचूक तो मेळ.
पस्तावणे हाती
निसटल्यानंतर
तो क्षण ती वेळ.
बसलो घालत
नुसताच घोळ
जीवनाचा खेळ!

.....प्रल्हाद दुधाळ.

मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

नको ग!

     नको ग!
शब्दांना इतकी धार नको ग!
असे जिव्हारी वार नको ग!
बोल बोल मनातले सारे,  
उगाच असा भार नको ग!
सारे विसरू रुसवे फुगवे,
प्रेमात व्यवहार नको ग!
रोखठोक मामला असावा,
मिटवू तो उधार नको ग!
होती शपथ जन्मोजन्मीची,
अर्ध्यातून माघार नको ग!
सुटे संवादातून समस्या,  
राग तुझ्यावर स्वार नको ग!
साकारले रेखाटले स्वप्न,
वेठीला घरदार नको ग!
            ....प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, २१ जानेवारी, २०१५

हे कविते...

.....हे कविते...
हे कविते...
तू माझा शब्द ...
तू माझी प्रेरणा...
तू मनातली भावना...
तू माझे जीवनगाणे...
तू देते जगण्याचे बहाणे...
तू माझी वेदना वा आनंद...
तू माझा जीवापाड जपलेला छंद...
तू आधार मम जीवनाचा....
तू श्वास,प्राणवायू माझा....
उरेल केवळ निर्जीव कलेवर...
जीवनातून या तुला वजा केल्यावर!
             .....प्रल्हाद दुधाळ.


...तुला वजा केल्यावर....

.....तुला वजा केल्यावर....
उमजत नाही,समजत नाही,
असेल कसा तो भविष्यकाळ?
पुढ्यात काय असेल वाढलेले,
तुटली जर वर्तमानाशी नाळ?
अजुनही होते हे मन कातर,
आठवता भेट पहिली वहिली!
 सात जन्माच्या शपथा हळव्या,
 झालेली वाट एक ही आपुली!
 संसारवेल बहरली फुललेली,
अन स्वप्ने सगळी साकारलेली!
आठवते आयुष्याच्या सायंकाली,
सुख दु:खातली वाट चाललेली!
भयभीत मी, होईल काय माझे,
अर्ध्यावरती साथ सुटल्यावर?
असेल कसले जीवन सखये,
माझ्यातुन तुला वजा केल्यावर?
        ....प्रल्हाद दुधाळ.

रविवार, १८ जानेवारी, २०१५

परवड.

        परवड.
वेळच नाही खूप असते गडबड!
असली आवड तरी मिळेना सवड!
व्यायाम योगासाठी काढू कोठून वेळ,
बसून खुर्चीत शरीर झालं बोजड!
निवांतपणे जेवण नशिबात कुठे?
पिझ्झा बर्गरने भागते भुकेची नड!
बोलायला बसायला उसंतच नाही
हौसे मौजेला घालतो कायम मुरड!
घोड्यासारख रेसच्या धावतोय सदा,
लढाईत जगण्याच्या आयुष्याची परवड!   

           .... © प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, १४ जानेवारी, २०१५

.... नुसतच कविता लिहिणं!....

.... नुसतच कविता लिहिणं!....
 प्रेमाच्या ना चार गुजगोष्टी,
तिऱ्हाइतासारख वागणं,
हरवून सदा आत्मभान,
नुसतच कविता लिहिणं!
नाही बरोबरीने फिरणं,
सिनेमा नाटकाचं नाव नाही,
स्वत:शीच ते गुणगुणन,
नुसतच कविता लिहिणं!
आहेच सख्याचा अभिमान,
संवेदनशील हळुवार मन,  
कल्पनेत  कायम रमणं,
नुसतच कविता लिहिणं!
चंद्र तारे त्याच्या सोबतीला,
गुंफलेली हाती शब्दमाला,
नाही ते शब्दाना वेडावणं,
नुसतच कविता लिहिणं!
वाटे सदा लाभावी संगत,
जीवन व्हावं सुंदर गाणं,
जगावं विसरून देहभान,
नुसतच कविता लिहिणं!
      ..........प्रल्हाद दुधाळ.



  

रविवार, ११ जानेवारी, २०१५

सत्य.

सत्य.
कुणीतरी शोधा सांगीतले म्हणुन,
सुरू झाला आहे सत्याचा धांडोळा! 
सत्यशोधन ते तेव्हढ नाहीच सोप्पे,
असू शकते कल्पनेहून सुंदर मनमोहक 
सत्य कटू असते,कधी पचवायला जडही,
सत्य त्रासदायक,असू शकते भेसूर भीतीदायक ,
कित्येकानी आपले अवघे आयुष्यही वेचले,
पण नाहीच लागलेला कधी शोध सत्त्याचा!
जेव्हढी डोकी,तेव्हढीच मतेही वेगवेगळी,
सोडावा का अर्ध्यातच हा सुरू केलेला वेडा शोध?
पण मग काय आणि कसे असेल ते सत्य,
आपणही अडाणीच?खुलासा होणारच नाही का?
नाही,नाही! ते शोधायलाच हवे.... कुणीतरी...
थांबवुन कसे चालेल हा शोध अधांतरीच?
शोध चालूच आहे-त्या सत्याचा युगानयुगे!
ज्याला जसे सापडले तेच सत्य असे तो मानतोय!
माझे तेच सत्य,तुला मिळालेले असत्य,आरोप प्रत्यारोप!
खरखुर सत्य मात्र सर्वाना हुलकावणी देवून तटस्थ!
मजा घेत आहे, माणसातल्या अडाणीपणाची,
सत्त्याचा शोध अविरत चालूच आहे इकडे तिकडे,
चालूच राहील तो,कारण ते आहे अतर्क्य दडलेय खोल,
शोध घेणाऱ्या त्या असंख्य माणसांच्या अंतर्मनात!
                    ............. प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, ८ जानेवारी, २०१५

कविता लिहिणं.

कविता लिहिणं.
ते नसतात काही पोकळ शब्द,
ओळ एक एक गुंफलेली असते, 
वास्तव वा कल्पनांच्या भरारीवर. 
एक एक अनुभव गुंफावा लागतो, 
जगावा लागतो पराकायेत प्रवेशून,
मांडायची असते घालमेल मनाची,
साधायचा असतो संवाद स्वत:शी,
मांडणे असते रोष व्यवस्थेवरचा,
असते समजूत घालणे स्वत:चीच.
असतो कधी उपदेशाचा अभिनवेश,
करायचा असतो भावनांचा निचरा,
सांगायचं असत अव्यक्त साठलेलं,
केवळ शब्दांचेच खेळ नसतातच ते,
ते नसतच नुसतंच कविता लिहिणं!
उद्गार तो भावनांचा,शब्दापलीकडच्या,
नकळत व्यक्त झालेला शब्दांमध्येच!
.........प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, ५ जानेवारी, २०१५

मागणे.

मागणे.
पावलोपावली लागे, पुन्हा पुन्हा ठेच,
आताशा मला पडती,नवे नवे पेच!
सुटला गुंता म्हणत, घेतो जरा श्वास,
उभे ठाकते संकट,म्हणे दत्त तेच! 
पायाशी समृध्दी, ऐश्वर्याची नाही कमी,
दिमतीला सुखे सगळी ,पोट अर्धेच!
रिकामे हात होते,आलो जन्मास जेंव्हा, 
म्हणतात शेवटी, राहती रिकामेच!
नको जीवनी आता,अभिलाषा कशाची,
व्हावे जगणे गाणे ,मागणे एवढेच! 
..........प्रल्हाद दुधाळ