बुधवार, ३० मार्च, २०१६

कायापालट.

कायापालट -

अक्षरशत्रू समाजात
दोन घास मिळण्याची जेथे भ्रांत
गावंढ्या आडवळणी गावात
शिकून कुणाच भल झाल्याची
गंधवार्ताही नसलेल्या माणसांत
जन्म घेतलेला मी .....
दारिद्र्याचा कलंक कपाळी
वर्षानुवर्षे अश्वथाम्याच्या जखमेसारखा!
पण हे सगळे .....
तुला भेटण्याच्याआधी.....
अपघातानेच  झाली अक्षरओळख.....
त्यानंतर तू  भेटलास ...
भेटत राहीलास ...
तुझ्या सहवासाची चटकच लागली
तहानभूक विसरून तुझ्यात रमू लागलो
तुझ्यामुळेच ज्ञानभांडार झाले खुले
एकामागोमाग एक ....
 ......तुला वाचत राहीलो
लालसा ज्ञानाची भागवत राहीलो
तुझ्यामुळेच प्रगतीचा रस्ता दिसला
चालत राहीलो तुझ्या साथीने
आयुष्यात एक एक पायरी चढत राहीलो
हे असच चालत राहील ...
अविरतपणे!
  --्--    प्रल्हाद  दुधाळ

सोमवार, २८ मार्च, २०१६

बदल

बदल ....
संध्याकाळी-
नटून थटून मी खिडकीत ...
पोटाच्या  टिचभर खळगीसाठी
करत होते प्रदर्शन .....
उघड्या वाघड्या शरीराचे ....
चार दोन नोटांच्या कागदांसाठी
चुरगाळले जात होते आस्तीत्व .....
कलेवर  धुगधुगते श्वासापुरते ...
ढकलत होते एक एक दिवस
तुला भेटण्याच्या आधी....
कित्येक  अशा काळरात्रीनंतर ....
तू  दिली माणूसपणाची जाणीव
स्रीत्वाचा केलास सन्मान ....
दिलास अधिकार -नावाचा... कुंकवाचा
- आता जीवनाच सोने झाले आहे
- तुझ्यामुळे ...
केवळ तुझ्यामुळेच!
- -  प्रल्हाद  दुधाळ.

तुझ्यामुळे

तुझ्यामुळे-
तू भेटण्या आधी
मी सृष्टीसौंदर्यात हरवून जायचो
पावसात मनसोक्त भिजायचो
कोकिळेच्या आवाजात हरवायचो
वसंताच्या चाहूलीने मोहरायचो
गायचो नाचायचोसुध्दा
तू भेटल्यानंतर मात्र
जळी स्थळी काष्ठी पाषाणी
सर्वत्र फक्त तुच दिसते
खाणे पिणे झोपणे हरवून गेलय
हसू नको अशी ......
चेष्टा नाही...... हे खरे आहे !
हे सगळ तुझ्यामुळे ......खरच .....
---  प्रल्हाद दुधाळ.

शनिवार, २६ मार्च, २०१६

मी .....


मी -
आस्तित्व मम स्वतंत्र
होते एकदम साधी....
नव्हते किंतु परंतु
मी तुला भेटण्या आधी....
जीवन हे बदलले
मम जीवनी तू आला ....
झाले फुल हे  कळीचे
श्वासाचा अर्थ कळाला....
बोल तुझे रे गोजिरे
मनात फुलले तारे....
प्रेमात विरघळता
ह्रदयी भरले वारे....
आता नकोच भीती
ओलांडू  त्या खोट्या भींती....
हाती हात तो मिळता
लाभेल अनोखी शांती....
     प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, २५ मार्च, २०१६

भेटीआधी


भेटी आधी --
मी मुक्त पक्षी स्वछंदी
तारूण्याची मस्ती धुंदी
बेलगाम होते विहरणे
दिशाहीन अवघे जगणे
अनुभवली माणसे कैक
तारूण्याचा होता कैफ
फुलाफुलातुन हुंडरलो
काट्यानी जखमी झालो
आयुष्य असे जीवघेणे
होते दीनवाणे जगणे
मग भेट तुझी अवचित
जडली ती अनोखी प्रीत
स्वाधीन तुझ्या मी झालो
स्वर्गसुखात अवघा न्हालो
मागे वळून आता बघताना
जड जाते मज ओळखताना
 होतो  पुरा दुर्दैवी अभागी
मी  तसा तुला भेटण्याआधी
   --्---्-- प्रल्हाद दुधाळ .

बुधवार, २३ मार्च, २०१६

तुला भेटण्याआधी!

तुला भेटण्याआधी!

माणूस कामसू होतो
कसा जंजाळी फसलो
नव्हतो असा स्वच्छंदी
तुला भेटण्याच्या आधी!

नसतो आता मी माझा
मनी सदा हुरहुर
नव्हते असे काहूर
तुला भेटण्याच्या आधी!

नुरले कसले भान
प्रीतीचा लागला बाण
सावध शिकारी होतो
तुला भेटण्याच्या आधी!

प्रेमात आंधळा झालो
विरहाने तळमळलो
मी भलता मानी होतो
तुला भेटण्याच्या आधी!

संगे जीवन फुलते
तुजसवे मन गाते
इतका वेडा नव्हतो
तुला भेटण्याच्या आधी!

.......प्रल्हाद दुधाळ.