सोमवार, १४ मे, २०१८

सेलिब्रेशन...

सेलिब्रेशन...
पोटचा पोरगा 
नटवलेल्या बायको आणि पोरांना घेऊन
मिठाईचं खोकं घेऊन 
सक्काळी सकाळी 
आश्रमाच्या गेटवर आला तेव्हा
तिच्या सुरकुतलेल्या चेहर्यावर
खूप दिवसांनी मोकळढाकळं
हास्य ओसंडलं
भराभर उरकून
ठेवणीतलं लुगडं नेसून
थरथरते पाय सावरत
उभी्.....
आज कित्येक दिवसांनंतर
नातवंड गळ्यात पडणार होती....
तिला माहीत होतं...
आता मोबाईल सरसावतील
अंगाखांद्यावर सलगीने रेलून
मिठाईचा मोठा तुकडा
तोंडात कोंबता कोंबता
होईल फोटोंची लयलूट
उद्या झळकतील
सोशल मिडियावर...
तिने झटकले मनातले विचार ..
मनोमन...
हात जोडले गोर्या साहेबाला...
मदर्स डे
एक निमित्त...
पाडसांना कुरवाळण्याचं
कोंडलेल्या वात्सल्याला
वाट करून द्यायचं...
आता तिचा उत्साह दुणावला...
सज्ज आता ती....
मदर्स डे
सेलिब्रेशनसाठी....
...... प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा