गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

आवर....

आवर....
नतमस्तक एकदा बघ होवून
सारा जाईल दुराभिमान गळून

झुकवून बघ एकदा ताठ नजर  
पाषाणालाही मग फुटेल पाझर 

दातांना बघ विसावा देउन
तब्बेत कशी मग जाते सुखावून

सदैव हात असूदे कामात   
समृद्धी आपसुक लोळेल पायात

जिभेवर असावा प्रखर अंकुश
सदैव रहाशील मस्तीत अन खुश

इच्छांना थोडासा घाल आवर  
आनंद तो मग लाभेल आयुष्यभर
          ..... प्रल्हाद दुधाळ    

बुधवार, १० जानेवारी, २०१८

वार्धक्य...

वार्धक्य...
वयाचे दुखणे,बडबड वाढे,
कडूजार काढे,पिणे आले!

व्हावे स्थितप्रज्ञ,खुपसणे नाक,
सवय ही टाक,आता तू रे!

बोल मोजकेच,कशास पाल्हाळ,
गोष्टीचा वेल्हाळ,होवू नको!

अनुभव तुझे,तुझ्याशी रहावे,
विचारले द्यावे,सल्ला मंत्र!

अति तो उत्साह,करतो रे घात
नको तेथे मत,तुझे नको!

तब्बेत जपावी,पचेल ते खावे,
मर्यादेत –हावे,पाळ पथ्य!

वार्धक्य आनंदी, जर वाटे व्हावे,
विचारी वागावे,ध्यानी ठेव!

उमेदीच्या काळी, केलेस तू कष्ट,
आता ऐक स्पष्ट, सांगती ते!

प्रियजनांसाठी, नको अडचण,
घट्ट कर मन, स्वत:साठी!

अंगीकार आता, जप तप ध्यान,
अध्यात्मात मन, रमावे ते!

आयुष्याची नौका,पैलतीरा जावी,
शांततेत गावी,भैरवी ती!
      .... प्रल्हाद दुधाळ    


सोमवार, ८ जानेवारी, २०१८

शिल्पकार...

शिल्पकार...

विचार एकदा रे तुला स्वत:ला,
काय कारण खर तुझ्या दु:खाला?

भूतकाळाचा झालास का गुलाम?
स्वप्नांना तुझ्या घालतोस लगाम!

आले कधी एखाददुसरे विघ्न,
समजायचं का भंगले ते स्वप्न?

माघार घेतो विचारात गुंतून,
समजावणार स्वत:ला निक्षून?

हार-जीत तुझी,जबाबदार तू,
आहेस जीवनाचा शिल्पकार तू!
     ..... प्रल्हाद दुधाळ.


   

रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

फुले म्हणाली...

फुले म्हणाली...

फुले म्हणाली एकमेका,
चला होउया आपण कलिका.
अपूर्णतेत सुंदरता वसते,
फुलल्यावर ती कोठे उरते?
पुर्णत्वाला ती असुया बोचते,
सौंदर्याला मग नजर लागते.
द्यावा कशास दोष कुणा का?
चला होउया आपण कलिका.
मोठेपणाची दु:खेही मोठी,
कष्ट किती हे जगण्यासाठी?
जीवन का हे अवघड इतके?
कशास उगाच प्रगल्भता येते?
बघा खेळती बागडती बालीका,
चला होउया आपण कलिका.
     ..... प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

सल....

सल....
न बोलताही सल
कळाया पाहिजे
मनातले सारे
आकळाया पाहिजे

आत साठलेले
पोखरते हा देह
तुंबलेले ते आसू
गळाया पाहिजे

पाहताना मागे
छळे गंड आता
गर्वाचा चढा पारा
ढळाया पाहिजे

उभा हा जन्म गेला
तुझ्यामाझ्यावारी
कळले आता सारे
वळाया पाहिजे

रागालोभाच्या सीमा
करू आता पार  
पिळ हा सुंभासह
जळाया पाहिजे
   .... प्रल्हाद दुधाळ.


रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

बेगडी शुभेच्छा...

बेगडी शुभेच्छा....
( हलकेच घ्या)

शुभेच्छा दिल्या वा घेतल्या म्हणून
 नशीब मुळीच बदलत नाही
दिर्घायुष्याच्या दिल्या आशिर्वादाने
अमरत्वही कुणा लाभत नाही

शुभेच्छांचे शब्द जरी हे ओठात
पोटात वेगळच असू शकतं
आजकाल गोड गोड बोलण्यात
मनात जहरही असू शकतं

गुडी गुडीच्या नात्यांना जपायला
शुभेच्छांचं इंधनच येतं कामाला
बेगडी जमान्यात आजकालच्या
महत्व आहे फक्त ते दिखाव्याला

आभासी दुनियेत या आधुनिक
शुभेच्छेसाठीचे निमित्त शोधावे
जिभेवर करून साखरपेरणी
अभिष्टचिंतन करत राहावे

 सद्भावना खरचं असल्या तर
 अव्यक्तपणेही पोहचतातच
जाणीवा त्या समृद्ध असल्या तर
शुभेच्छा सन्मित्रा समजतातच

कळले जरी वळेल असे नाही
जगासारखे वागावेच लागते
मनात असो वा नसो ते तुमच्या
हार्दिक शुभेच्छा म्हणावे लागते
        ..... प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

आई...

आई...
कोंबड आरवायच्या आधीच 
तिने घेतलेली असायची 
डोक्यावर माळव्याची पाटी
चालत रहायची अनवाणी 
नसायची अंधाराची अथवा 
विचूकाट्याची भीती 
मनात एकच ध्यास 
दिवस वर येण्यापूर्वी 
पाटीतला भाजीपाला 
खपायलाच हवा... 
परत धा वाजता 
मजुरीवर पोचायला हवं... 
तिच्या त्या ढोर मेहनतीत 
तिने पेरली होती 
उज्वल भविष्याची स्वप्ने... 
आज ना उद्या या घामावर 
सुखाचे पीक नक्की जोमात बहरेल.....
कधीच ती दिसली नाही हतबल 
पण....
माहीत नाही तिची स्वप्ने 
पूर्णत्वाला गेली की नाही 
सुखदु:खात कायम स्मरते 
माझी सतत राबणारी आई! 
.... प्रल्हाद दुधाळ.