रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

अडगळ

अडगळ...
काय काय जमवून ठेवतो माणूस
पुढं कधीतरी येईल कामाला
 म्हणून ...
 कसली कसली बोचकी बांधत रहातो माणूस ...
 अशी अडगळ...
  दिवसेंदिवस जाते वाढत...
  मनातली आणि घरातली माणसं
  मग जातात अडगळीत...
  माणूस  जातो हरवून
 स्वतःच जमा केलेल्या
 अशा बिन कामाच्या अडगळीत...
 आयुष्य येतं उतरणीला
आणि मग एक दिवस...
  लक्षात येतं ...
 अरे वस्तू जमा करायच्या नादात
 नाही जमा करता आली  आपल्याला...
 चार माणसंही...
  त्या अटळ प्रवासासाठी!
   .... प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८

आता तरी मान रे ...


आता तरी मान रे ....

धावता धावता दमतोस किती
 येवू दे आता वास्तवाचे भान रे
स्वतःसाठी काढ वेळ तू छान रे
आरोग्याकडे आता दे तू  ध्यान रे
    येवू दे आता वास्तवाचे भान रे

चढता पायऱ्या दमछाक होई
व्यायामासाठी तुला वेळ नाही
उद्या उद्या करता वय पुढे जाई
व्याधिमुक्ततेचे रहस्य जाण रे
   येवू दे आता वास्तवाचे भान रे

आहार विहार नियमित योग
तंदुरुस्तीसाठी नियमात वाग
जिभेच्या चोचल्यास हवा लगाम
वय तुझे झाले आता तरी मान रे
   येवू दे आता वास्तवाचे भान रे

किती जमवली जरी तू रे माया
रहाते ती इथेच कष्ट जाती वाया
प्राथमिकता काय आता जाण रे
आनंदी जगण्याचे मोल मान रे
   येवू दे आता वास्तवाचे भान रे
     ...... प्रल्हाद दुधाळ.