रविवार, ३० जुलै, २०१७

श्रावण...

श्रावण.
हिरवाईने सजली धरती,
 गाणी गाती झरे बागडती!
 रिमझिम झरती या धारा,
फुलला रानी मोर पिसारा!
पांघरल्या त्याने ओल्या शाली,
सलज्ज लाली निसर्ग गाली!
आला आला श्रावण आला,
 उत्सव धरतीचा रंगला!
       .... प्रल्हाद दुधाळ.

मंगळवार, १८ जुलै, २०१७

अंतरातले ...

अंतरातले ...
अंतरात खोलवर
काही लपले लपले
कसे करावे उघडे
जीवापाड जे जपले!
कधी कोंडतो हा श्वास
सांभाळू मी कसे किती
झाले कठीण सहणे
हृदयास जे बोचले!
कसे फिरले हे वासे
फिरता हे माझे घर
कुठे कसे व्हावे व्यक्त
बोलू कोठे मनातले!
घडवते जे नियती
असेल का भल्यासाठी
अनुभवण्यास सुख
माणसाच्या जन्मातले!
नाही कोसणार भाग्या
एक क्षण म्हणशील
फेकलेल्या बाणांचेही
कसे येथे हार झाले !
..... प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, १२ जुलै, २०१७

नियती

नियती...
घडणार जे घडायचे
उगाच का ते रडायचे?
बांधले स्वप्नांचे इमले
पडणारे ते पडायचे!
विवेकबुध्दी गहाण ती
भाग्यास का ओरडायचे?
कर्माचे फळ ज्याचे त्याला
वादात का अडकायचे?
कशास कुणा नडायचे?
घडणार जे घडायचे !
 .... प्रल्हाद दुधाळ(पीके)