गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

घुसमट.

 जागतिक पुरूष दिनाच्या निमित्ताने ....

घुसमट .
तू  तर पुरूष आहेस ....
बायकांसारख रडतोस काय ?
बाप्प्यासारखा बाप्प्या  ना रे तू
भावनाशील व्हायचे कामाचे नाय!
कष्ट करायचे, कुटूंबियांसाठी खपायचे
हे तर तुझे कर्तव्यच असते
तू फक्त कणखरपणा दाखव
पुरूषाचे ह्रदय पाषाणाचेच असते!
भावना आत तुझ्या दाबून टाक
फोड डरकाळी जसा की आहेस वाघ
मार एखादा तरी मिशीला ताव
पळपुटेपणाला तुझ्या नाहीच भाव!
अरे पुरूष आहेस ना तू ?
मग मर्दासारखा वागत जा
मुळूमुळू रडायचे बिल्कूल नाय
पुरूषाला कधी कुठे मन असते काय???
                    .....प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०१५

रंगभूमी.

रंगभूमी.
आयुष्य रंगभूमी,जीवन एक नाटक. 
आहेस नाटकातला  तू कलाकार एक.
नाटकाची असे नियती  संहिता लेखिका. 
प्रयोगाचा या दिग्दर्शक साक्षात निर्मिक. 
जशी तुझी भूमिका तशीच वठवायची. 
पदरचे संवाद,प्रसंग नको मुळीच.   
हट्टाने केलास बदल,होईल अनर्थ. 
सामोरे जावे लागेल रोषाला सगळ्यांच्या. 
दिग्दर्शक लेखक आणि प्रेक्षकांच्या. 
बदलून तो जाईल या नाटकाचा अर्थ. 
तेंव्हा दिलेल्या भूमिकेत ओत जीव. 
दिसू दे तुझ्यातले अभिनयाचे कसब. 
अभिनयाने अस्सल मिळूदे समाधान. 
मग लाभेल तुलाही आनंद समाधान. 
वाढेल यश किर्ती पैसा भरपूर मान.
लेखक दिग्दर्शकांच्या गळ्याचा ताईत तू. 
म्हणून म्हणतो तू नकोच उतू वा मातू .
फक्त अभिनय तो होउ दे जीव ओतून. 
दिग्दर्शकाने दिलेल्या तुझ्या भूमिकेत जा. 
एकदा नजरेने या जीवनाकडे पहा!
                    ......प्रल्हाद दुधाळ.

(दि.05/11/2015, मराठी रंगभूमी दिन)

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

शिकवण.

शिकवण.
सहवास अल्पकाळाचा लाभला  
दादा त्यांना आम्ही सारे म्हणायचो.
अनुभवांची शिदोरी दिली मोठी
मर्म जीवनाचे मुखातून ऐकायचो.
अक्षरांची नव्हती त्यांना ओळख 
कमावले खूप व्यवहारज्ञान
माणुसकीचे होते वागणे बोलणे
गावामध्ये मिळायचा मोठा मान.
तरकारीचा होता छोटासा धंदा
कौशल्याने पिकायची अल्प शेती
आयुष्य जरी ते खडतर त्यांचे
पोटापुरती त्यांची कमाई होती.
वास्तवात जगणे होते त्यांचे
वारशात मिळाली ती शिकवण
म्हणायचे बाळा प्रगतीसाठी
घ्यायला हवे भरपूर शिक्षण.
शब्द तळमळीचे प्रमाण मानून
अजून नवे काही शिकतो आहे
त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालून
आनंदाने आयुष्य जगतो आहे.  
         ....प्रल्हाद दुधाळ .
  


रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

बाप

बाप.
चाहूल लागता पितृत्वाची
मन त्याचे हरखून जाते.
एरवीचे कणखर हृदय  
हळुवारपणे हळवे होते.
आगमन आपल्या बाळाचे
आई आत अनुभवत असते
चेहऱ्यावरचे तेज तिच्या
पित्याला सुखावत असते.
आई वेदना सहन करते   
बाहेर तो तळमळत असतो
रडू ऐकून नव शैशवाच
बापाचा अडला श्वास सुटतो.
क्षणोक्षणीची प्रगती पाहून
बाललीलांनी जीव त्याचा थोडा
झुकला न कुणापुढे कधीही
खेळात बापाचा त्या होतो घोडा.
दिवस जातात वर्षे जातात
बाप मुलासाठी खपत रहातो
शिकता शिकता एक दिवस
मुलगा बापापेक्षा शहाणा होतो.
तारुण्याच्या त्या कैफात जेंव्हा  
आईबापाची या वाटते लाज
शब्दांचे होतात खोलवर घाव  
शिव्याशापांचा होतो आवाज.
राजाराणीच्या संसारात आता  
म्हाताऱ्याची या अडचण होते
लज्जालक्तरांचे गाठोडे बांधून  
वृध्दाश्रमात रवानगी होते.
मान्य श्रावणबाळ नव्या युगात
इतिहासजमा झालेला आहे
ज्याने जपले जीवापाड बाळ
संस्कार सारे विसरला आहे!
खाल्ल्या खस्ता इतक्या ज्यांनी
कर त्यांच्यासाठी एवढे फक्त
कधीमधी वेळात वेळ काढून   
दोन शब्द मायेने बोल फक्त.
       ......प्रल्हाद दुधाळ, पुणे (९४२३०१२०२०)  


सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

प्रयत्न.

प्रयत्न.
एकांतात माझी सावली शोधतो आहे.
माझ्याच अंतराशी गूज बोलतो आहे.  
मांडता शब्दात कधी आले न मजला
लिहिले शब्द सत्य उगा खोडतो आहे.
विचार मनास छळती नको नको ते
नाते ते विवेकाशी आज तोडतो आहे.
जड पाठीवरी झाले अपेक्षांचे ओझे
निखळले सांगाडे बळे ओढतो आहे.   
तुटू पाहती जपली हृदयाची नाती  
सांधूनी मनांना ती पुन्हा जोडतो आहे.

         ......प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, १६ सप्टेंबर, २०१५

कर प्रयास!

कर प्रयास!

हार जीत है मामुली बात
महत्वपूर्ण है किया प्रयास
हरदम मुश्किले आयेगी
जीत तुझे मिल जायेगी
खुद पर तू कर विश्वास
जमकर तू कर प्रयास!

समझ खुदको ना कमजोर
हीम्मतसे लगादे पुरा जोर
अपनी शक्ती को ले पहचान
दूर करके अपना अज्ञान
बन जायेगा तू भी खास
जमकर तू कर प्रयास!

मुकाबला कर हर हालातोंका
जज्बात और आंधी तुफानोंका
डरकर कदम कभी ना रोकना
गम अपना तू हसकर सहना
टूट ना देना कभी तू आस
जमकर तू कर प्रयास!

.......प्रल्हाद दुधाळ.



बुधवार, २ सप्टेंबर, २०१५

कारण.

कारण.

असेच हे तसेच का झाले?
भोग असे नशिबी का आले?
घोर मनी निराशा दाटता,
विषण्ण माझ्या मनांत आले!
प्रयत्नात ना कसूर झाले,
तन मन धनही ओतले,
खापर अपयशाचे फुटता,
विषण्ण माझ्या मनांत आले!
मठ मंदिरांचे खेटे झाले,
सत्संग नी कीर्तनही केले,
दैवावर हवाला ठेवता,
विषण्ण माझ्या मनांत आले!
बुद्धीवंत दैववादी झाले,
प्रश्नांचे का असे गुंते झाले?
कल्पनातीत काही घडता,
विषण्ण माझ्या मनांत आले!
असंतुलन धरेचे झाले,
निसर्ग संपदेला लुटले,
तर्कसंगतीची ज्योत पेटता..
विषण्ण माझ्या मनांत आले!
      .....प्रल्हाद दुधाळ.