बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

मायेची गोधडी .

मायेची गोधडी.
नववारी जुन्या साड्या जपून जपून ती ठेवायची,
फाटक्या कपड्यातले डिझाईन कापून जपायची,
रंगीबेरंगी चिंध्या नी काठ शिंप्याकडून आणायची,    
उन तापायला लागल की स्वच्छ धुवून सुकवायची,
फुरसतीच्या दिवशी मोठ्या सुईत दोरा ओवायची,
जमिनीवर कपडे अंथरुन तयार व्हायच डिझाइन!
चौकोन त्रिकोन पक्षांचे आकार व रंगीत बेलबुट्टी,
कल्पनेला फुटायचे पंख,पळायचा धावदोरा सुसाट,
आकाराला यायची आईच्या हातची मायेची गोधडी!
तिच्यात असायची मायेची उब गारठ्यात रक्षणारी,
गुरफटून घेताच गाढ झोप लागायची कुशी सारखी!
आता गोधडी जीर्ण झालीय,तरी जपतोय आठवण!
मन सैरभैर होत जेंव्हा जेंव्हा,शिरतो त्या गोधडीमधे,
मायेचा हात फिरतो  पाठीवरून,मिळते नवी उमेद!
लाखोंच्या आलिशान गादीवर नाही मिळत ते सुख,
मिळते जे माय च्या त्या ओबड धोबड गोधडीतुन !
                          ......प्रल्हाद दुधाळ .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा