मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

गाव माझे.


      गाव माझे.
छोटेसे ते माझे गाव,परिंचे असे त्याचे नाव.
काळीभोर इथे माती,डोले माळव्याची शेती.
इथे कष्टणारे हात,घाम गाळती दिन रात.
वाहे रुद्रगंगा येथे,निसर्गाची जादू न्यारी.
असे कष्टाळूंचे गाव,परिंचे असे त्याचे नाव.
पुर्वेस हरणी महादेव,पश्चिमेस नाथाचा डोंगर,
दक्षिणेस म्हस्कोबाची माया,उत्तर मल्हारी राखण,
वर पुरंदराची छाया,सांगे शिवबाशी नाते,
ऎतहासिक असे गाव,परिंचे असे त्याचे नाव.
दस-याचे शिलांगण,मोठ्या थाटात घडते,
चैत्र वद्य अष्ट्मीस,लग्न देवाचे लागते,
छबिन्याच्या तालावर गाव अवघे नाचते.
भक्ती भावाचे हे गाव,परिंचे असे त्याचे नाव.
इथे  कष्टाची भाकर,मिळूनिया सारे खाती,
गरीबी जरी पाचवीला,महत्व शिकण्यास देती.
ग्यान देते शेतीशाळा,कर्मवीरांचे विद्यालय.
डोंगरात बसे गाव,परिंचे असे त्याचे नाव.
माणसे भांडती तंडती,छोट्या मोठ्या मुद्यासाठी,
चिथावणीस कुणाच्या,भोळी भाबडी फसती.
असे असुनिया सारे,गुण्यागोविंदाने नांदती.
हिरवेगार सदा गाव,परिंचे असे त्याचे नाव.
बालपणचे हुंदाडणे,डोहामधले डुंबणे,
येथे घडलो वाढलो,आधाराने पुढे आलो.
वाटते ती गुढ ओढ,मिळे अनोखा आनंद,
प्रेरणादायी माझे गाव,परिंचे असे त्याचे नाव.
                      प्रल्हाद दुधाळ.
                 ......काही असे काही तसे!