रविवार, ९ एप्रिल, २०१७

एकटा .

एकटा.

वागण्यात तसाही मी नेटकाच होतो!
व्यवहारी जगी मात्र मी करंटाच होतो!
मार्ग दावले नवे घेतले थोरपण,
सांजेस ओसरीला मी धाकटाच होतो!
रांगडा मर्द मावळा मी मस्तीत होतो,
स्पर्धेत नागरांच्या मी नकटाच होतो!
खोट्या प्रतिष्ठेची होती घातलेली झूल,
फुटताच बिंग माझे लटकाच होतो!
कैफात बोललो मी माझा समर्थ आहे,
जाणवले नव्याने मी फुकटाच होतो!
चालतो सग्यांसंगे गैरसमज माझा,
पाहिले वळून जेव्हा एकटाच होतो!
  ..... प्रल्हाद दुधाळ.