सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

प्रतिमा.

प्रतिमा.
लटके जयांवरी रुसावे.
असे कुणी जीवनी असावे.
नर्म विनोदावरही त्याच्या  
लोळत गडबडा हसावे.
कधीतरी त्याने अकारण
शेजारी निशब्दसे बसावे.
हळूवार संवाद साधावा
गुज ते अंतरीचे पुसावे.
ऋणानुबंध असे जुळावे
आस्तित्व एकरूप दिसावे.
   ....प्रल्हाद दुधाळ.


मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

भान.

भान .
सध्याचा जमाना
बोकाळला स्वार्थ
माणुसकी व्यर्थ
झाली आहे.
नाती कुचकामी
मोठा पैसा झाला
कृतघ्नपणाला
भाव आला.
एक एक काडी
बांधले घरास
फुका झिजलास
कुणासाठी?
कोणी नसे तुझे
येता ती संकटे
लढशी एकटे
जेथे तेथे.
आता तरी जाण
अंहकार फोल
जीवनाचे मोल
खरे काय?
सोड मोह माया
सजव हे क्षण
आनंदाचे भान
ठेव सदा.
   .....प्रल्हाद दुधाळ.

शनिवार, २१ नोव्हेंबर, २०१५

उपदेश.

उपदेश .
गोत्यामधे येतो
उच्चारता काही
अर्थ काहीबाही
काढती ते.
बोलणेच आता
होतो आहे गुन्हा
शब्द तेच पुन्हा
वैरी होती.
वाचा ही असोनी
होत आहे मुका
त्याच त्याच चुका
कशापायी?
कशासाठी देवा
बुध्दी अशी दिली
गहाण ठेवली
स्वार्थापायी.
वावगे दिसता
कर डोळेझाक
घुसू नये नाक
नको तेथे.
येवू दे मुखात
शब्द फक्त गोड
होतील ते लाड
जगात या.
.....प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

घुसमट.

 जागतिक पुरूष दिनाच्या निमित्ताने ....

घुसमट .
तू  तर पुरूष आहेस ....
बायकांसारख रडतोस काय ?
बाप्प्यासारखा बाप्प्या  ना रे तू
भावनाशील व्हायचे कामाचे नाय!
कष्ट करायचे, कुटूंबियांसाठी खपायचे
हे तर तुझे कर्तव्यच असते
तू फक्त कणखरपणा दाखव
पुरूषाचे ह्रदय पाषाणाचेच असते!
भावना आत तुझ्या दाबून टाक
फोड डरकाळी जसा की आहेस वाघ
मार एखादा तरी मिशीला ताव
पळपुटेपणाला तुझ्या नाहीच भाव!
अरे पुरूष आहेस ना तू ?
मग मर्दासारखा वागत जा
मुळूमुळू रडायचे बिल्कूल नाय
पुरूषाला कधी कुठे मन असते काय???
                    .....प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०१५

रंगभूमी.

रंगभूमी.
आयुष्य रंगभूमी,जीवन एक नाटक. 
आहेस नाटकातला  तू कलाकार एक.
नाटकाची असे नियती  संहिता लेखिका. 
प्रयोगाचा या दिग्दर्शक साक्षात निर्मिक. 
जशी तुझी भूमिका तशीच वठवायची. 
पदरचे संवाद,प्रसंग नको मुळीच.   
हट्टाने केलास बदल,होईल अनर्थ. 
सामोरे जावे लागेल रोषाला सगळ्यांच्या. 
दिग्दर्शक लेखक आणि प्रेक्षकांच्या. 
बदलून तो जाईल या नाटकाचा अर्थ. 
तेंव्हा दिलेल्या भूमिकेत ओत जीव. 
दिसू दे तुझ्यातले अभिनयाचे कसब. 
अभिनयाने अस्सल मिळूदे समाधान. 
मग लाभेल तुलाही आनंद समाधान. 
वाढेल यश किर्ती पैसा भरपूर मान.
लेखक दिग्दर्शकांच्या गळ्याचा ताईत तू. 
म्हणून म्हणतो तू नकोच उतू वा मातू .
फक्त अभिनय तो होउ दे जीव ओतून. 
दिग्दर्शकाने दिलेल्या तुझ्या भूमिकेत जा. 
एकदा नजरेने या जीवनाकडे पहा!
                    ......प्रल्हाद दुधाळ.

(दि.05/11/2015, मराठी रंगभूमी दिन)