मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५

कहाण्या.

कहाण्या.
कधी कोरडा दुष्काळ
येतो कधी ओला काळ
वाढे व्याजावर व्याज
दारी सावकारी मागण्या!
होते वांझोटी पेरणी
सारे कधी जाते वाहुनी
पोसावे कसे परिवारा
लेकरांस केविलवाण्या!
पंचनामे ते जीव जाता
मारती ते मोठ्या बाता
मदतीच्या आकड्यांच्या
मिळती खोट्या बतावण्या!
किती संसार ते गांजले
रोजचेच हे रडे झाले
झाडा झाडाला विचारा
आत्महत्येच्या कहाण्या!
     .....प्रल्हाद दुधाळ.


शनिवार, १४ फेब्रुवारी, २०१५

प्रेमभावना

प्रेमभावना.
स्मरण क्षणोक्षणी,हीच माझी साधना,
राहो  साथ सदैव,ही प्रभुशी प्रार्थना!
बोल सखे बोल,मनातले ते सगळे,
कशासाठी हवी ती वेगळी प्रस्तावना?
भोग कधी चुकले का कुणा प्राक्तनाचे?
उगा का करावी  कुणाची ती संभावना!
गुंफले असे हात, हातात आपले की,
स्मितात या सुखाच्या,हरवल्या वेदना!
उरते कुठे आस्तित्व वेगळे तुझे माझे?
अंकुरता अशी  ह्रदयी प्रेमभावना!
    .......प्रल्हाद दुधाळ.14/02/2014.

मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०१५

माझ्या मना!

माझ्या मना!
नको सांगू बहाणा,
पुसतो पुन्हा पुन्हा,
जाहला काय गुन्हा,
अबोल माझ्या मना!

रात्रंदिनी फिरशी
नाहीच तू थाऱ्याशी
एकदा बोल पुन्हा
अबोल माझ्या मना!

 भविष्य कधी भूत
 जगणे भीत भीत
 शंका सदैव नाना
 अबोल माझ्या मना!

 करू नाही विचार
 देतो तनी विकार
 नको ची ही भावना
 अबोल माझ्या मना!

 वागणे नाही बरे
 एकदा जाण खरे
 माझ्या मन मोहना
 अबोल माझ्या मना!
    ....प्रल्हाद दुधाळ.पुणे.