मंगळवार, ३१ मे, २०११

शून्य!

शून्य!
आयुष्यातल्या निसरड्या क्षणी,
मला सावरलस,आधार दिलास.
जे क्षण मला पोहचवू शकले असते,
विनाशाच्या खाईत!
तू भेटलास,हात दिलास,
ज्या क्षणी....
माझं जीवन मी संपवलं....
आणि सुरू झालं,
आपलं जीवन!
जे तुझही आहे,माझही आहे.
तू आणि मी,
आता वेगळे कुठे आहोत?
तुझ्यातून मी,आणि माझ्यातून तू वजा जाता,
उरते फक्त ’शुन्य’
ऒदास्याचं!
प्रल्हाद दुधाळ.
......काही असे काही तसे!

रविवार, २९ मे, २०११

तुझ्यामुळे!

तुझ्यामुळे!
तुझे दर्शन झाल्यापासून,
मी निसर्गसॊंदर्य पहायचंच सोडून दिलय!
तुझ्या स्नेहात चिंब भिजल्यापासून,
पावसात हिंडणच सोडून दिलय!
तुझ्या नयनातील शराब प्यायल्यापासून,
मी ’पीणं’ च सोडून दिलय!
आणि खरं सांगू?
तुझ्यावर मरायला लागल्यापासून,
मी जगणंच सोडून दिलय!
प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
..........काही असे काही तसे!

हे असचं!

हे असचं!
हे असच चालायचं?
डोळे झाकून राहायचं?
पोटासाठी जगायच,
कर्जबाजारी व्हायचं,
केवळ दोन घासासाठी?
दोन ग्लास ढोसायचे,
बायकामुलांना तुडवायचं,
कर्जबाजारी व्हायचं,
स्वत:वरच चिडायचं,
मरणासाठी धडपडायचं,
वास्तव नाकारण्यासाठी?
हे असचं चालायचं,
फक्त बघत रहायचं?
अगतिकपणे गप्प बसायचं,
जमेल तसं जगायच,
सोसत रहायच,
मरणापर्यंत!
प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
......काही असे काही तसे!

शुक्रवार, २७ मे, २०११

आयुष्याच्या मध्यान्ही!

आयुष्याच्या मध्यान्ही!
आयुष्याच्या मध्यान्ही,एकदा मागं वळायला हवं!
कोण आहे किती पाण्यात,आता मात्र कळायला हवं!
बालपण तरूणपण,उधळलेले बेभान क्षण!
आणाभाका खोट्या शपथा,मोडलेलं कुणाचं मन!
हिशोबाचं बाड आता, चाळायला हवं!
एकदा मागं वळायला हवं!
जोडलेली मनं,तोडलेली नाती,
मनातली भीती,कटवलेली खाती!
सभ्यतेचं झापड आता,ढळायला हवं!
एकदा मागं वळायला हवं!
आयुष्याची वणवण,पॆशांची चणचण,
खोटं खोटं वागणं,मुर्दाडाचं जगणं!
भविष्यातलं चुकणं आता,टाळायला हवं!
एकदा मागं वळायला हवं!
भोगलेलं जगणं,सोसलेलं दुखणं,
दाबलेलं रडणं,भंगलेलं स्वप्न!
डोळ्यातलं पाणी आता,गळायला हवं!
एकदा मागं वळायला हवं!
आयुष्याच्या मध्यान्ही,एकदा मागं वळायला हवं!
कोण आहे किती पाण्यात,आता मात्र कळायला हवं!
प्रल्हाद दुधाळ.
......काही असे काही तसे!

सोमवार, २३ मे, २०११

सावरलो कसा?

सावरलो कसा?

विचार मनात आहे जगलो कसा मी?
आजवरच्या आयुष्यात वागलो कसा मी?

वाहिला जसा वारा फिरवत पाठ आलो,
ध्येय्याकडॆ चालताना तगलो कसा मी?

बोललो असा की शब्द वावगा नाही,
सांभाळताना मने टिकलो कसा मी?

क्षण मोहाचे होते निसरडी वाट होती,
विस्मय हाच असा सावरलो कसा मी?

प्रल्हाद दुधाळ.
....काही असे काही तसे!

समजूत.

समजूत.

सखा माझा तो जरी दूर होता.
साथीला त्याचा गोड सूर होता.

वाटले कितिदा तू मजसवे असावे,
ठावे मजला की तू मजबूर होता.

किस्से कहाण्या त्या पळपूटेपणाच्या,
आहेत पुरावे, तू खरा शुर होता.

किती आणला कोरडॆपणाचा आव,
डोळ्यात दाटलेला अश्रूंचा पूर होता.

प्रल्हाद दुधाळ.
.........काही असे काही तसे!

मन.

मन.
अस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते!
आता इथे आता तिथे,भटकते माझे मन!
बालपणात रमते,मातीत खेळते,
हुंदाडते रानोवनी,पदर आईचा धरते,
गुरूजींची खाते छडी,कोलांट उडी मारते,
कधी असे छतावर,जमीन पोपडी काढते!
अस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते!
आता इथे आता तिथे,भटकते माझे मन!
आठवणींत रमते,सोनपंखी तरूणपण ते,
हुंडारते बागेमधे,सुरपारंब्या खेळते,
डोंगरात झ-याखाली,बेभान डुंबते,
मित्रमॆत्रिणींच्या संगे,फुलपाखरू उडते!
अस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते!
आता इथे आता तिथे,भटकते माझे मन!
सुंदरशा स्वप्नामधे,कधी प्रेमगाणे गाते,
मोरपंखी रंगांमधे, उखाणे लिहीते,
अचानक काढी ओरखाडे नको नकोते,
भळभळते जखम,दुखणे नकोते!
अस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते!
आता इथे आता तिथे,भटकते माझे मन!
संसारातील गमतीत,रमते गमते,
एका एका स्वप्नासाठी शिकस्त करते,
क्षणोक्षणीच्या सुखाची उजळणी होते,
भरे आनंदाने उर,नव्याने उमेद जागते!
अस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते!
आता इथे आता तिथे,भटकते माझे मन!
प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

अगतिक.

अगतिक.

तुझे जिंकणे आता माझीच जीत आहे.
माझे हारणे आता तुझीच जीत आहे.

चाल माझीच अन शब्द माझाच आहे,
गुणगुणते मनी माझेच गीत आहे.

सांगू नको कुणा गुपीत हे मनीचे,
मुखड्यावरी केली वेडी ही प्रीत आहे.

तुझे तोंड वेंगाडणे ते आगमनाला,
अतिथी देवो भव जुनीच रीत आहे.

भलत्याच माणसांची गाठ रोज आहे,
जाणुनही गातोय हे स्वागतगीत आहे.

प्रल्हाद दुधाळ.
......काही असे काही तसे!

शनिवार, २१ मे, २०११

रे माणसा!

रे माणसा!
काय तुझी ही जिंदगी रे माणसा!
वागणे पशूहुनी हीन रे माणसा!
स्वकियांचे स्वार्थात कापतो गळे,
स्वत:साठी किती जगतो रे माणसा!
येताना उघडा जाणार तसाच रे तू,
भरजरी वस्रांसाठी वेडा रे माणसा!
भरण्यास खळी पोटाची एक मूठ पुरी,
हपापला भरण्या तिजोरी किती रे माणसा!
ना बदलती ललाटरेषा नियतीने रेखल्या,
बदलण्य़ास प्रारब्ध किती लढा रे माणसा!
सुख-दुख:ची कळली नाही कधीच सीमा,
नाही समजले हे जगणे तुला रे माणसा!
समजुन घे एकदा शहाणपणा येथला,
वारशात फक्त उरते हे नाव रे माणसा!
प्रल्हाद दुधाळ.
9423012020

डौल!

डौल!
मोल घामा्चे आता
मातीमोल येथे!
चाले पुंजीपतींचाच
डाम डौल येथे!
उघड्यावरी राही
तो श्रम पुजारी,
घरावर बड्या
सोन्याचा कौल येथे!
अन्यायास त्या
नाहीच कोणी वाली,
आक्रोश वांझ त्यांचा
झाला फोल येथे!
प्रल्हाद दुधाळ.

नजरा !

नजरा !

अशा विखारी इथे झोंबल्या त्या नजरा !
हेरती नारी आल्या गेल्या त्या नजरा !

बरे वाटे रहाणे जंगलात श्वापदांच्या,
शिसारी आणती भुकेल्या त्या नजरा !

जाहले कठिण रस्त्यात चालणे आता,
पाठलाग करती लाळगेल्या त्या नजरा !

जरासे कुठे मुक्त वागणे झाले न झाले,
सलगीची भाषा ती बोलल्या त्या नजरा !

दुनियेत खुलेआम आता कसे घडते सारे ?
का न सज्जनांच्या झुकल्या त्या नजरा ?
प्रल्हाद दुधाळ.