गुरुवार, २६ जून, २०१४

धावा.

धावा.
विराण हे माळ
सुकलेली झाडे
उधळते माती
वा-यासंगे!
रखरखते उन
धरणी तापली
नाहीच सावली
विसाव्याला!
आषाढ  महिना
पाऊस रुसला
विहीर कोरडी
ओकीबोकी!
किती भगवंता
अंत हा पहाता
धाडा पर्जन्याला
भक्तासाठी!
    ........प्रल्हाद दुधाळ


  

सोमवार, २३ जून, २०१४

नाद....

नाद ....
सकाळी सकाळी बेल वाजली
दारात दुधवाला पक्का मावळा
म्हटल भाऊ दुधात पाणी वाढल
म्हणाला तोर्यात  वाटल तर घ्या
..........उगाच नाद करायचा नाय!
भराभर उरकल कामाला निघालो
बसचा वाहक बेल खेचत किंचाळला
सुट्टे पैसे काढा मी नाहीत म्हणताच
उतरा खाली म्हणे भित नाय कुणाला
 .........उगाच नाद करायचा नाय !
 संध्याकाळी रिक्षाला हात केला
 दोघे थांबले नाही तिसरा म्हणाला
 येतो पण मिटर च्या दुप्पट घेइल
  उपकार माना येतोय नाय तर...
  ..........उगाच नाद करायचा नाय !
   गेलो पालिकेत,सरकारी बाबूकड,
   राशन दुकान. आणि कुठ  कुठ
   जेथे तेथे उध्दट माणसे जोरात
   मुकाट रहा नाहीतर मिळे धमकी
  ............उगाच नाद करायचा नाय !
   आता मात्र ठरवुनच टाकलय
    विनवणी  कुठच कामाची नाय
    बिन्धास नडायच अन भिडायच
     आवाज करायचा मोठा खमक्या
    ............उगाच नाद करायचा नाय !
                     .......प्रल्हाद दुधाळ.

शनिवार, २१ जून, २०१४

वारी .

वारी .
निघाली पंढरी ची वारी 
ठेका भजनाचा लागला 
विसरुन ते तहान भूक 
चालले पांडुरंग भेटीला!
अखंड नाम ओठांवरी 
ग्यानबा अन तुकाराम 
भजन किर्तन ते रंगले 
दुमदुमले विठ्ठल नाम!
टाळ चिपळ्यांचा ताल 
साथीला वाजे एकतारी 
फुलवित भक्तीचा मळा 
चालले संतजन पंढरी!
असा आगळा वेगळा 
रंगलासे हा सोहळा 
आषाढी व कार्तिकीला 
रंगतो वैष्णवांचा मेळा!
                ......प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, १८ जून, २०१४

आस.

आस.
कोसळण्याच नाव नाही
रोज आभाळ भरुन येतय,
वाट पावसाची पाहुन
चातकाची घालमेल होतेय!
भेटीची अशी आस लावुन
त्याचे असेच निघुन जाणे,
कदाचित संगतीत ती च्या
शिकला तो सांगणे बहाणे!
     ......प्रल्हाद दुधाळ.

मंगळवार, ३ जून, २०१४

अवलोकन.

अवलोकन.
एकदा निवांत बसुन 
वास्तवाच भान राखुन 
करणार आहोत का 
सिहांवलोकन ?
कशासाठी हे जगणे 
प्राथमिकता आहे काय 
करणार का जरा
थोड अवलोकन ?
पैसा गाडी अन माडी 
कशाची लागली गोडी 
येइल का एकदा 
परिस्थितीच भान ?
गवसलय येथे काय 
हरवलय ते काय
कुठल्या बेगडी पाशात 
अडकलीय मान ?
चुकतय का आता ते 
गणितातले काळ व काम 
ऐहिक सुख शोधताना 
बुध्दी पडली का गहाण ?
आनंद कशात अन 
सुख आहे कशात ?
भ्रमिष्ट झालाय माणुस 
यंत्रांचा पक्का गुलाम !
.....प्रल्हाद दुधाळ.