गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

वरात.

वरात.
दरवाजावर ऐकून दु:खांची दस्तक
स्वागतास मी उभा पूर्ण नतमस्तक.
बजावले त्याना मी देतानाच प्रवेश
घाबरली दु:खे माझा पाहून तो आवेश.
कुरवाळणे दु:खांना माझा स्वभाव नाही
फार काळ येथे लागणार निभाव नाही.
बघून उपेक्षा ती दु:खांनी काढला पळ
स्वागतास सुखांच्या मिळाले नव्याने बळ.
पलायनाची दु:खांच्या गेली सुखांना वर्दी
दारापुढे प्रवेशासाठी सुखांची ही गर्दी.
एकामागे एक सुखे येताहेत घरात
जीवनात चालू आहे आनंदाची वरात.
        .....प्रल्हाद दुधाळ.   



कर्तव्यपूर्ती .

कर्तव्यपूर्ती .
बजावावे कर्तव्य आपले
परताव्याचा हव्यास नको
सर्वस्व जरी अर्पण झाले
सन्मानाला पण ठेच नको.
लुटतील सारे लुटून घ्यावे
मनात कुठला किंतु नको
शहाणपणही सोडून द्यावे
देण्याचा परंतु शोक नको.
आयुष्य कर्तव्यात पणाला
पूर्ती नंतर रेंगाळणें नको
एकाकी हे आयुष्य आपले
बिल्कूल तयाची खंत नको.
जिध्द नव्याने उडण्याची ती  
पडण्याची परंतु लाज नको
अवकाशी नव्या विहरताना
जुन्या जगाची त्या याद नको.
जगणे आता आपल्यासाठी
जनलज्जेची उगा भ्रांत नको
नव्या दिशांचे नवीन कायदे
माघारीची ती बात नको.
       ......प्रल्हाद दुधाळ. 


बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

आत्मभान.

आत्मभान.
व्यर्थ का ते संस्कार अन शिक्षण
बधिर झालय का आपल मन?
नावापुढील डिग्री कागदी फ़क्त
कशाला आटवले एवढे रक्त?
मिळवले हट्टाने अमूल्य ज्ञान
का पेलता येवू नये आव्हान?
आईबाबांच्या कष्टाचे नाही मोल
अपेक्षा सगळ्या त्या झाल्या का फोल?
मनमानीने गेलय आत्मसन्मान
येणार का आता वास्तवाचे भान?
जिध्दीनेच होती स्वप्ने ती साकार
तूच तुझ्या रे जीवनाचा शिल्पकार!
       ......प्रल्हाद दुधाळ.  


शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

दिगंबर दत्ता.

दिगंबर दत्ता.

तु परतात्मा 
अनसुया सुता 
नमन तुजला 
दिगंबरा दत्ता.
त्रिशुळ डमरु 
हाती अवधुता 
शरण तुजला 
दिगंबर दत्ता. 
शंख चक्रधारी 
संगती गोमाता 
पावशी साधका 
दिगंबर दत्ता.
उभा तू पाठीशी 
धावशी स्मरता 
वंदन त्रिमुखी 
दिगंबर दत्ता.
   ..(c)..प्रल्हाद दुधाळ

वस्ती ती ...

वस्ती ती ...
होती ती गरीबांची वस्ती 
मने परंतु ती श्रीमंत होती.
छप्पर गळके ते कौलांचे 
तुटक्या पत्र्यांच्या तेथे भिंती.
रस्ते कैसे फुटभर गल्ल्या
रक्तापेक्षा माणुसकी नाती.
जातधर्माचे नव्हते कुंपण
सुखदु:खाचे सगे सोबती.
दिवाळी इद ख्रिसमस तेथे
धडाक्यात सजत गणपती.
निळे श्वेत वा हिरवे भगवे
झेंडे सारे एकत्र नाचती.
जयंती बाबांची बुध्द पोर्णिमा
असो पाडवा वा शिवजयंती.
गोडधोडाने होई साजरी
आगळे वेगळी एकी होती.
शिकले आता शहाणे सारे
बांधल्या धर्म जातीच्या भिंती.
पक्की आता घरेही तेथली
दुरावली पण माणुसकीची नाती.
आठविता मन विषण्ण होते
दिसता ती मुर्दाडांची वस्ती .
.(c)....प्रल्हाद दुधाळ.

मंगळवार, १ डिसेंबर, २०१५

कृतज्ञ मी.

 नोव्हेंबर च्या  शेवटच्या आठवड्याचा प्रत्येक दिवस हा कृतज्ञता दिवस (Thanks giving Day)म्हणून जगभर प्रामुख्याने पाश्चिमात्य देशात साजरा केला जातो.खरच ही किती अभिनव कल्पना आहे नाही ....
कृतज्ञ मी या जगाचा
पावला पावलावर भेटल्या
देव माणसांचा
दिला ज्यानी प्रचंड आनंद 
कृतज्ञ मी त्यांचाही
ज्यानी दिल्या वेदना
केले जीवन समृध्द अनुभवानी
कृतज्ञ मी पंचमहाभुतांचा
ज्यानी दिले हवा पाणी प्रकाश
जगण्याची प्रचंड उर्जा
सुर्य चंद्र चांदणे
रात्र आणि दिवस
आणि.....

कृतज्ञ मी निर्मिकाचा
ज्याने केली निर्मिती
दिली भलेबुरे ओळखण्याची
सारासार विवेकबुध्दी
नक्कीच कृतज्ञ आहे मी
माता पिता गुरूजन आणि
आपल्यासारख्या मित्रमैत्रिणींचा
ज्यानी हे आयुष्य
सुशोभित केले
प्रचंड स्नेहाने.
Thanks!Thanks!Thanks!
...प्रल्हाद दुधाळ.