गुरुवार, ३० मार्च, २०१७

तरीही ....

तरीही ....
वाटेवरती अगणित काटे
जरी बोचले चालत रहावे
स्नेह जुळावा टोकांशी विखारी
मोरपीस जखमांचे  त्या व्हावे.
जुळलेली नाती अक्षय व्हावी
किंतू परंतु वा नको दुरावा
क्षणभंगूर जर जीवन आहे
अहंकार हा कुचकामी व्हावा.
हिशोब ठेवू त्या क्षणाक्षणांचा
नकळत दुखावल्या मनांचा
सांधून नाती जगत रहावे
उपभोगूनी सुगंधी क्षणांना.
   ..... प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, ८ मार्च, २०१७

आनंद ...

आनंद ........
शहाण्यास असे
शब्दांचाच मार
इथे वेडे ठार
काय करू ?
गाढवाच्या पुढे
व्यर्थ ते किर्तन
लाथांचे वर्तन
सुटेना हो!
काळाचे औषध
झाले कुचकामी
उपायही नामी
अपयशी!
माणसांशी आता
वागावे हो कसे
पडतात फासे
उलटेच!
सोसाट्याचा वारा
भरकटे दिशा
दाटते निराशा
कधी कधी!
अचानक येते
उर्जेची तिरीप
अंधूकसा दिप
दिसतसे!
अंधारा नंतर
येतोच प्रकाश
आनंदी दिवस
उगवतो!
झालो आता मुक्त
सुटले ते बंध
अवघा आनंद
आता येथे!
 ..... प्रल्हाद दुधाळ.