बुधवार, २८ डिसेंबर, २०११

महात्मा वंदन.


महात्मा वंदन.
अनिष्ट रुढींचे छेदले कुंपण,
तुम्हास महात्म्या आमचे वंदन!
खुली महीलांस शाळा दारे,
आसुडाचे सत्तेला फटकारे,
कर्मठ रूढींना दिले हादरे,
झिजलास की जैसा चंदन,
तुम्हास महात्म्या आमचे वंदन!
उभारला लढा तो समतेचा,
पद द्लितांच्या उद्दाराचा,
हातभार पत्नी सावित्रीचा,
भेदले परंपरांचे बंधन,
तुम्हास महात्म्या आमचे वंदन!
अनाथांचे होता नाथ तुम्ही,
बहुजनांस दे नवी उभारी,
भारतभूचा द्रष्टा नंदन!
तुम्हास महात्म्या आमचे वंदन!
          प्रल्हाद दुधाळ.

जग तुझे!


जग तुझे!
होऊ नको रे असे,
अर्ध्या हळकुंडाने पिवळे!
नाहीच तुझ्या कवेत,
मावणार ते सगळे!
मानू नको सर्वग्यानी,
अवसान नको ते बळे!
लागले म्हणतील लोक
हे कसले वेडे चळे!
विश्वाची भव्यता जाण
जग तुझे छोटे तळे!
मनी असू दे समाधान
फुलवून जीवनी मळे!
  प्रल्हाद दुधाळ.


कुंपण.


कुंपण.
कितीतरी बहुमोल क्षण
फुक्कट घालवतो आपण!
नुसत्या काळज्या करण्यात
रूसवे फुगवे अन भांडणात!
खरं तर..........
आयुष्य हे किती क्षणभंगुर
कुठल्याही वळणावर संपणारं...
नाही का हे जगता येणार
निव्वळ निखळ आनंदात?
सगळी कपोलकल्पित कुंपण तोडून
राग लोभ मत्सराची...
छोट्या पण खोट्या
अहंकाराची!
   प्रल्हाद दुधाळ.

किती दिवस?


  किती दिवस?
गुपीत मनातले किती
मनातच राखायचे?
सांग सखे कधी,
मनातले बोलायचे?
दिवस जातील असे,
महीने जातील असे,
नजरेच्या झुल्यावर,
किती दिवस झुलायाचे?
लोक निंदेस या इथल्या,
भाव तो का द्यावा?
बंधमुक्त जगण्याचा,
सोस का न बाळगावा?
शेंडी तुटो वा पारंबी,
कुणाशी का झगडायचे?
सांग सखे आता तरी,
किती दिवस झुरायचे?
    प्रल्हाद दुधाळ.

कात.


कात.
मन माझे संभ्रमात आहे!
हातात हा तुझा हात आहे!
तिमीर हा संपणार आता,
आली चांदणी रात आहे!
मी गुरू केले संकटांना,
निर्धाराने केली मात आहे!
रस्ता हा नवा सुखाचा झाला,
मिळाली जी तुझी साथ आहे!
लावण्य बहरले नव्याने,
टाकलीस पुन्हा तू कात आहे!
      प्रल्हाद दुधाळ.

कसोटी.


कसोटी.
दिले धरावयास बोट
धरतात हात कोणी!
जगण्यातली जाते मजा,
आणतात वात कोणी!
कोजागिरीचा चन्द्र अन,
भरले फेसाळ पेले,
रसभंग झाला कसा,
केली अंधारी रात कोणी!
असतात शीते जेंव्हां,
जमतात भुते फार,
वेळ येता संकटाची,
सोडली ही साथ कोणी?
देव माणुनी पुजियले,
माणसे ती गेली कुठे?
येता क्षण कसोटी चा,
मारली ती लाथ कोणी?
    प्रल्हाद दुधाळ.

भज थोडा.


     भज थोडा.
कशास लावतो कुणा लळा?
लागतील अंतरास कळा
ठरणार जगात बावळा
येणार कुणा न कळवळा!
ही काही क्षणांची बात
नाहीच युगांची ही साथ
मिळणार एक दिवस लाथ
अमरत्वाच्या नको कैफात!
कमावले जे धाव धावून
कधी कुणास ठकवून
पहा तू मागे जरा वळून
नाही उपयोगी जाता जळून!
तुजपाशी आहे वेळ थोडी
पसरू दे भवती गोडी
सोड अहंकार बंगला माडी
निर्मिकाचे हाती तुझी नाडी!
सारे येथेच रहाणार
तुजसवे काय ते नेणार?
भले जगासाठी करणार
तयानेच नाव उरणार!
एकेक महत्वाचा क्षण
मारू नको उगा मन
हरपून ते देहभान
भज थोडा भगवान!
      प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

गूढ


गूढ.
होते कुठे तेथे आभाळ फाटले?
आकांक्षांचे पंख कुणी ते छाटले?

सग्यासोय-यांचा आधार तो मोठा,
प्रेम त्यांचे असे कसे हो आटले?

मनातली गुपीते मनी राहीली,
शल्य अंतरीचे ह्र्दयी साठले.

कळेना काय चुकलेले ते माझे,
भोवती संशयाचे ढग दाटले.

हा खेळ नियतीने मोडला कसा?
संकटानी मला खिंडीत गाठले.
                    प्रल्हाद दुधाळ.