मंगळवार, ३१ मार्च, २०१५

मोक्ष.

मोक्ष.
मानवी जीवन
अल्पजीवीं छाया
सोड मोह माया
ऐहिकाच्या !!

नको अहंकार
पोकळ प्रतिष्ठा
असू दे रे निष्ठा
प्रभू प्रती !!

नात्यांचा हा गुंता
सुटता सुटेना
दरी ही मिटेना
करू काय?

शरण पायाशी
तुझ्या भगवंता
जाण माझी चिंता
आता तरी !!

सुटतो रे तिढा
मिळे समाधान
घेता तुझे नाम
पांडुरंगा !!
  .....प्रल्हाद दुधाळ.


शुक्रवार, २७ मार्च, २०१५

गवसणी

गवसणी
शिकविलेस स्वाभिमानी जगणे,
माणुसकीने जिंकण्याचा ध्यास...
संकटातही आई शोधेन संधी,
घालेन गवसणी मी गगनास..!!


प्रीती तुझी ही संजीवनी मजला,
अर्थ नव्याने आला या जगण्यास....
साथीने या जीवन मंगल गाणे,
घालेन गवसणी मी गगनास..!!

मांडला डाव वारंवार मोडला
हिरावला आलेला तोंडाशी घास...
लढाई जगण्याची पुन्हा नव्याने
घालेन गवसणी मी गगनास..!!

माणसांना अनुभवले इतके,
समृद्ध समर्थ केले जीवनास....
साथीत जगतो समरसतेने,
घालेन गवसणी मी गगनास..!!

     ......प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, २५ मार्च, २०१५

अन्न वस्र निवारा!(????)

अन्न वस्र निवारा!(????)
म्हणायच घर त्याला! खर तर गोठा!
काडाच्या पेंढ्याचे छत,कुडाच्या भिंती,
दरवाजा म्हणून झोपा,जमीन खडबडीत,
पावसात गळणाऱ्या धारांसाठी,
सगळी भांडी यायची कामाला!
होता गोठा पण त्यांचा महाल!
सदा काबाडकष्ट पोटासाठी
कधी राशनवरचा मिलो,कधीतरी लाल गहू
दुष्काळी कामावर सुकडी,हुलग्याच माडग नेहमीच,
गव्हा ज्वारीच्या कण्या,
सांजेच्या घासासाठी वणवण
अर्धपोटी सदा, निजेला धोंडा भुकेला कोंडा
सुखासमाधानाचा!
ठिगळ लावून लावून मूळ कपडा कोणता
कधी कळायचाच नाही
साडीचा त्यातल्या त्यात बरा भाग फाडून
चार चार साड्यांतून बनायची एक साडी!
फाटक्या धोतरावर खिशाची कोपरी कळकट...
पोरांच्या गणवेशाची खरेदी सणासुदीला!
एका दगडात दोन पक्षी...आलाच कधी रोकडा!
त्यांनी मातीतच जन्मायच, मातीतच राबायचं,
मातीतलच खायचं, मातीतच राहायचं,
शेवटी मातीत मिळायचं!
त्यांचा अन्न वस्र निवारा ???
अतोनात कष्ट......
.........तेंव्हाही ....आताही....
      ........प्रल्हाद दुधाळ.
 


रविवार, २२ मार्च, २०१५

समजले पाहिजे.

 समजले पाहिजे!
कधीकधी माणसावर आपल्या रुसले पाहिजे!
रोज जीवनात खदखदून हसले पाहिजे!
हवा  कशाला ताठा,दुराभिमान नाहीच कामाचा
स्पर्शासाठी ममतेच्या जरा मातीत बसले पाहिजे!
दु:खात रडणे माणसाचा असे सहज स्वभाव
आनंदातही डोळ्यातुन पाणी बरसले पाहिजे!
करिअर टार्गेट अप्रायजल हे नेहमीचेच
नात्यांसाठी प्रेमभरल्या मन आसुसले पाहिजे!
आयुष्य हे क्षणभंगूर चिरंजीव येथे ना कोणी
जन्मात आनंदी  रहावे हे मनी ठसले पाहिजे!
                               ........प्रल्हाद दुधाळ.

शनिवार, ७ मार्च, २०१५

तू स्री शक्ती!

तू स्री शक्ती!
राहून प्रसंगी उपाशी वा अर्धपोटी
चिमुकल्यांसाठी राबत असते ती
वात्सल्याच दान भरभरून देवून
मायेने आपल्या पिलाला जपते ती
प्रेमाचा अखंड झरा वाहे त्या ठायी
जेंव्हा असते ती कुणाची तरी ‘आई’!
मोठी वयाने जरी कमीपणा घेते
चुका सर्वांच्या सदा पदरात घेते
 वेळी मायबापाच्या विरोधात जाते
आधार देते कधी, ती कैवार घेते
वागणेबोलणे जशी जणू प्रती-आई
असते जेंव्हा छोट्या भावंडांची ‘ताई’!
सुख दु:खात तिची सारखीच संगत
केवळ आस्तीत्वाने वाढवते रंगत
गुलाबी प्रेमाची होत असते उधळण
स्वर्ग सुखाची सानिध्यात पखरण
सदैव हास्य विलसते तिच्या मुखी
असते जेंव्हा ती कुणाची प्रिय 'सखी'!
सौभाग्याच्या सुखसमाधानासाठी
घरात आणि बाहेर अखंड राबते
सहजीवनात तनमनाची साथ देते
होऊन चाक संसारात पळत असते
होते अर्धांगीनी सहभागी सर्वकार्या
असते जेंव्हा ती त्याची प्रेमळ 'भार्या'!
अंगाखांद्यावरून मिरवते वय विसरून
देत असते बाळकडू गोड गोष्टींतून
अनुभवाच गाठोड वाहून आणते पाठी
वाटते ती पिढीजात परंपरा संस्कार
मदतीसाठी कायमची सदैव तत्पर
'आजी' म्हणून घरावर मायेची पाखर!
दुडू दुडू धावते लाडीक हट्ट ती करते
मायबापाची ती गोजिरी बाहूली असते
शिकून सवरून मिळवते मानसन्मान
सासर माहेरचा तिला सदैव अभिमान
तेवढीच मायाळू  असो मोठा वा लहान
'स्नुषा' वा 'कन्या' रूपी तेव्हढीच महान!
रुपात कोणत्याही असते फक्त प्रेमळ
वर्णन तोकड्या शब्दात अशक्य केवळ
रूप असे अबला सबला प्रसंगी रणचंडी
आधुनिक जगात कर्तुत्वाची झेप त्रिखंडी
नवयुगाची ती शिल्पकार ज्ञानावर भक्ती
प्रणाम तुला आजच्या जागृत स्री शक्ती!
                              ......प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, ६ मार्च, २०१५

थोडा बदल !


थोडा बदल !
जगणे आहे सुंदर गाणे वेड्या,
हवा आहे बदल, फक्त थोडा बदल !
जीवन झोका त्या सुख दुख:चा
नात्यामधल्या रुसव्याफुगव्यांचा
क्षणभंगुर भडक त्या भावनापायी
देतोस का असा आनंदास बगल ?
हवा आहे  बदल,फक्त थोडा बदल !
समजुन घे समोरचे वास्तविक तू
शोध रे माणसातले फक्त गुण तू
सोडून अहंगंड तो संवाद साधता
आयुष्यात बघ कसे घडते नवल?
हवा आहे बदल,फक्त थोडा बदल !
शब्द कोमलअन वाणीत ओलावा
मनी नसावा कुठलाही  तो कावा
शत्रूसही जातो मग प्रेमाचा सांगावा
सूड भावनाही  ती मग होते  विफल!
हवा  आहे बदल, फक्त थोडा बदल !
माणुस हरेक असतो इथे वेगवेगळा
व्यक्ती व्यक्ती मुळ स्वभाव आगळा
कुणी आचरट तर कोण भासे भोळा
समजुन  सारे कर रे जीवन सफल!
हवा आहे बदल, फक्त थोडा बदल !
आयुष्य आहे आपले अगदी थोडे
कशास हवेत हे अहंकाराचे  घोडे?
दिवस आजचा फक्त आपल्या हाती
बघ अनुभवून इथले आनंद सकल!
हवा आहे बदल, फक्त थोडा बदल !
                   ......प्रल्हाद दुधाळ.