शनिवार, ७ मार्च, २०१५

तू स्री शक्ती!

तू स्री शक्ती!
राहून प्रसंगी उपाशी वा अर्धपोटी
चिमुकल्यांसाठी राबत असते ती
वात्सल्याच दान भरभरून देवून
मायेने आपल्या पिलाला जपते ती
प्रेमाचा अखंड झरा वाहे त्या ठायी
जेंव्हा असते ती कुणाची तरी ‘आई’!
मोठी वयाने जरी कमीपणा घेते
चुका सर्वांच्या सदा पदरात घेते
 वेळी मायबापाच्या विरोधात जाते
आधार देते कधी, ती कैवार घेते
वागणेबोलणे जशी जणू प्रती-आई
असते जेंव्हा छोट्या भावंडांची ‘ताई’!
सुख दु:खात तिची सारखीच संगत
केवळ आस्तीत्वाने वाढवते रंगत
गुलाबी प्रेमाची होत असते उधळण
स्वर्ग सुखाची सानिध्यात पखरण
सदैव हास्य विलसते तिच्या मुखी
असते जेंव्हा ती कुणाची प्रिय 'सखी'!
सौभाग्याच्या सुखसमाधानासाठी
घरात आणि बाहेर अखंड राबते
सहजीवनात तनमनाची साथ देते
होऊन चाक संसारात पळत असते
होते अर्धांगीनी सहभागी सर्वकार्या
असते जेंव्हा ती त्याची प्रेमळ 'भार्या'!
अंगाखांद्यावरून मिरवते वय विसरून
देत असते बाळकडू गोड गोष्टींतून
अनुभवाच गाठोड वाहून आणते पाठी
वाटते ती पिढीजात परंपरा संस्कार
मदतीसाठी कायमची सदैव तत्पर
'आजी' म्हणून घरावर मायेची पाखर!
दुडू दुडू धावते लाडीक हट्ट ती करते
मायबापाची ती गोजिरी बाहूली असते
शिकून सवरून मिळवते मानसन्मान
सासर माहेरचा तिला सदैव अभिमान
तेवढीच मायाळू  असो मोठा वा लहान
'स्नुषा' वा 'कन्या' रूपी तेव्हढीच महान!
रुपात कोणत्याही असते फक्त प्रेमळ
वर्णन तोकड्या शब्दात अशक्य केवळ
रूप असे अबला सबला प्रसंगी रणचंडी
आधुनिक जगात कर्तुत्वाची झेप त्रिखंडी
नवयुगाची ती शिल्पकार ज्ञानावर भक्ती
प्रणाम तुला आजच्या जागृत स्री शक्ती!
                              ......प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा