मंगळवार, २१ जुलै, २०१५

ताई.....

ताई.....
लढाईत जीवनाच्या,
हिमतीने ओझी वाही.  
खंबीर व उभी घट्ट,
शूर अशी माझी ताई.

आई वडिलांचे नाव,
खाली पडू दिले नाही.
दिल्या घरात नांदली,
खूप धीराची ती बाई.

राखी भाऊबीज येता,
डोळे वाहू देत नाही.
आता होत नाही भेट,
मूक आसू गाळी ताई.

   .....प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, २ जुलै, २०१५

उत्सव.

उत्सव.
मृगधारानी भिजली अवघी धरती,
रानोमाळी हिरवे अंकुर सजलेले.....
सृष्टीच्या या रंगीबिरंगी सोहळ्यामध्ये  
सप्तरंगानी आकाशही ते नटलेले....
झरझर बरसता या पाऊसधारा
निर्झर हसलेले ,रस्तेही भिजलेले.....
गाऊया वर्षावात,नाचू फेर धरूनी  
तन चिंब मन चिंब क्षण चिंबलेले......
      .....प्रल्हाद दुधाळ.