मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

चूल

चूल

शब्दा शब्दात उमटे

स्नेह ममतेचे फुल

इथे घामाने पेटते

माझ्या संसाराची चूल

संवादाचे त्यास वासे

विश्वासाचे ते राऊळ

भाजे कष्टाची भाकरी

माझ्या संसाराची चूल

सावलीनेही लागते

जिवलगाची चाहूल

ना कधी उपाशी ठेवी

माझ्या संसाराची चूल

©प्रल्हाद दुधाळ

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२०

शाल हिरवी...

शाल हिरवी...

 कशी कुणी अंथरलेली 

शाल हिरवी भूवरची

रंग प्रसन्न कुणी रेखिले

इंद्रधनुष्य या नभावरी

सुगंध दरवळे रानोमाळी

करते कोण फवारणी

सृष्टीचे हे रूप गोजिरे

कोठून येई उल्हास मनी

©प्रल्हाद दुधाळ 

बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

प्रीत

 

प्रीत...

वेडे स्वप्न असे जगावेगळे

राहो तुझामाझ्यात दुरावा

इतिहासात नको नोंद ती

तुटलेल्या नात्याचा पुरावा

राहूनही आपापल्या जागी

मनामनांतील प्रीत फुलावी

आगळ्या वेगळ्या प्रेमाची या

अजरामर दंतकथा उरावी

©प्रल्हाद दुधाळ 

मंगळवार, १६ जून, २०२०

अव्यक्त

अव्यक्त...

मनात साठलेले
अव्यक्त जे काही
साठवणे असे ते
बरे मुळीच नाही

अव्यक्त कोंडलेले
खदखद मनात
दाटलेले नैराश्य
करते मग घात

पारदर्शी आयुष्य
राहू नये अव्यक्त
आनंदी जीवनात
व्हावे सदैव व्यक्त

©प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, ४ मे, २०२०

कळेना...

कळेना...
मला ही कळेना तुलाही कळेना
कशी ती सुटावी नशा आकळेना

बरी वाटते ही निशेची गुलामी
कशाला कुणाला नकोशी सलामी

 दिशेच्या प्रवासा कशाने  टळावे
 हिताचे मनाला कसे ते कळावे

 नशेची कहाणी नशेशी अंताला
 निघालो असा मी विनाशी पंथाला

प्रल्हाद दुधाळ.

शनिवार, २ मे, २०२०

इरादे

इरादे  (वृत्त... भुजंगप्रयात.)

फुलाया फुलांना दलाली कशाची
संधी जी मिळाली अदा वारशाची 
इथे ग्रामभाषा समाजास चाले
युगांच्या रिवाजा फुकाचेच टाळे

विकल्पांस आता कसे अंतरावे
बिघाडांस त्यांच्या कसे आकळावे
नशेचे पुरावे मिळाले तिथेही
कशाचे धडे हे शिकावे इथेही

कळाले कधी ना विषारी इरादे
कुणाच्या घराशी पडावेत प्यादे
अश्याना कसे ते फसावेत तारे
जिवांशी मिळो त्या सुखाचीच द्वारे
...   प्रल्हाद दुधाळ

बिचारा

वृत्त भुजंगप्रयात
(लगागा लगागा लगागा लगागा)

बिचारा...
असा आज यावा सुगंधीत वारा
 तिच्या आठवांच्या जुळाव्यात तारा

 पहाटेच स्वप्नी दिसो चेहरा तो
 स्मृतींचा तिच्या त्या फुलू दे पिसारा

कसे ओळखावे कुणाच्या मनीचे
परी तो कळाला क्षणाचा इशारा

तिची बात प्यारी करूया तयारी
झुरे तो मनाशी उपाशी बिचारा
....© प्रल्हाद  दुधाळ

शुक्रवार, १ मे, २०२०

सुगंध सुखाचे

भुजंगप्रयात
अक्षरगणवृत्त
मात्रा २०
लगागा लगागा लगागा लगागा
सुगंध सुखाचे
तुला काय सांगू मला काय वाटे
तुझे पाहुनी रूप आनंद दाटे
अशी भेटता तू  सुखाची कहाणी
जशी ईश्वराशी म्हणावीत गाणी

असा मी पहातो करू का खुलासा
पुन्हा आठवांचा मनाला दिलासा
नको आज सांगू नवा तो बहाणा
म्हणूदे कुणी ते कसा हा दिवाना

जरी भासतो मी जरासा करंटा
नसे आवडीचा फुकाचाच डंका
हिशोबी गणिते इथे भावनांची
कुणाला कळावी व्यथाही प्रितीची

कशाला कुणाची तमा ती करावी
मनाला मनाचीच भाषा कळावी
तयाना कळूदे मला काय त्याचे
प्रियेला कळावे सुगंध सुखाचे

प्रल्हाद दुधाळ

रविवार, १९ एप्रिल, २०२०

व्यथा...

व्यथा...
लिहीत गेलास
जगण्याची कथा
चितारली सुरेख
अंतर्मनातली व्यथा
वाजल्या टाळ्या
 मिळाली वाहवा
लोक म्हणाले
अस्सल कविता
त्या शब्दांनी
अन रेघोट्यांनी
आला ना ढेकर
तरंगली न गाथा
... प्रल्हाद दुधाळ