रविवार, २६ नोव्हेंबर, २०१७

फुले म्हणाली...

फुले म्हणाली...

फुले म्हणाली एकमेका,
चला होउया आपण कलिका.
अपूर्णतेत सुंदरता वसते,
फुलल्यावर ती कोठे उरते?
पुर्णत्वाला ती असुया बोचते,
सौंदर्याला मग नजर लागते.
द्यावा कशास दोष कुणा का?
चला होउया आपण कलिका.
मोठेपणाची दु:खेही मोठी,
कष्ट किती हे जगण्यासाठी?
जीवन का हे अवघड इतके?
कशास उगाच प्रगल्भता येते?
बघा खेळती बागडती बालीका,
चला होउया आपण कलिका.
     ..... प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

सल....

सल....
न बोलताही सल
कळाया पाहिजे
मनातले सारे
आकळाया पाहिजे

आत साठलेले
पोखरते हा देह
तुंबलेले ते आसू
गळाया पाहिजे

पाहताना मागे
छळे गंड आता
गर्वाचा चढा पारा
ढळाया पाहिजे

उभा हा जन्म गेला
तुझ्यामाझ्यावारी
कळले आता सारे
वळाया पाहिजे

रागालोभाच्या सीमा
करू आता पार  
पिळ हा सुंभासह
जळाया पाहिजे
   .... प्रल्हाद दुधाळ.


रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

बेगडी शुभेच्छा...

बेगडी शुभेच्छा....
( हलकेच घ्या)

शुभेच्छा दिल्या वा घेतल्या म्हणून
 नशीब मुळीच बदलत नाही
दिर्घायुष्याच्या दिल्या आशिर्वादाने
अमरत्वही कुणा लाभत नाही

शुभेच्छांचे शब्द जरी हे ओठात
पोटात वेगळच असू शकतं
आजकाल गोड गोड बोलण्यात
मनात जहरही असू शकतं

गुडी गुडीच्या नात्यांना जपायला
शुभेच्छांचं इंधनच येतं कामाला
बेगडी जमान्यात आजकालच्या
महत्व आहे फक्त ते दिखाव्याला

आभासी दुनियेत या आधुनिक
शुभेच्छेसाठीचे निमित्त शोधावे
जिभेवर करून साखरपेरणी
अभिष्टचिंतन करत राहावे

 सद्भावना खरचं असल्या तर
 अव्यक्तपणेही पोहचतातच
जाणीवा त्या समृद्ध असल्या तर
शुभेच्छा सन्मित्रा समजतातच

कळले जरी वळेल असे नाही
जगासारखे वागावेच लागते
मनात असो वा नसो ते तुमच्या
हार्दिक शुभेच्छा म्हणावे लागते
        ..... प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

आई...

आई...
कोंबड आरवायच्या आधीच 
तिने घेतलेली असायची 
डोक्यावर माळव्याची पाटी
चालत रहायची अनवाणी 
नसायची अंधाराची अथवा 
विचूकाट्याची भीती 
मनात एकच ध्यास 
दिवस वर येण्यापूर्वी 
पाटीतला भाजीपाला 
खपायलाच हवा... 
परत धा वाजता 
मजुरीवर पोचायला हवं... 
तिच्या त्या ढोर मेहनतीत 
तिने पेरली होती 
उज्वल भविष्याची स्वप्ने... 
आज ना उद्या या घामावर 
सुखाचे पीक नक्की जोमात बहरेल.....
कधीच ती दिसली नाही हतबल 
पण....
माहीत नाही तिची स्वप्ने 
पूर्णत्वाला गेली की नाही 
सुखदु:खात कायम स्मरते 
माझी सतत राबणारी आई! 
.... प्रल्हाद दुधाळ.

रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

आयुष्य...

आयुष्य...
नको आटवू उगा रक्त
तुझ्यासाठी तूच फक्त
जोड माणसे तू खूप
नकोच अपेक्षांची भूक
समोर आहे तसेच जग
प्रेमाने स्वत:कडे बघ
खूप आहे सुंदर जीवन
विचलू नको देवू  मन
घडते जे भल्यासाठी
नको विचारांची दाटी
फक्त तू चालत रहा
वाईटात चांगले पहा
शुध्द ठेव व्यवहार
आयुष्य सुंदर फार
    .... प्रल्हाद दुधाळ.

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

आप मर रहे हो!

नोबेल पुरस्कार विजेता स्पेनिश कवि पाब्लो नेरुदा की कविता
"You Start Dying Slowly" का  मैने किया हूआ स्वैर हिन्दी अनुवाद..
आप मर रहे हो!
अगर आप कभी यात्रा नहीं करते
पढते नहीं कोई किताब
मनसे कभी सुनते नही धून
किसी की करते नहीं तारीफ
तो आप यह जान लो
आप धीरे धीरे मर रहे है!
जब आप अपने आत्मसन्मान को मारते हो
किसीसे कभी मांगते नहीं या देते नहीं मदद 
दिल खोलकर कभी हसते नही
रुलाता नही आपको किसीका दुख
तो समझ लो यह अच्छी तरह
आप धीरे धीरे मर रहे है!
अगर आप है गुलाम अपने आदतके
चलते है उसी घीसीपीटी राहोपर
घिरे रहते हो अपनेही नियमोमे
शौकसे पहनते नहीं रंग अलग अलग
करते नहीं बाते अजनबीयो के साथ
जी रहे है अपनेही बनायें चौखटमें
तो यह समझ लो अच्छी तरह
आप धीरे धीरे मर रहे है!
अगर आप नहीं चाहते अपने आवेगोंको
नहीं महसूस करते मन की अशांतीको
कभी भुलकर भी नम होती नहीं आंखे
होती नहीं तेज दिलकी धडकन भावनाओंमें
तो ये समझ लो अच्छी तरह
आप धीरे धीरे मर रहे है!
अगर नहीं बदलना चाहते है जिंदगी
असंतूष्ट रहकरभी बदलते नहीं कामका तरीका  
नहीं छोड रहे निश्चितको अनिश्चितके लिये
करते नहीं पिछा किसी अद्भूत सपनोंका
नहीं करते कोई असमझदारीकी बात
करते नहीं स्वीकार मौजूद वास्तवता
तो ये समझलो निश्चित रूपसे
आप धीरे धीरे मर रहे हो!
 
आप धीरे धीरे मर रहे हो!


मरण उपरान्त....

मरण उपरान्त....

ले रहा था जब सांस, था मै जिंदा,
आता नही था कोई मिलने के लिये!
अब थम चुंकी है सांस मेरी तो
हर कोई आ रहा देखने के लिये!       

कोई साथ नही था, जब था रोता   
हसने भी कोई शामिल नही था!
अब सो रहा हू, गहरी निंदमे
आ रहे लोग कितने, रोनेके लिये!

देखो आज कितना ठाठ है मेरा
पाणी गर्म रखा, नहलानेके लिये!
जीते जी ना मिला ढंग का कपडा
शुभ्र वस्र लाया पहनानेके लिये!

रातदिन रहता था मै भूका
आता नही था कोई खिलानेके लिये!
अब साथही मेरे, भूक मिट चुंकी
चावल रखा यहां पकवानेके लिये!

दबाया जीन्होने अपने पैर तले
आये है वो श्रद्धांजली देने के लिये!
ना दे सके थे एक शब्दसे आधार
चार चार लोग आये, उठानेके लिये!

ले रहा था जब सांस, था मै जिंदा
आता नही था कोई मिलने के लिये!
अब थम चुंकी है सांस मेरी तो
हर कोई आ रहा देखने के लिये!

हर कोई आ रहा देखने के लिये! 
     
.......प्रल्हाद दुधाल.        



शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

"स्वप्नांमध्ये रचिल्या ओळी"

"स्वप्नांमध्ये रचिल्या ओळी"

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
गीत नवे आकारा आले
स्वप्नात गुणगुणलेले
जीवनगीत त्याचे झाले

स्वप्नामधले स्वप्नच ते
यत्न तोकडे साकाराया
अट्टाहास तो गेला वाया
साथ मिळेना ते गाया

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
ओळींचे आता अश्रू झाले
जागे होता विरून गेले
नयनातून ओघळले  

..... प्रल्हाद दुधाळ.

रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

समजून घे ...

समजून घे ...
लिखाण माझे रुचेना
विचार सच्चे पचेना..!
खोडून काढण्यासाठी
मुद्दाही ठाम सुचेना..!

गर्वात फुगते छाती
सुख दुजे पाहवेना..!
बेगडी विश्वाचे श्वास
प्राणवायूही पुरेना..!

माणूस असा रे कसा
बुध्दी विवेकी चालेना..!
भ्रमाने नैराश्य येई
रंग जीवनी भरेना..!

समजून घे खरे तू
खोट्यास जग फसेना..!
सत्य उघडेच आहे
जरी तुला ते कळेना..!
     ..... प्रल्हाद दुधाळ.

शनिवार, २६ ऑगस्ट, २०१७

गणनायका....

गणनायका....

वक्रतुंड तू गणनायक तू
शुभारंभाची तू देवता
असशी तूच बुद्धिदाता
विवेकही आम्हा दे आता !
माणसात माणूस नुरला
ऐहिकापायी स्वार्थाने ग्रासला
सावर तूच तू रे आता
विवेकही आम्हा दे आता !
भक्तीचे अवडंबर झाले
उत्सवात अनिष्ट माजले  
दाव मार्ग तू रे भक्ता
विवेकही आम्हा दे आता !
तवकृपेने लाभावी शांती  
सकल इच्छांची व्हावी पूर्ती
कळू दे इष्ट अनिष्टता
विवेकही आम्हा दे आता !

    .... प्रल्हाद दुधाळ.

रविवार, ३० जुलै, २०१७

श्रावण...

श्रावण.
हिरवाईने सजली धरती,
 गाणी गाती झरे बागडती!
 रिमझिम झरती या धारा,
फुलला रानी मोर पिसारा!
पांघरल्या त्याने ओल्या शाली,
सलज्ज लाली निसर्ग गाली!
आला आला श्रावण आला,
 उत्सव धरतीचा रंगला!
       .... प्रल्हाद दुधाळ.

मंगळवार, १८ जुलै, २०१७

अंतरातले ...

अंतरातले ...
अंतरात खोलवर
काही लपले लपले
कसे करावे उघडे
जीवापाड जे जपले!
कधी कोंडतो हा श्वास
सांभाळू मी कसे किती
झाले कठीण सहणे
हृदयास जे बोचले!
कसे फिरले हे वासे
फिरता हे माझे घर
कुठे कसे व्हावे व्यक्त
बोलू कोठे मनातले!
घडवते जे नियती
असेल का भल्यासाठी
अनुभवण्यास सुख
माणसाच्या जन्मातले!
नाही कोसणार भाग्या
एक क्षण म्हणशील
फेकलेल्या बाणांचेही
कसे येथे हार झाले !
..... प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, १२ जुलै, २०१७

नियती

नियती...
घडणार जे घडायचे
उगाच का ते रडायचे?
बांधले स्वप्नांचे इमले
पडणारे ते पडायचे!
विवेकबुध्दी गहाण ती
भाग्यास का ओरडायचे?
कर्माचे फळ ज्याचे त्याला
वादात का अडकायचे?
कशास कुणा नडायचे?
घडणार जे घडायचे !
 .... प्रल्हाद दुधाळ(पीके)

शुक्रवार, ३० जून, २०१७

कर्मफळे ..

कर्मफळे ..
पाण्यात आपण किती कळे ज्याचे त्याला 
फळ आपल्या कर्माचे मिळे ज्याचे त्याला! 
दवंडी साळसूद पिटतो जो तो इथे 
बुडाखाली जे जळे आकळे ज्याचे त्याला!
मुखवट्याआड चेहरे नराधमांचे
वास्तव अंतरातले छळे ज्याचे त्याला!
चाल प्रल्हादा ठरवलेल्या मार्गाने
पेरले जे त्याची कर्मफळे ज्याचे त्याला!
.... प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, २६ जून, २०१७

मजसवे ...

मजसवे ...
धुंद धुंद ही हवा मंद मंद गारवा!
आज सख्या वाटते मजसवे तू हवा!!

सांजवेळ अशी तुझ्याविना उदास ती!
बरसते डोळ्यातून आसवधार ही !!
कातरवेळी या अशा नव्याने रे भेटावा !
आज सख्या वाटते मजसवे तू हवा!!

दुरदेशी गेलास नी उदास मी इथे!
शोधते खुणा त्या आठवांच्या कुठे कुठे!!
घुमतो सदा इथे प्रितीचा हा पारवा !
आज सख्या वाटते मजसवे तू हवा !!

क्षण विरहाचे एक दिन विरतील !
भेट होता एकदा भेद ते मिटतील!!
 तमातही दिसतो आशेचा हा काजवा!
आज सख्या वाटते मजसवे तू हवा !!

धुंद धुंद ही हवा मंद मंद गारवा!
आज सख्या वाटते मजसवे तू हवा!!
     ...... प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, १९ जून, २०१७

मागणे....

मागणे...
उत्तरे मिळाली
 कालच्या प्रश्नांची ,
आज प्रश्न उभे
वेगळेच होते!
सोडविले गुंते
किती मी आयुष्या.
रोजची आव्हाने
नवे पेच होते!
मायेची भुरळ
जयांनी घातली,
घात करणारे
 पुन्हा तेच होते!
झालो ना शहाणा
 ठोकरा खाऊन,
मिळाले ते पुन्हा
 फटकेच होते!
आता देवा नाही
 मागणार काही,
घडणे पडणे
 कर्मानेच होते!
अनुभवानेच
शिकवावा धडा
जीवना मागणे
सदा हेच होते!
    ... प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, ३१ मे, २०१७

सुख

सुख...
माणसाशी माझ्यातल्या
कित्येकदा मी भांडतो...
माणूसकी कशी फोल
कैफियत ही मांडतो...
यत्न किती केले त्यांनी
खोटेपण रूजवाया ...
विवेकाने दिला दगा
कष्ट त्यांचे गेले वाया...
महात्म्याच्या मर्कटांनी
केले योग्य ते संस्कार...
केले नाही ते वावगे
आला अंगी सदाचार...
जर आहे मती ठाम
मनी ये ना कुविचार...
पारदर्शी वागण्याने
सुख जीवा मिळे फार...
     .... प्रल्हाद दुधाळ .

मंगळवार, ३० मे, २०१७

जाणीव

जाणीव.

जीवनात खोटे
वागणे बोलणे
नरकाचे जीणे
याच जन्मी.
आत नी बाहेर
निर्मळ स्वभाव
ब्रम्हांडात नाव
होते त्याचे.
जरी जग सारे
वाटे बिघडले
ज्याचा त्याला सले
गुन्हा मनी.
ध्यानात हे ठेवा
पहातो तो आहे
नोंद होते आहे
कुकर्मांची.
आयुष्य मोलाचे
आनंदाने जगू
विवेकाला जागू
सदैवच.
.... प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, २६ मे, २०१७

खेळ

आयुष्यात एकदाच माणसाने
खेळावा असा मनापासून डाव..!
असे जपावे जिवापाड भिडूला
चुकून बसू नये जिव्हारी घाव..!
.... प्रल्हाद दुधाळ

वंदन

सगळेच नमतात 
त्या उगवत्या सुर्याला..!
वंदन करावे कधी 
मावळतीच्या दर्याला..!
.... प्रल्हाद दुधाळ.