बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

असंच काहीतरी.....४.

असंच काहीतरी.....४.

दु:ख पचवायला
आनंद वाटायला
मनातली वादळे पेलायला
मनातले सल आतच ठेवून
चेहऱ्यावर सदैव स्मित मिरवायला
कपाळावरच्या आठया त्यागायला
आणि ....
प्रत्येक दिवस नवा समजून
क्षण क्षण  साजरा करायला
गरज असते....
एका सवयीची
हृदयाचा दरवाजा
सतत उघडा ठेवण्याची
सदा... सदैव!

   ....प्रल्हाद  दुधाळ.

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

असच काहीतरी....३ .

असच काहीतरी....३
आयुष्य माणसाच
आस्तित्व बेभरवशाच!
खरा समोरचा क्षण
स्थिर सदा असावे मन!
भविष्य वा भूतकाळ
करे बऱ्याचदा घायाळ!
स्वत:कडे निट बघ
माणूस म्हणून जग !
विचार कर  वेळच्या वेळेवर
सगळेच व्यर्थ  वेळ गेल्यावर !
अनुभवासाठी मागे बघावे
धडा घेऊन आयुष्य जगावे !
          ....  प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

असच काहीतरी ...2

असच काहीतरी .... २
कळत नाही आजकाल
वागाव अस की तस ?
गृहीत धरल जातय
मन होतय कसनुस!
तुमच काय बुवा
चिंतेच कारणच नाही
आमचे मात्र कायम
असे फाटक्यात पाय!
कुठे नेणार ही तुलना
आयुष्याशी कुणाच्या
बघणार कधी मग
डोकावून आत स्वत:च्या ?
प्रत्येकजण आपल
वाहून नेत असतो ओझ
कशाला विचारयच कुणाला
जड तुझ की माझ ?
        प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

असच काहीतरी....१ .

असच काहीतरी....१ .
मी माझ असा विचार करणाऱ्या 
स्वार्थी
माणसासारखीच
स्वत:च्या आसाभोवती
वर्षानुवर्षे फिरणाऱ्या
पृथ्वीवरचा आपला जन्म 
वाण नाही तर गुण लागणारच की 
संगतीचा !
फरक नक्कीच आहे 
स्वत:भोवती फिरता फिरता 
पृथ्वी फिरते सुर्याभोवतीही 
उत्कट प्रेमापोटी
युगानुयुगे 
पण माणूस 
पक्का स्वार्थी 
आत्मकेंद्री
जगणे त्याचे 
मतलबी!
.... प्रल्हाद दुधाळ.

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

गुन्हा

खरं बोलणंही आजकाल
होवू पहातो आहे तो गुन्हा
सज्जन माणसाला सहज
कुणी लावून जातोय चुना

शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

पती म्हणजेच परमेश्वर?

पती म्हणजेच परमेश्वर?

संसारगाड्याची या चाके ती दोन 

पळायला हवीच की भराभर
विचार आता हवे बदलायला
नाही पती म्हणजेच परमेश्वर!

तिने सांभाळायचे चूल नी मूल
राबायाचे त्याने फक्त घराबाहेर
स्वयंपाक बघावा त्याने रांधून
नाही पती म्हणजेच परमेश्वर!

शिकलेला तो याचंच का कौतुक
आहे तीही हुशार पदवीधर
तिलाही संधी देवून बघूया की
नाही पती म्हणजेच परमेश्वर!

नवरा बायको पातळी एकच
महिलाही आहे कामसू जबर
पुरे पुरूषाचा उदो उदो आता
नाही पती म्हणजेच परमेश्वर!

बदलत्या काळाची ओळखू भाषा
एकमेकाना सारखाच की आदर
दोघांची नक्कीच जबाबदारी घर
नाही पती म्हणजेच परमेश्वर!
......प्रल्हाद दुधाळ.