शुक्रवार, २५ जून, २०१०

भाकित!

भाकित!
ना भेटतात चेहरे भावणारे आता!
ना उरले जगी देव पावणारे आता!

थोडासा काय पाय वाकडा पड्ला,
टपलेत हिंस्र पशु चावणारे आता!

गोंगाट माथेफिरूंचा वाढला येथे,
स्तब्ध झाले पाय नाचणारे आता!

ढळला समतोल या वसुंधरेचा,
उभे संकट हे घोंगावणारे आता!

प्रल्हाद दुधाळ.

भगवंत.

भगवंत.

जगात माझ्या या, ना धर्म जात वा पंथ होता!
भेटला सह्रदय खरा तोच महंत होता!

रोज मिळे ठोकर नवी,लढाई नवी तेथे,
लागलेली ठेच अनुभवांचा नवा संच होता!

नव्ह्तेच समाधान भरल्या जरी तिजो-या,
कसला श्रीमंत तो,दरिद्री मनाचा रंक होता!

जपले जयांना असे की तळहाताचे फोड,
स्वकियांनीच त्या मारला विखारी डंख होता!

न मंदीरात गेलो ना हाताळली जपमाळ,
दगडात नाही, माणसात भगवंत होता!

प्रल्हाद दुधाळ.

बहाणे.

बहाणे.

जिंकले जेंव्हा लढाई,गळा पडले हार होते!
झेलण्यास शब्द तयांचे,हुजरे हजार होते!

पोटासाठी या करती अनेक चो-या लबाड्या,
ठेवणारे उपाशी तयांना, खरे गुन्हेगार होते!

मायभूमी साठी आपल्या सांडले रक्त जयांनी,
स्वातंत्र्यानंतर ठरले ते,झाले वेडे ठार होते!

उभारले अडथळे लाखो,उभी संकटे समोर ती,
ना घाबरता मानले त्या संकटांना यार होते!

मी वेळ द्यावी, तू ती न पाळावी,झाले कायमचे,
टाळण्यास मला शोधले,कित्त्त्येक बहाणे होते!

प्रल्हाद दुधाळ.

फुका मेला!

फुका मेला!
नाही कुणास आता चिंता,
तो कोण आला कोण गेला!
मस्तीत जगतो मी माझ्या,
रिचवतो पेल्यांवर पेला!
सजविले जगणे माझे,
आनंदाचा मुक्त हा ठेला!
हसते कोण रडे कोण,
म्हणती कोण फुका मेला!
प्रल्हाद दुधाळ.

प्रसंग

प्रसंग
काय सांगू आज तुझा भलताच रंग आहे!
आस्तीत्वाने तुझ्या येथे उठला तरंग आहे!

आवई आली येथे तुझ्या आगमनाची आता,
लढवण्यास नजर बांधला हा चंग आहे!

रोखती श्वास कोणी तेथे घायाळ कीती झाले,
मस्तीत स्वत:च्या कशी ग झाली तू दंग आहे!

नखरा तूझा ठसका तूझा न्यारी अदा तूझी,
कित्त्येकांची येथे जाहली समाधी भंग आहे!

यॊवनाची नशा येथे तूझी नजर मोहीनी,
रूपड्याने गुदरला भलता प्रसंग आहे!

प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०

मंगळवार, २२ जून, २०१०

पांडुरंग.

पांडुरंग.

असा रे विचलू देऊ नको मना.
असू शकेल नियतीची योजना.

कुणीतरी देई अजानता हात,
चाद्ण्यांची होईल काळोखी रात.

कधीतरी येईल पुन्हा ती जाग,
पुसला जाईल जीवनाचा डाग.

पदरात पडेल हवेसे दान,
मानव जन्माचे होईल कल्याण.

यशाने त्या नको जाऊ हुरळून,
अहंकार फुगा जाईल फुटून.

नको कर्मकांड नको तो सत्संग,
कर्तव्यात तुझ्या वसे पांडुरंग!

प्रल्हाद दुधाळ.

नाही.

नाही.
जगावे झाकून हे डोळे,
काहीही बोलायाचे नाही.
जगणे तुमचे असे हे,
कुणाशी तोलायाचे नाही.
सोसायाचे हे मुकपणे,
तोंड हे खोलायाचे नाही.
नाचले कुणी आनंदाने,
असे तू डोलायाचे नाही.
फुले वसंत बहरात,
तरी तू फुलायाचे नाही.
प्रश्न सारे ठेव मनात,
शब्द उच्चारायाचा नाही.
खाली झुकव ती नजर,
ताठा हा चालायाचा नाही.
प्रल्हाद दुधाळ.

नाते.

नाते.

माझी शब्दातीत गाणी!
तुझी ओळखीची वाणी!

जसे वा-याच्या तालावर,
बरसे पावसाचे पाणी!

त्याने ऎकले मागणे,
भेटली मनासवे मने!

जसे तालावर डफाच्या,
वाजू लागे तुणतुणे!

काय सांगावा ग त्या,
नियतीचा महीमा!

प्रेमभरल्या नात्याला,
नाही जात धर्म सीमा!
प्रल्हाद दुधाळ.

दिखावा.

दिखावा.
बरसना-यांचे ना होते नाव येथे.
गर्जना-यानाच मिळतो भाव येथे.

गुन्हेगार ठरतो रंक तो बिचारा,
उजळमाथी फिरे पापी राव येथे.

अर्धपोटी राहीना का जनता येथे,
महासत्तेचा डांगोरा भरघाव येथे.

ओळख ना पुरेशी भारतीय अशी,
जात धर्माने जाणती ते नाव येथे.

उदघोष चाले जरी तंटामुक्तीचा,
वादाविना नांदे एक न गाव येथे.
प्रल्हाद दुधाळ.

ते आम्ही!

ते आम्ही!

चुकिच्या उत्तरांची ती गणिते मांडतो आम्ही!
उत्तरांसाठी आभासी उगाच भांडतो आम्ही!

जीवन घडीचा डाव, जो उधळणार आहे,
जात धर्म प्रांता साठी हे रक्त सांडतो आम्ही!

नीती अनिती नियम कायदे ते कुणासाठी?
स्वार्थासाठी सगळे ते,खुंटीस टांगतो आम्ही!

हा जन्म जसा सत्ता नी संपत्ती साठीच आहे,
खुर्चीसाठी कुणाच्याही पायाशी रांगतो आम्ही!

ठकलो अनेक वेळा गिळले अपमान किती!
पड्लो जरी उताणे,नाक वरती सांगतो आम्ही!

प्रल्हाद दुधाळ.
9423012020

जोगवा.

जोगवा.
नमस्कार भाऊ,ओळखलत का ताई?
पाच वर्षात भेटायचा योगच आला नाही!
पुन्हा नशिबाचा कॊल मागावा म्हणतोय,
मतांसाठी तुमच्या दारोदार हिंडतोय!
सॊभाग्यवतीच स्वप्न लाल दिव्यात फिरतोय,
चिरंजिवासाठी बिअर बारच बघतोय!
दोघांच्या स्वप्नांसाठी निवडून यायचय,
सत्त्तेमधल सुख ते चाखून बघायचय!
सत्त्ता एकदा मिळाली की मागे बघणार नाही,
पाच वर्षात सात पिढ्यांच भल करायचय!
जागेचे भाव येथे भरमसाट वाढलेत,
कोट्यातल घर पदरात पाडून घ्यायचय!
गळफास घेणा-या बंधूंचे हाल बघवत नाही,
आत्महत्त्येसाठी सरळसोपं विष शोधायचय!
म्हणुन म्हणतो भाऊ विचार करा पक्का,
नावासमोरच बटण दाबून खुर्चीत बसवयाचय,
एकदाच मला हा जोगवा घाला तुम्ही ताई,
पाच वर्षे पुन्हा हा हात पसरणार नाही!
प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, २१ जून, २०१०

जगणे.

जगणे.

माणसांचे इथल्या काहीतरी बिनसले आहे.
मनामनाला अहंकाराने का ग्रासले आहे.

शब्दा शब्दात या भरली आहे विखारी कटूता,
सगळी सुखे पायाशी मनस्वास्थ्य नासले आहे.

नाही साधेसरळ बोलणे सदा स्वर टिपेचा,
संवाद संपला विसंवादात घर हरेक फसले आहे.

काय हवे तयांना कोठे जायचे आहे उमगत नाही,
स्नेहाळ शब्दांना हरेक मन तरसले आहे.

अशांतता अराजक सर्वत्र माजले आता येथे,
उलाघाल दाट्ली मनात जगणे त्रासले आहे.

प्रल्हाद दुधाळ.

गैरसमज.

गैरसमज.

माणसांना ज्या आयुष्यभर टाळले होते,
दु:खात माझ्या त्यांनीच आसू ढाळले होते.

फुल अर्पिले तुला जरी होते सुकलेले,
पाहीले मी तुझ्या गज-यात माळले होते.

रस्ता अवघड तो, वाट वळणांची आहे,
जाणुनही मार्ग काटेरी कवटाळले होते.

जंगलातली माणसे ती जसे पशुच ते,
साथ मिळताच ते माणसाळले होते.

पार्थिवाला माझ्या देता अग्नी कशाला?
आतल्या माणसाला केव्हाच जाळले होते.

प्रल्हाद दुधाळ.

क्रांती साठी.

क्रांती साठी.

वाटून घेतले एकमेकांत आभाळ आता!
एकदिलाने यासाठी जमले हे नाठाळ आता!

मिळाले कित्येक घाव जाहल्या जखमा किती,
नाही दुसरी दवा शिवाय येणारा काळ आता!

सुजलाम सुफलाम जाहला देश आमुचा,
सिध्द पिकविण्या सोने नांगराचे फाळ आता!

गाळला घाम ज्यांनी त्यांची झोपडी ही अंधारी,
उपट्ले श्रेय घ्याया अनेक वाचाळ आता!

नको त्या लढाया नकोत दहशतीची छाया,
समर्थ क्रांतीसाठी मॄदंग व टाळ आता!

प्रल्हाद दुधाळ.

कोणी?

कोणी?

केले तयांना असे बदनाम कोणी?
दाखविला विनाशी मार्ग वाम कोणी?

लागेना टिकाव त्या कपटी नीती ने,
धरला वेठीला प्रभू श्रीराम कोणी?

जन्म नासला यांचा त्या पाप कर्मांनी,
क्षालनास शोधले चारी धाम कोणी?

ही संपत्ती अन या आलिशान वस्त्या,
मरेतो या साठी गाळला घाम कोणी?

नाही हातास काम न पोटास घास,
पिऊन रक्त धरला हातात जाम कोणी?

माणसांचे जगणे पशुवत झाले,
नाकारले यांना होऊन ठाम कोणी?

प्रल्हाद दुधाळ.

काहीतरी चुकलेले.

काहीतरी चुकलेले.

भासते ते काहीतरी चुकलेले.
तोंड तुझे असे का ग सुकलेले?

रंग नेहमीचा तो आज का नाही?
काय नजरेत माझ्या खुपलेले.

ताठा नेहमीचा तो आज कुठे ग,
फुल कुंतलावर ते सुकलेले.

लगबग नेहमीची ती दिसेना,
रेशमी कापड चुरगळलेले.

रागाऊ नकोस अशी सखये ग,
गाव तुजसाठी चुकचुकलेले.

प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, १८ जून, २०१०

कांगावा.

कांगावा.

जरी आम्ही हे वाट्तो तुम्हांस बावळे,
तेच आम्ही शिवरायाचे प्रिय मावळे!

गांजले क्रूरतेने या दीन दुबळ्यांना,
करतात कांगावा तेच काढून गळे!

जल्लोष हा भजन किर्तनाचा चालला,
वेड लावते भक्तास रूप ते सावळे!

बियाणे पेरले तयांनी अशा भेदांचे,
कसे पिकणार तेथे एकतेचे मळे?

गर्जना अशी की जणू पोशिंदे जगाचे,
लागले तयांना माजो-या सत्तेचे चळे!

वागले जे मगरूर होऊनी या जगी,
पिंडास त्यांच्या नाहीच शिवले कावळे!

प्रल्हाद दुधाळ.

कशाला?

कशाला?

तुझ्या माझ्या जगी, जमाना कशाला?
रोज तुझा नवा, बहाना कशाला?

जगणे इथे महाकठिण झाले,
अर्ध्या घासात या, पाहुणा कशाला?

नशिबाची बात, नियतीची खेळी
एकमेकांवरी, निशाना कशाला?

कटू ही कहाणी, जगण्याची आहे
दाखविण्या खोटा, मुलामा कशाला?

माथेफ़िरूंचे राज्य, खुळ्यांची वस्ती
जगी एकटा या, शहाणा कशाला?

प्रल्हाद दुधाळ.

करार.

करार.
होकारात लपविले नकार होते.
खरेच लोक तेथले हुशार होते.

पोशाख गबाळा रहाणी अती साधी,
उच्च प्रतीचे परंतू विचार होते.

कुणावाचुन का न अडते कुणाचे,
घेण्यास आव्हान नवे तयार होते.

लागला येथे विसंवादी कसा सूर,
लोक एकमेकाशी बोलणार होते.

होता बो्लाचा भात बोलाचीच कढी,
केले लुटारूंशी छुपे करार होते.

प्रल्हाद दुधाळ.

कधी?

कधी?

मातापितरांचे फ़ेड्णार पांग कधी?
शहाण्यासारखा वागणार सांग कधी?

इशा-य़ा इशा-यामधे कुठ्वर बोलणे,
लागणार तुझ्या ग मनाचा थांग कधी?

जिकडे तिकडे गर्दी ही तुफान झाली,
देवा रे इथली संपणार रांग कधी?

येथे कुणासाठी कोणाकडे वेळ नाही,
रम्य पहाटेची ऎकणार बांग कधी?

जरी चालली नाकासमोरची वाट
आड मार्गातली टाळ्णार टांग कधी?

कुठ्वर चालणार नजरेचा खेळ,
नावाने माझ्या भरणार भांग कधी?
प्रल्हाद दुधाळ.

उपरे.

उपरे.

अनोळखी सारे तेथले चेहरे होते.
वाटते माझ्यासाठी त्यातले बरे होते.

शब्द कसले ती बोचरी हत्यारे बरी,
बोल असे पडले काळजा चरे होते.

चालतो जरी नाकासमोर च्या वाटा,
पारध करण्या लावले पिंजरे होते.

माणसांनी तेथल्या केला विरोध मोठा,
ह्र्दयात अनेक हळवे कोपरे होते.

संपविण्या येथुनी शिजतो कट आहे,
घेण्या फायदे जमले सारे उपरे होते.

प्रल्हाद दुधाळ.

आस्तीत्व.

आस्तीत्व.

मीच माझे आस्तीत्व चाचपाया लागलो.
गर्दीतली प्रतिमा ती जपाया लागलो.

भलताच अभिमान माझा कुणा होता,
आरशात शोधण्यास थकाया लागलो.

तसा म्हणतात जरा गुणवान होतो,
अवगुण खाणीत सापडाया लागलो.

नरक दरवाजात नव्हतो एकटा,
सोबती पाहुन गुणगुणाया लागलो.

मी कुठे एवढा कधी बहकलो होतो?
आता मी मला कसा आवडाया लागलो?

प्रल्हाद दुधाळ.

आभार.

आभार.

तुला झोंबले माझे शब्द फार होते.
शहाण्यांना त्या पुरे शब्दांचे मार होते.

तेथला मार्ग होता फक्त विनाशाकडचा,
तेथे फक्त उघडणारे आत दार होते.

होती धुंद मस्त नशा तीथे जगण्याची,
सोडणारे साथ ते माझेच यार होते.

बरे झाले वेळीच मजला जाग आली,
वाटेवरी तेथे पेटले अंगार होते.

कडेलोट होता होता वाचलो येथे मी,
मानले निर्मिकाचे पुन्हा आभार होते.

प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, १६ जून, २०१०

आपलासा!

आपलासा!

मम वागण्याचा काय करावा खुलासा!
एखादा शब्द माझा देतो कुणा दिलासा!

जगण्यास तयांच्या तो नवा अर्थ आला,
आशेस कधी त्या कोंब फ़ुटला जरासा!

आस्तीत्वाने तुझ्या इथे फ़ुलतो सुगंध,
विरहात सुटतो जीवघेणा उसासा!

वाटेकरी कुणी दुख:त नाही कुणाच्या,
फ़ुंकर एखादी करी कुणा आपलासा!

प्रल्हाद दुधाळ

आनंदाचे गाणे!

आनंदाचे गाणे!

कुदळ फावडे नांगर पाभर!
विळा खुरपे नाडा वा दोर!

नांगरणी पेरणी खुरपणी,
काढ्णी मळणी व भरणी!

हत्यारे माझी प्रिय कामे,
हेच माझे आनंदाचे गाणे!

नकोच मजला ऎश्वर्य ते,
सेझची मृगजळी आशा !

प्रिय मजला मातीतल्या,
कष्ट अन घामाची भाषा!
प्रल्हाद दुधाळ.

आतुर.

आतुर.

लागला जीवाला आता नवाच घोर आहे.
जवळी येथेच लपला चित्तचोर आहे.

पावसाची रिमझिम अन ऋतू हिरवा,
मनातला थुईथुई नाचतोय मोर आहे.

ना समजले काय घड्ली ती जादू,
पाहीला तो खरा का आभासी विभोर आहे.

गोकुळात वेड्यापिशा गवळ्याच्या पोरी,
कारण तयाचे नंदाचा तो पोर आहे.

पोर्णिमेची रात आणि अधिर चंद्र हा,
भेटीसाठी आतुरला वेडा तो चकोर आहे.

प्रल्हाद दुधाळ.

आठवणी.

आठवणी.
पुन्हा तोच फणा काढी,
आठवणींचा नाग!
किती जरी गिळला तरी,
येतो फार राग!
पोथ्या,किर्तन,योग समाधी,
चोखाळले किती मार्ग!
अहंकार अंतर्मनातला,
संपवू कसा सांग!
धुंडाळली गंगा जमना,
केले चारी धाम!
पुसला नाही गेला तरी,
चारित्र्याचा डाग!
प्रल्हाद दुधाळ.

अतिक्रमण.

अतिक्रमण.

झाले दयनीय त्यांचे जीणे.
खा्तात ते लोखंडाचे चणे.

वाट्मारी चाले सत्तेसाठी,
कशी मिटावी त्यांची भांडणे.

सरले काय उरले काय,
बदलले जनांचे वागणे.

तीच का संस्काराची पंढरी,
तेच का हेच शिवबाचे पुणे?

पसरण्या पाय दिली ओसरी,
बसले बळ्काऊन पाहुणे!

प्रल्हाद दुधाळ

गुरुवार, १० जून, २०१०

महासत्ता.

महासत्ता.
कापतो आम्ही एकेकाचा पत्ता!
व्हायचे आहे आम्हास महासत्ता!
कशाला हवे ते चुल आणि मुल,
भिरकावली ती संस्कारांची झुल!
सोड्ली आम्ही शिकायची यत्त्ता,
व्हायचे आहे आम्हास महासत्ता!
भल्या पहाटे्स कामाला लागतो,
मरेपर्यंत फक्त कष्ट्च करतो,
घामावर मिळेना पोटापुरता भत्त्ता,
व्हायचे आहे आम्हास महासत्ता!
कमावतो कमी खर्चतो जा्स्त आम्ही,
उपाशी जरी मिशीला तुप चोपतो आम्ही,
सोडला ना गावातला एकही गुत्त्ता,
व्हायचे आहे आम्हास महासत्ता!
जो बळी तो कान पिळतो येथे,
लाळघोट्यांनाच भाव मिळतो येथे,
कुणाच्या घामावर कुणाची सत्त्ता?
व्हायचे आहे आम्हास महासत्ता!
कापतो आम्ही एकेकाचा पत्ता!
व्हायचे आहे आम्हास महासत्ता!
प्रल्हाद दुधाळ.

मार्ग.

मार्ग.
जे दिले नियतीने तयाशी तड्जोड केली.
लिहीले होते भाळी त्यात न खाडाखोड केली.

या जींदगीत माझ्या सदा फ़सलो मी हमेशा
अशी इतकी जगण्यात मी धरसोड केली?

जोड्ण्यास मनास मने मी लाख यत्न केले,
जात धर्म प्रांतापोटी त्यांनी तोड्फ़ोड केली.

अशी कितीतरी कोडी सुट्ली ना कधी
ना पुसले कुणाला ना कुणी फ़ोड केली.

होता मिळाला जरी हा खड्तर मार्ग माझा
चट्णी भाकरी मिळाली तुजसवे गोड केली.

प्रल्हाद दुधाळ.

मी निवांत.

मी निवांत.
चुकलो कधी धड्पड्लो कधी!
रस्त्यात या कितिदा पड्लो कधी!
हार माझी मजला माहीत होती,
लुटूपुटू लढाई लढलो कधी!
ती वाट जरी होती विनाशकारी!
हट्टाने मार्गाने त्या चढ्लो कधी!
मामला होता खरा तर खुशीचा,
नशिबाच्या नावाने रडलो कधी!
भेट तुझी माझी ती झालीच कुठे?
दिवास्वप्नांत वेड्या गढ्लो कधी!
आभाळाचे छ्त दगड उशाला,
मी निवांत असा पहुडलो कधी!

रे माणसा!

रे माणसा!
काय तुझी ही जिंदगी रे माणसा!
वागणे पशूहुनी हीन रे माणसा!
स्वकियांचे स्वार्थात कापतो गळे,
स्वत:साठी किती जगतो रे माणसा!
येताना उघडा जाणार तसाच रे तू,
भरजरी वस्रांसाठी वेडा रे माणसा!
भरण्यास खळी पोटाची एक मूठ पुरी,
हपापला भरण्या तिजोरी किती रे माणसा!
ना बदलती ललाटरेषा नियतीने रेखल्या,
बदलण्य़ास प्रारब्ध किती लढा रे माणसा!
सुख-दुख:ची कळली नाही कधीच सीमा,
नाही समजले हे जगणे तुला रे माणसा!
समजुन घे एकदा शहाणपणा येथला,
वारशात फक्त उरते हे नाव रे माणसा!

वरात.

वरात.
अंत ना ही सुरूवात आहे.
जात्यात कोणी सुपात आहे.
आज भरले दिवस त्यांचे,
संकट तुझ्या दारात आहे.
गाफिलता न अशी कामाची,
धोका छुप्या त्या रूपात आहे.
कळपात मेंढरे ही सारी,
लांड्गा तो कळपात आहे.
येईल कोठून कसा घाला,
पहारा जरी दिनरात आहे.
माणसे कसली पशूच ते,
शहाण्यांची ही वरात आहे.
प्रल्हाद दुधाळ.

वार.

वार.

जाणिवांचे बंद केले आता दार त्यांनी.
पाठीमागुन केला होता तो वार त्यांनी.

कर्जात बुडून आत्मघात की हो केले,
संपविले दिला जगण्या नकार त्यांनी.

कितीक आले अन आसू पुसून गेले,
दिखाव्यापुरता घेतला कॆवार त्यांनी.

धड्गत नाहीच आता त्या दलालांची,
स्वाभिमानास दिली ही ललकार त्यांनी.

घेतला जनसेवेचा वसा मिळाली सत्ता,
वेचली अनितीने माया चिकार त्यांनी.

प्रल्हाद दुधाळ.

विनवणी.

विनवणी.
हे तुझे अशावेळी,
दर्शन सकाळी सकाळी!
जागविण्यास कोणी,
गायली ही भुपाळी!
तुझ्या आर्त हाका,
कोमेजली ग आशा!
कशास बोलते ती,
पुनर्जन्माची भाषा!
ठाऊक कुणा नाही,
कसे पल्याड्चे गाव!
सखये आताच लाऊ,
तुझ्यासमोर मम नाव!
प्रल्हाद दुधाळ

विसर.

विसर.

पाने इतिहासाची पुन्हा पुन्हा चाळू नको!
नयनातले अश्रू फुका,असे ढाळू नको!

घातली शपथ ओली,सुटली म्हण आता,
विसर दिली वचने,आता ती पाळू नको!

नकळत कधी जर ती आठवण आली,
जीव कुणासाठी उगा,असा हा जाळू नको!

कुणासाठी येथे कधी,हा थांबला न काळ,
जग मस्तीमधे एक क्षणही टाळू नको!

फेकुन दे शिळी, जुनी मुठीमधली फुले,
गजरा कुंतलावरी आता, त्याचा माळू नको!

प्रल्हाद दुधाळ.