शुक्रवार, ३० मे, २०१४

राशी - वर्तन.

 राशी - वर्तन.
 नको फाफट पसारा,कशास घोळ घालावा,
 नेमक्या स्पष्ट शब्दात, संवाद तो करावा
 मेष राशीचा स्वभाव जाणावा!(परखड)

 कशास फुका करावी,चिंता ती कुणाची
 काळजी मी घेतो,फक्त माझ्या मनाची
 ओळख ही अशी वृषभेची! (आत्ममग्न)

 वाढलो जरी वयाने, वागतो बालमनाने
 प्रश्न छोटे पडती तयाला,सुटती न बाललीला
 समजून घ्या अशा मिथुनेला!(बालिश)

 सदा कोमल वागणे,हळवा अती मनाने
 सदैव दुसऱ्याची चिंता,अती त्याची संवेदनशीलता
 कर्क मनाची ही मानसिकता!( हळवा)

 म्हणतो तसेच वागा,मतास दुजा नाहीच जागा
 मानावी आज्ञा माझी,न करतो पर्वा कुणाची
 ऐट कायम अशी सिंहाची(हिटलर)

 मनी सदा हजारो शंका,विश्वास कुणावरही नाही
 मनास बाधा संशयाची, कोंडी अधांतरी त्या मनाची
 गोची होते अशी सदैव कन्येची(संशयी) 

स्थिर अती तो मनाने, समतोल अन विचारी
समजून विचार मध्यम मार्गाने,खंबीरपणे सच्च्या बाजूने
समुपदेशन न्यायाचे होते तुळेने!(समतोल)

त्याशी नको घ्यायला पंगा, विंचूसारखा मारेल नांगा
नाही विचार दुज्या मनाचा,तत्काल उद्रेक सूडभावनेचा
खुनशी स्वभाव असे वृश्चिकेचा!(खुनशी)

कर्म आपले खरे मानू,की भावना ही मनाची
घालमेल असते कायमची,अवस्थ्या सदैव असे दुविधेची
असे मानसिकता ही धनुची (द्विधा)

उगा जन्म झाला,जगणे हे कशाला,
जीवनी सदा उदास अन निराशेने गांजलेला
पळपुटा असा मकरेत लपलेला!(निराशावादी)

विचारी आणि बुद्धिवंत,निर्णय होतो अभ्यासाने,
विचारवंत अशी ख्याती,यश सदा मिळविती
कुंभ ची अशी असे कीर्ती!(अभ्यासू)

नाही मनाची स्थिरता,नाही निर्णय क्षमता
कमी आहे आत्मविश्वास,रमणे सदा स्वविश्वात
मीन सदैव आत्म कोशात! (संभ्रमी)
           ......प्रल्हाद दुधाळ.

( नुकतेच व्यक्तीची रास आणि त्या राशीचे स्वभाव वाचनात आले आणि मग गंमत म्हणून कवितेत

गुंफले.कृपया गंमत म्हणूनच वाचावे ही विनंती.) ......प्रल्हाद दुधाळ. 

शनिवार, १७ मे, २०१४

काळ .

काळ .
येतो आणि जातो
कायम न रहातो
समजून घे
काळ हा!
उद्या होई नव्हते
आजचे जे होते
घडवी बदल
काळ हा!
कर्माचे फळ
येथेच मिळे
परीक्षा घेतसे
काळ हा!
समोर न त्याच्या
कुणाचे चालते
शिकवतो धडा
काळ हा!
.....प्रल्हाद दुधाळ.

 


गुरुवार, १५ मे, २०१४

आई

आई.
ती कधी न पाहिली थकलेली 
समस्येशी कुठल्या थबकलेली 
सुरकुतल्या हातात हत्तीच बळ 
आधार मोठा ती असता जवळ.
कोणत्याही प्रसंगी मागे ती सदा 
निस्वार्थ सेवा व्रुत्तीने वागे सर्वदा 
माया ममता सेवा भरलेल ते गाव 
सदा ओठी असु दे आई तुझे नाव.