रविवार, २४ ऑगस्ट, २०१४

तुझे भास पावसाचे.....

तुझे भास पावसाचे ...

शेत नांगूरन
केली मशागत
नंबरी बियाण
आणले पारखून
ती चाहूल लागता
केली औताची जुळणी
केली उधारी पाधारी
पेरले मातीत बियाणे
लावली आस नभाकडे
वाट पाहून पाहून
थकले रे आता डोळे
कधी आला आला वाटे
गेला हुलकावणी देउन
बियाणे नेती पाखरे वेचून
असे रे कसे देवा
तुझे भास पावसाचे ?
गळ्याभोवती दिसे कर्जापायी
ते फास अनर्थाचे !
         .......प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०१४

भास.

भास.

हे रंग हिरवे श्रावणाचे
उठले मोहळ आठवणींचे  
झाले धुंद श्वास अन
तुझे भास पावसाचे!
होता हातात असा हात
कोसळत होत्या सरी गात
हुरहूर अशी मनात अन
तुझे भास पावसाचे!
     .....प्रल्हाद दुधाळ.


सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

दही हंडी.

दही हंडी.
खुर्चीची दही हंडी
उंच अशी बांधली
गोविंदा पथकांची
गोची झाली!
करूनिया तयारी
पथके ही निघाली
विविध आयुधांनी
सज्ज झाली!
थरावर असे थर
रचतील शब्दांचे
भुलतील ते लोक  
खेळास या!
तो होईल गलका
शहाणे कसे तेच
तो उडेल धुरळा
आरोपांचा!
अशी येतील टोळकी
होईल तो दंगा
सत्तेचे नवनीत
लुटायला!  
  ....प्रल्हाद दुधाळ.





गुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४

हल्ली.

      हल्ली.
तिरकीच अनेकांची चाल हल्ली.
राजरोस होतो गोलमाल हल्ली.
बातमी कुसळाची मुसळाएवढी,
माध्यमांचा बाजारू सुकाळ हल्ली.
भावनांचा बाजार मांडला त्यांनी,
जातीधर्माची होतेय ढाल हल्ली.
कष्टकरी अर्धपोटी मरेना का,
गडगंज होतात दलाल हल्ली.
सत्ता संपतीची गणिते निराळी,
उधळती वेगळा गुलाल हल्ली.
        .....प्रल्हाद दुधाळ.


शनिवार, २ ऑगस्ट, २०१४

मैत्रीदिन.

मैत्री
असतं एक नात
स्वार्थाच्या पलीकडचं
रक्ताच्या नात्यापलीकडचं
सुख दु:खात आधाराचं
बालपणी हात धरून हुंदाडणारं
तरुणपणी अल्लड सळसळणारं
उत्सवात बरोबर नाचणारं
संकटात हाकेला ओ देणारं
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत!
 मैत्री
असतं एक नात
शब्दात न मावण्यासारखं
निखळ वाहत्या पाण्यासारखं
शुध्द शीतल हवेसारखं
सुगंधित फुलासारखं
कोवळ्या किरणासारखं
मौल्यवान हिऱ्यासारखं
साथ देणारं सावलीसारखं
अगदी अखेरच्या प्रवासापर्यंत!
           ......प्रल्हाद दुधाळ.
सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!