शुक्रवार, ३० जून, २०१७

कर्मफळे ..

कर्मफळे ..
पाण्यात आपण किती कळे ज्याचे त्याला 
फळ आपल्या कर्माचे मिळे ज्याचे त्याला! 
दवंडी साळसूद पिटतो जो तो इथे 
बुडाखाली जे जळे आकळे ज्याचे त्याला!
मुखवट्याआड चेहरे नराधमांचे
वास्तव अंतरातले छळे ज्याचे त्याला!
चाल प्रल्हादा ठरवलेल्या मार्गाने
पेरले जे त्याची कर्मफळे ज्याचे त्याला!
.... प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, २६ जून, २०१७

मजसवे ...

मजसवे ...
धुंद धुंद ही हवा मंद मंद गारवा!
आज सख्या वाटते मजसवे तू हवा!!

सांजवेळ अशी तुझ्याविना उदास ती!
बरसते डोळ्यातून आसवधार ही !!
कातरवेळी या अशा नव्याने रे भेटावा !
आज सख्या वाटते मजसवे तू हवा!!

दुरदेशी गेलास नी उदास मी इथे!
शोधते खुणा त्या आठवांच्या कुठे कुठे!!
घुमतो सदा इथे प्रितीचा हा पारवा !
आज सख्या वाटते मजसवे तू हवा !!

क्षण विरहाचे एक दिन विरतील !
भेट होता एकदा भेद ते मिटतील!!
 तमातही दिसतो आशेचा हा काजवा!
आज सख्या वाटते मजसवे तू हवा !!

धुंद धुंद ही हवा मंद मंद गारवा!
आज सख्या वाटते मजसवे तू हवा!!
     ...... प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, १९ जून, २०१७

मागणे....

मागणे...
उत्तरे मिळाली
 कालच्या प्रश्नांची ,
आज प्रश्न उभे
वेगळेच होते!
सोडविले गुंते
किती मी आयुष्या.
रोजची आव्हाने
नवे पेच होते!
मायेची भुरळ
जयांनी घातली,
घात करणारे
 पुन्हा तेच होते!
झालो ना शहाणा
 ठोकरा खाऊन,
मिळाले ते पुन्हा
 फटकेच होते!
आता देवा नाही
 मागणार काही,
घडणे पडणे
 कर्मानेच होते!
अनुभवानेच
शिकवावा धडा
जीवना मागणे
सदा हेच होते!
    ... प्रल्हाद दुधाळ.