सोमवार, २७ ऑक्टोबर, २०१४

बोलण्याने!

बोलण्याने!
किती दिवस पहाणार स्वत:चा अंत?
बाळगत रहाणार नशिबाची खंत!
हिमतीने भाग्यरेषा बदलायला हवी,
कोंडी ही आतातरी फुटायलाच हवी!
जीवन हे जगायच खेळत हसत,
कशास जगायचे असे धुसफुसत?
आतल्या आत असे नको बसू कुढत,
नको जगणे उगीच रडत खडत!
मोकळ वाटेल नक्कीच व्यक्त झाल्याने  
दु:ख हलके होत असते बोलण्याने!
          .........प्रल्हाद दुधाळ.


रविवार, २६ ऑक्टोबर, २०१४

मी माणुस.


  ...मी माणुस...  

लोढणे गळ्यात कुणाच्या, मी कदापि होणार नाही.!
जड झाले ओझे जरी, दूजा खांद्यावर  देणार नाही.!

हातास घट्टे पडले जरी, कष्टात तशा आनंद होता.
त्या खुशीच्या बदल्यात, अपेक्षा मी करणार नाही.!

अवगुणाने परिपुर्ण, जाणतो सामान्य माणुस मी.!
माणसासारखे वागू जगू द्या, गाभारी बसणार नाही.!

वाटेल जेंव्हा नकोसा, बिनधास्त सांगा ते त्याच वेळी.!
करतो आदर मनांचा, मी अडथळा उगा होणार नाही.!

जिंदगीत या हमेशा देत आलो, मी आनंद यथाशक्ती
अवहेलना नकोच माझी, घेतला वसा टाकणार नाही.!

                       ...प्रल्हाद दुधाळ...

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०१४

कृतज्ञता.


कृतज्ञता.
असे मिळाले आनंदी मानव जीवन
कोमल हृदय संवेदनशील सुमन!
ब्रम्हांडाने दिले मनोभावे जे मागिले  
सुबुद्धी समृद्धी अन नियमित धन!
गर्द ही हिरवाई पाणी हवा मोकळी  
आरोग्यसंपदा अशी मिळाली कायम!
माणुसकीचा अती सुंदर हा वारसा
जाणू शकतो परपीडा दु:खी मन! 
माया ममता साथ ही जिवलगांची
कोण पेरते जीवनी प्रसन्न हे क्षण! 
भल्याबुऱ्या प्रसंगी अचानक त्या  
शक्ती मिळते मम मनास कोठून? 
सृष्टीचक्र नियतीचे अविरत फिरते 
कधी इंद्रधनुचा देखावा विलक्षण!
अबोध अशा त्या शक्तीला त्या सृष्टीला  
सांज सकाळी कृतज्ञतापूर्वक वंदन! 
        .............प्रल्हाद दुधाळ.

  


शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

भेट.

भेट.
वर्षामागुन गेली वर्षे  पुसटले स्मृतीमधले नाव
झाली होती भेट कुठे ते विसरून गेले गाव
कित्येक दिवसांनी पुन्हा आज भेटलीस आणि
होऊन ताजे पुन्हा हुळहुळले लागले जुनेच घाव!

आठविल्या अवचित चाललेल्या संगे त्या वाटा
अवसेची ती रात्र किर्र आणि भवतालीचा सन्नाटा
कित्येक दिवसांनी पुन्हा आज भेटलीस आणि
आला  दरदरून घाम अंगावर सरसरून काटा!

आठविता आठवेना नंतरचे आपले ते जीवन
कसे विलगले जर एक होते अपुले तनमन
कित्येक दिवसांनी पुन्हा आज भेटलीस आणि
राहिलो वेचित हरवलेले स्मृतींचे कण कण!

असतील कदाचित नियतीने चितारल्या या रेषा
भरकटले तारू अन झाल्या भिन्न भिन्न या दिशा
कित्येक दिवसांनी पुन्हा आज भेटलीस आणि
चाळविली अचानक पाहिल्या रम्य स्वप्नांची भाषा!

नकोच शल्य  त्या निसटल्या मयूरपंखी दिनांचे
कृतज्ञ आहे संगतीतल्या धुंद मस्त त्या क्षणांचे
कित्येक दिवसांनी पुन्हा आज भेटलीस आणि
मिटले ते  संशय उतरले ओझेही मणामणाचे!
                     ..............प्रल्हाद दुधाळ.

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०१४

काळ.

काळ.
काळच असतो जालीम औषध
जीवनातील बहुसंख्य घावांवर
शरीर अथवा खोल मनावरच्या!
राहतात खुणा नावापुरत्याच
जखमा भरतातच सगळ्या!
क्वचित कधीतरी आयुष्यात
क्षण अवचित सामोरा येताच
नकळत मनी ठसठसते काही
अन्यथा वय वाढते तशा तशा
जखमा भरतातच सगळ्या!
वेगळ्या होतात जेंव्हा वाटा
जाणीवपूर्वक वा अगतिकतेने
ठेच लागताच आठवती पण
जखमा भरतातच सगळ्या!
जीवन हे असते आनंद यात्रा
साथ करतात सखे सोबती
नियतीच्या इशाऱ्या प्रमाणे
साथ कधी सुटते अचानक
जखमा भरतातच सगळ्या!
जीवन मानवी असेच असते
समस्या या क्षणोक्षणी असती
जगण्याची ती अवघड लढाई
कर्तव्यापुढे भावना गौण जरी
जखमा भरतातच सगळ्या !
.........प्रल्हाद दुधाळ.

 

 


बुधवार, १ ऑक्टोबर, २०१४

मनाची स्वच्छता.

मनाची स्वच्छता.
हवाच असायला स्वच्छ परिसर
एकदा मनाचीही स्वच्छता कर /धृ/
शरीर तर साफ असायलाच हव,
कपड्यांची काळजी घ्यायला हवी,
असाव उच्च राहणीमान जरूर,
चेहऱ्यावर असूदे हास्याची लहर,
एकदा मनाचीही स्वच्छता कर /१/
चोचले शरीराचे पुरवायला हवे,
चारचौघात उठून दिसायला हवे,
समाजात हवीच प्रतिष्ठा जबर,
असायला हवी स्वच्छ शालीन नजर,
एकदा मनाचीही स्वच्छता कर /२/
सुख समृद्धी तर असायला हवी,
तिजोरी कायमच भरलेली हवी,
फिरायला हवी आलिशान मोटर,
वेळ काढून बघ गरीबाच घर,
एकदा मनाचीही स्वच्छता कर /३/
बोलण्यात नी वागण्यात मेळ हवा,
आचरणात मानवीय संस्कार हवा,
हवे नीती अनीतीचे भान सत्वर,
असावी भेदाविनाची साफ नजर,
एकदा मनाचीही स्वच्छता कर /४/
विवेकबुद्धी सदैव जागीच हवी,
भल्याबुऱ्याची योग्य ती जाण हवी,
जाणायला हवे देह आहे नश्वर,
आनंद मुबलक हृदयात भर!
एकदा मनाचीही स्वच्छता कर /५/
             .............प्रल्हाद दुधाळ.