शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

भेट.

भेट.
वर्षामागुन गेली वर्षे  पुसटले स्मृतीमधले नाव
झाली होती भेट कुठे ते विसरून गेले गाव
कित्येक दिवसांनी पुन्हा आज भेटलीस आणि
होऊन ताजे पुन्हा हुळहुळले लागले जुनेच घाव!

आठविल्या अवचित चाललेल्या संगे त्या वाटा
अवसेची ती रात्र किर्र आणि भवतालीचा सन्नाटा
कित्येक दिवसांनी पुन्हा आज भेटलीस आणि
आला  दरदरून घाम अंगावर सरसरून काटा!

आठविता आठवेना नंतरचे आपले ते जीवन
कसे विलगले जर एक होते अपुले तनमन
कित्येक दिवसांनी पुन्हा आज भेटलीस आणि
राहिलो वेचित हरवलेले स्मृतींचे कण कण!

असतील कदाचित नियतीने चितारल्या या रेषा
भरकटले तारू अन झाल्या भिन्न भिन्न या दिशा
कित्येक दिवसांनी पुन्हा आज भेटलीस आणि
चाळविली अचानक पाहिल्या रम्य स्वप्नांची भाषा!

नकोच शल्य  त्या निसटल्या मयूरपंखी दिनांचे
कृतज्ञ आहे संगतीतल्या धुंद मस्त त्या क्षणांचे
कित्येक दिवसांनी पुन्हा आज भेटलीस आणि
मिटले ते  संशय उतरले ओझेही मणामणाचे!
                     ..............प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा