बुधवार, १ ऑक्टोबर, २०१४

मनाची स्वच्छता.

मनाची स्वच्छता.
हवाच असायला स्वच्छ परिसर
एकदा मनाचीही स्वच्छता कर /धृ/
शरीर तर साफ असायलाच हव,
कपड्यांची काळजी घ्यायला हवी,
असाव उच्च राहणीमान जरूर,
चेहऱ्यावर असूदे हास्याची लहर,
एकदा मनाचीही स्वच्छता कर /१/
चोचले शरीराचे पुरवायला हवे,
चारचौघात उठून दिसायला हवे,
समाजात हवीच प्रतिष्ठा जबर,
असायला हवी स्वच्छ शालीन नजर,
एकदा मनाचीही स्वच्छता कर /२/
सुख समृद्धी तर असायला हवी,
तिजोरी कायमच भरलेली हवी,
फिरायला हवी आलिशान मोटर,
वेळ काढून बघ गरीबाच घर,
एकदा मनाचीही स्वच्छता कर /३/
बोलण्यात नी वागण्यात मेळ हवा,
आचरणात मानवीय संस्कार हवा,
हवे नीती अनीतीचे भान सत्वर,
असावी भेदाविनाची साफ नजर,
एकदा मनाचीही स्वच्छता कर /४/
विवेकबुद्धी सदैव जागीच हवी,
भल्याबुऱ्याची योग्य ती जाण हवी,
जाणायला हवे देह आहे नश्वर,
आनंद मुबलक हृदयात भर!
एकदा मनाचीही स्वच्छता कर /५/
             .............प्रल्हाद दुधाळ.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा