बुधवार, ११ मे, २०१६

ते दिवस

ते दिवस .....

अशी ग कशी वेडे
दिवस अल्लड ते विसरलीस 
म्हणत तेंव्हा गाणी 
हातात हात घेऊन फिरलीस 
भटक भटक भटकलो
पावसात चिंब भिजलो 
भरताच ती हूडहूडी 
अलगद मिठीत शिरलीस 
माझा तूला तूझा मला
आधार होता किती 
आले भान जेंव्हा 
किती गोरीमोरी ग झालीस
वेड्या वयातले नाते ते 
त्याला नव्हतेच नाव 
वर्षे गेली किती 
नजरेस नव्हती पडलीस 
आज झाली गाठ अचानक 
पहाताच अशी लाजलीस 
आता आठव पुन्हा सारे 
म्हणताच मागे फिरलीस 
विसरून ते अल्लड नाते 
वेगळ्या विश्वात रम्य रमलीस 
---- © प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, ६ मे, २०१६

सूड

सूड
अदा पाहून तुझी मी झालो वेडा
हातात हात घालून फिरलीस
आणा शपथा धुंद क्षण प्रेमाचे
क्षणात अशी कशी विसरलीस

प्रेम म्हणावे की होते आकर्षण
इतकी जवळीक होती आपली
निर्णायक क्षण समिप तो येता
वाट  कशी झाली  मग वेगवेगळी

नकळत्या वयातले  वेडे चाळे
योग्यच झाले अशी बदललीस
फिरणे चरणे उगी हुंदाडणे
गुंतवून मज  सोडून गेलीस
      ,,,,,,,,प्रल्हाद दुधाळ.

मंगळवार, ३ मे, २०१६

सखी .

सखी
तुझी माझी गाठ ....
जन्मापासूनचीच !
भेटलीस पहिल्या श्वासाबरोबरच ...
मग रोजच ही भेट होत राहीली....
तुझ्यासोबत रहायचे म्हणजे ....
नरकयातना!
तुला सोडायला हवे ...
कळेपर्यंत ....
जगून सोसून  झाल  होते बरचं ,
सोप्पं नव्हतचं तसं तुला टाळणं,
आणि  एक  दिवस .... ठरवलं .....
नियतीच्या इच्छेप्रमाणे...
तुझ्या साथीनेच जगायचं ...
जेंव्हा हातात हात घालून फिरलीस,
दाखवलेस तुझे दशावतार...
विवंचना वाटून घेतल्या तुझ्याबरोबरच!
मी उपाशी तर तूही उपाशी
माझ्याबरोबर.... तुझेही हाल ...
कंटाळलीस माझ्याबरोबरच्या
हालापेष्टांना ....
आणि मग तुझा निर्णय ...
काडीमोड माझ्याशी कायमचा!
आनंदाने आपण वेगळे झालो ...
........गरीबी .......
तू मला सोडलस ....हात धरलास ....
....आनखी कुणाचा! बिच्चारा !
आणि  मग माझा घरोबा ...थेट ऐश्वर्याशी....
आता मी  स्वर्गीय आनंदात!
       प्रल्हाद  दुधाळ पुणे .

सोमवार, २ मे, २०१६

साथ



साथ.
सखे तू  छेड नवे तराणे
सूर तालात होऊ दे गाणे
गीत तुझे व्हावे ग डौलात
करीतो तंबोऱ्यावर मी साथ I१I

शतजन्माची गाठ आपली
सूर तालाची ही गट्टी झाली
अजब गायकीचा अंदाज
करीतो तंबोऱ्यावर मी साथ I2I

शब्द येती जे कंठामधुनी
ऐकतो मी ते जीव ओतुनी
सोडली जनामनाची लाज
करीतो तंबोऱ्यावर मी साथ I3I

जुळल्या आपल्या मन तारा
बेसूरतेला नाहीच थारा
येऊ दे वाह वाह ची लाट
करीतो  तंबोऱ्यावर मी साथ I४ I
  -----   (c) प्रल्हाद दुधाळ,पुणे