गुरुवार, २५ जून, २०१५

स्वप्न

ते आले......
चांगल्या दिवसाचे स्वप्न
दिवसाउजेडी दाखवून गेले
आम्ही अजूनही तिथेच!
मग आले.....
करू म्हणाले स्वच्छता
झाडू हातात फोटू पेपरात
आम्ही झाडतच आहोत!
पुन्हा आले...
योगासने करू म्हणाले
रिकाम्या पोटी कसरत केली
विपरीत आसन चालू आहे!
आता ....
रिंगमास्तरच्या तालावर,
उड्या मारू,उठाबशाही काढू,
त्या चांगल्या दिवसासाठी!


बुधवार, १० जून, २०१५

पाऊसधारा!

पाऊसधारा!
गर्जत,बरसत आल्या पाऊसधारा!
करी धुंद मजला,हा थंडगार वारा!
बोचरी अशी थंडी,सहन रे होईना,
ये ना आता जवळी, तू दे मला सहारा!
न्हाऊन निसर्ग हिरवा ताजातवाना,
गारठला मोर पहा, मिटला पिसारा!
बघ इथे दिसते,एक जादू निराळी,
गातोय तो नाचतोय,खळाळता झरा!
संगे तुझ्या भिजण्याची,झाली रे मनीषा,
एकटी मी इथे आणि तिथे तू बिचारा!
       ....... प्रल्हाद दुधाळ.

    

मंगळवार, ९ जून, २०१५

पाऊस.

पाऊस.
पावसाळा आला की
धस्स होतंय छातीत....
आता झोपडी शाकारावी लागणार
गोठ्यावर मेणकापड पाहिजे
दोन दिवसाचा खाडा कामाचा
शिवाय खर्च आला शे पाचशेचा
पावसाळा.....
एकदा सुरु झाला की
थांबायचं नाव नाही
मग वापसा होईपर्यंत
मजुरीही नाही...
पोटाच काय?
पाऊस.....
आडवा तिडवा
पडायला लागला की
सुमारच नसतो त्याला
कौलातून धारा
जमिनीवर तलाव
झोपायचे वांदे!
खायाचेही वांदे!
पाऊस.....
एकदा सुरू झाला की
सगळ कसं हिरवंगार
पण घरात चिकचिक
बाहेर चिकचिक
होते चिडचिड  
हाल हाल
जगण्याचे!

...प्रल्हाद दुधाळ.