मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

वाट.

वाट.
आस्मिता कुणाची इथेही भंगली आहे,
लाखोली शिव्यांची ओठी खोळंबली आहे.

उपाशी इथे जरी जवान त्या क्रांतीचे,
महफिल गुलाबी एक रंगली आहे.

नाही आळविले जरी तुकोबाने देवा,
गाथा इंद्रायणीमधे तरंगली आहे.

करिती टवाळी जरी माझ्या कल्पनेची,
कथा माझी वेदनेने ओथंबली आहे.

चालतोय आज इथे मी उंटाच्या चालीने,
बंडास्तव वाट ही अवलंबली आहे.
प्रल्हाद दुधाळ.
...........काही असे काही तसे!

बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०

माणसे अशी.

माणसे अशी.

अशी काही नको नको ती भेट्तात माणसे.
जगण्यातली मजा ती घालवतात माणसे.

उभा जन्म खाण्यासाठी जगतात माणसे
दात कोरूनही पोट ती भरतात माणसे.

आयुष्य सारे पॆशासाठी वेचतात माणसे
गच्च ती तिजोरी उपाशी मरतात माणसे.

जन्म मानवाचा व्यर्थ दवडतात माणसे
माणुसकीला बदनाम करतात माणसे.

अशा पुंगवांना कसे हो म्हणावे माणसे?
पुरा जन्म पशूसारखे वागतात माणसे.

प्रल्हाद दुधाळ.
काही असे काही तसे!

सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०

विनाकारण.

विनाकारण.
आपणच आपलं जगणं
अवघड करत असतो,
पालथ्या घड्यात पाणी
विनाकारण भरत असतो!
तोतस्सा ती ’तश्शी’,
विनाकारण बडबडत असतो,
साप साप म्हणून ब-याचदा,
भुईलाच बडवत असतो!
भिती चिंता कटकट वटवट,
करत असतो जीवनाची फरफट,
विनाकारण चडफडत असतो,
जगण अवघड करत असतो!
प्रल्हाद दुधाळ.