रविवार, ९ ऑक्टोबर, २०१६

संभ्रम.

संभ्रम .
मार्ग जो निवडतो खड्ड्यात मज नेतो,
करतो गणपती त्याचा मारूती होतो!
का असे घडावे मजला कळत नाही,
माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही!

रस्त्यात भेटलेले केले आपलेसे मी,
म्हटलो मी कधी ना तोंडी सदैव आम्ही!
 कुणी मज तरी आपला म्हणत नाही,
माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही!

संवेदना बोथट मन जसा दगड,
गोठला उत्साह झाली आत पडझड!
परपीडेने आता घालमेल होत नाही,
माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही!

प्रेम केले मी त्याचा मिळाला असा दंड,
झटक्यात असे मोडून निघाले बंड!
लढण्यास जिध्द राहीली मुळीच नाही,
माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही!

झालो विरागी आता केले किती सत्संग,
विसरून स्वतःला झालो नामात मग्न!
मोक्षाचा रस्ता तरीही सापडत नाही,
माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही!
        ...... प्रल्हाद दुधाळ .

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

तडजोड.

तडजोड.
अलिकडे दिवास्वप्ने मी मुळीच पहात नाही !
कारण माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही!
जवानीचा जोश होता
मस्ती अंगात होती
नशिबाची साथ होती
तशी सरळ वाट होती
सध्या आयुष्याचे काय झालय ते कळत नाही!
कारण माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही!
मंदीरे मठ शोधून झाले
ज्योतिषाचे उंबरे झिजले
नवस सायास कामा न आले
शेवटी एक ध्यानात हे आले
तडजोडी शिवाय प्रगती साधता येत नाही!
कारण माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही!
अडचणीतुन शिकता येते
अनुभवाची समृद्धी होते
समस्येतही संधी सापडते
माणुसकीची किंमत कळते
आता वास्तव स्विकारतो मी चडफडत नाही!
कारण माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नाही!

सत्य .

.....सत्य......
दिवस ढकलणे जगणे माझे
भेटीआधी तुझ्या घरावर ओझे

नशिब माझे म्हणे होते करंटे
वाटेवर होते अगणित काटे

पुकारत ते मजला कुचकामी
ओळख समाजात केविलवाणी

भुकेस कोंडा होता निजेस धोंडा
जेथे तेथे तुजसाठी मोठा लोंढा

भेटलीस तू खिसा खुळखुळला
अर्थ माझ्या खरा जीवनात आला

सत्य व्यवहारी जगाचे कळले
नोकरीने माझे भाग्य उजळले
,,,,,,,,,, प्रल्हाद दुधाळ

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

माझ्या मनाप्रमाणे......

माझ्या मनाप्रमाणें.....
स्वप्नांचे पतंग जरी उंच उंच जाई
माझ्या मनाप्रमाणें काहीच होत नाही!
आशेवरी उद्याच्या कित्येक जगती ते
पोटास आज  पुरे त्यांना मिळत नाही!
आनंद जिंदगीचा  फुका का दवडावा
ऐहिक कमावले सारे इथेच राही!
वागो कुणी कसेही मी हा सरळमार्गी
शापाने कावळ्याच्या गाय मरत नाही!
फासे जरी उलटे करतो सुलटे मी
हरलेले  डाव अंती जिंकलेत मीही!
              ...... प्रल्हाद दुधाळ.

रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

असच काहीतरी....६ .

असच काहीतरी ....६ .
शालेय  पुस्तकात,
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात,
प्रथम तू भेटला!
तीन माकडाच्या कथेतून
उमगत गेलास,
स्वातंत्र्यचळवळीतील तुझे
शांततेच्या मार्गाने लढणे,
खूप काही शिकवून गेल!
चिमूटभर मिठ उचलण्याने
ब्रिटिश साम्राज्य हादरू शकेल?
सामान्य माणसाच्या हे  बुध्दीपलिकडचे!
असा तू ....असामान्य.... महात्मा!
आज मात्र तुझ्या त्या तीन माकडांकडून
लोक मात्र वेगळच  शिकताहेत ....
आता अस  घडतय ...
चांगले  कुणी ऐकत नाही,
चांगले मुळीच पहात नाही,
चांगले बोलणे दुर्मिळ झालय!
बापू ,भारत स्वतंत्र झालाय,
पण इथली माणसे गुलाम झालीत.
      ..... प्रल्हाद दुधाळ.

असच काहीतरी ......५ .

असच काहीतरी...५ .

कितीदा पाटीवर पेन्सीलीने गिरवले
बोरूने त्याला घोटून घोटून घेतले
टाकाच्या नीबाने सदा वळण दिले
शाईच्या पेनाने पुन्हा पुन्हा लिहीले
मोत्यासारखे अक्षर जेथे तेथे मिरवले
संगणक आला आणि सगळे बिघडले
हस्ताक्षरात लिहिण्याचे कारण ना उरले
सराव लिहिण्याचा राहीलाच मुळी नाही
अक्षराला वळण आता ते उरलेच नाही
         ......   प्रल्हाद दुधाळ.