शुक्रवार, २५ जुलै, २०१४

सहजीवन.

सहजीवन.
तू विचारलस....
‘मी तुला जपतो’
...म्हणजे नक्की काय करतोस?
...ऐक सखे,सांगतो..
...जपतो म्हणजे....
तुझ्या मताचा आदर करतो,
तुझ्या मनाचा विचार करतो,
तुझ्या भावनांची कदर करतो,
हवं नको ची काळजी घेतो,
लाडिकपणे केलेले हट्ट पुरवतो,
आनंदाने करतो जीवाच रान...
...तुझ्या एका एका शब्दासाठी!
..बोलतो,वागतो कायम असा की-
नको चेहऱ्यावर तुझ्या किंचित नैराश्य रेषा!
हे सगळ असतं केवळ आनंदी सहजीवनासाठी!
...पण....पण....माझं काय?
मलाही माझी मत आहेत,
मलाही संवेदनशील मन आहे,
मलाही उत्कट भावना आहेत,
मलाही नक्कीच काही हव आहे-
जे काही खटकतय ते नको आहे,
मलाही हट्ट करायचाय तुझ्याकडे,
करशील का प्रयत्न पुरवण्याचा?
कधीतरी प्रेमाने वाटत तू म्हणावं...
‘किती दमतोस रे सोन्या’ ...
फिरावा आपुलकीने ओथंबला हात-
नकळत हळुवारपणे पाठीवरून....
कधी अलगद पडावी थाप शाबासकीची......
स्पर्शातून मिळायला हवाय संदेश...
“मी आहे ना!”
हे सुध्दा हवं आहे सुखी आनंदी सहजीवनासाठी!

                 .........प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, १८ जुलै, २०१४

माफी.

चुकल चुकून काही,
लगेच मागावी माफी.
चुकल कुणाच काही,
करुन टाकाव माफ .
बोलुन टाकाव काही,
खुपलेल मना मनात.
किल्मिष नकोच काही,
आनंदी नातेसंबंधात .
         ....प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, १६ जुलै, २०१४

नको रे पावसा.

नको रे पावसा.
नको नको रे पावसा,
नको अशी हुलकावणी,
तुझ्या वाटेकडे डोळे,
झळा उन्हाच्या संपेना!
नको नको रे पावसा,
अशी ओढ नको देऊ,
अवकृपा तुझी नको,
कसे राहू तुझ्याविना?
नको नको रे पावसा,
नको धरणीशी अबोला,
माणसाच्या साऱ्या चुका,
अंकुराचा काय गुन्हा?
नको नको रे पावसा,
नको लहरी वागणे,
अशी कोसळू दे धार,
होऊदे जोराचा धिंगाणा!
       .....प्रल्हाद दुधाळ.