शुक्रवार, २५ जुलै, २०१४

सहजीवन.

सहजीवन.
तू विचारलस....
‘मी तुला जपतो’
...म्हणजे नक्की काय करतोस?
...ऐक सखे,सांगतो..
...जपतो म्हणजे....
तुझ्या मताचा आदर करतो,
तुझ्या मनाचा विचार करतो,
तुझ्या भावनांची कदर करतो,
हवं नको ची काळजी घेतो,
लाडिकपणे केलेले हट्ट पुरवतो,
आनंदाने करतो जीवाच रान...
...तुझ्या एका एका शब्दासाठी!
..बोलतो,वागतो कायम असा की-
नको चेहऱ्यावर तुझ्या किंचित नैराश्य रेषा!
हे सगळ असतं केवळ आनंदी सहजीवनासाठी!
...पण....पण....माझं काय?
मलाही माझी मत आहेत,
मलाही संवेदनशील मन आहे,
मलाही उत्कट भावना आहेत,
मलाही नक्कीच काही हव आहे-
जे काही खटकतय ते नको आहे,
मलाही हट्ट करायचाय तुझ्याकडे,
करशील का प्रयत्न पुरवण्याचा?
कधीतरी प्रेमाने वाटत तू म्हणावं...
‘किती दमतोस रे सोन्या’ ...
फिरावा आपुलकीने ओथंबला हात-
नकळत हळुवारपणे पाठीवरून....
कधी अलगद पडावी थाप शाबासकीची......
स्पर्शातून मिळायला हवाय संदेश...
“मी आहे ना!”
हे सुध्दा हवं आहे सुखी आनंदी सहजीवनासाठी!

                 .........प्रल्हाद दुधाळ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा