मंगळवार, १९ मे, २०१५

अभंग.

अभंग.
सदा ओठी नाम
फुलविला मळा
विठ्ठलास लळा
सावताचा!
कर्म हीच भक्ती
सेवा विठोबाची
कांदा मुळा भाजी
पिकविली!
भक्ती आली फळा
भेटला सावळा
पावन तो मळा
देवे केला!
....प्रल्हाद दुधाळ.

प्रार्थना.

प्रार्थना.

सहण्याचे जे सत्य,धारिष्ट्य मिळू दे,
जीवनात ही घडी अशीच राहू दे!

नकोच मज समस्यांमधली मुक्ती, 
रहावी ईश्वरावर निस्सीम भक्ती, 
अनुभवांची हाव मनात राहू दे, 
जीवनात ही घडी अशीच राहू दे!

नको आळशी मरगळले ते जिणे,
बेफिकीर असूदे कायम जगणे,
हळवेपण आत असेच राहू दे, 
जीवनात ही घडी अशीच राहू दे!

दु:ख जीवनीचे कधी कोणा चुकते, 
फळ कर्मांचे योग्य येथेच मिळते, 
स्वीकारायाचे धैर्य सदैव लाभू दे, 
जीवनात ही घडी अशीच राहू दे!
.....@.......प्रल्हाद दुधाळ.
......


बुधवार, १३ मे, २०१५

समझदारी!

समझदारी!
घडलं काहीच नाही,आपल्या मनासारखं,
वाटायला मग लागते,जग वैऱ्यासारखं!
वाटत सगळ खोट,केवळ माझंच खर,
भरकटण विचारात अश्या, नाहीच बर!
विचार आपल्या मनाशी,एकदा करून बघा,
दिलाय आपण अनेकदा,स्वत:लाच दगा!
सल्ल्यांकडे मिळालेल्या,डोळेझाक किती केली?
आणा,भाका,दिल्या शब्दांशी,गद्दारी कशी झाली?
आयुष्यात का कधी आपण,वागलो नाही खोटे?
स्वार्थापोटी किती शब्द,बदलले छोटे मोठे?
करणे आरोप सोप्पं,पचवणे सत्त्य जड,
चिडचिड करत जगणे, बरी नाही खोड!
समझदारीने हवाय,आयुष्याचा स्वीकार,
विचार करून पहा,आयुष्य सुंदर फार !
                      .......प्रल्हाद दुधाळ.बुधवार, ६ मे, २०१५

मर्म.

मर्म.
चिंता ती कशाला
भूत भविष्याची
वर्तमानाची
जाण हवी!

गतकाळातील
निराशेचे क्षण
व्हावे विसर्जन
स्मृतींचे त्या!

भूतकाळी दार
करता ते बंद
निखळ आनंद
भविष्यात!

माणसांची जाण
प्रसन्न वागणे
आनंदी जगणे
हेच मर्म!
......प्रल्हाद दुधाळ.


मंगळवार, ५ मे, २०१५

जगण्यासाठी!

जगण्यासाठी!
 मनासारखं जीवनात सगळ,घडतंच असं नाही!
 उणे अधिक,गुणाकार,भागाकार,घडतं काहीबाही!
 असतात नियतीने आखलेल्या,जीवनतारूच्या दिशा,
 सुसह्य होण्यासाठी गरजेची,सत्य स्वीकारण्याची भाषा!
 सगे सोबती संगत करती,सन्मानाचा मार्ग दाविती,
 प्रेमाने नवी फुलता नाती,कशास ती भविष्याची भीती?
 क्षणभंगुर हे मनुष्य जीवन,गुंत्यांनी आयुष्य थांबते,
 तडजोडीचे गणित उमगता,जगणे सोपे हे होते!
 दु:ख मनीचे झटकून द्यावे,व्हावी ती सुरुवात नवी,
 आनंदाने जगण्यासाठी,जिद्द ती आणि मनीषा हवी!
                           .....प्रल्हाद दुधाळ.   


सोमवार, ४ मे, २०१५

गजरा.

गजरा .
आयुष्यभर निरपेक्ष केले त्याने प्रेम,
जीवनभरासाठी केला एक नियम!
दररोज तिला  सरप्राईज देईन,
मुकपणेच  प्रेम व्यक्त करीत राहीन!
तिच्या दारात हळू ठेवतो तो गजरा,
वेडेपणा पाहून हसतात नजरा!
दिवस गेले,वर्षे गेली ती बहात्तर,
झाली नाही कधीच ती नजरानजर!
अशी प्रीत आंधळी केली जीवनभर,
गजऱ्याचे वेड संपले  सरणावर!
           ....प्रल्हाद दुधाळ.
               04/05/2015.