बुधवार, ३१ मे, २०१७

सुख

सुख...
माणसाशी माझ्यातल्या
कित्येकदा मी भांडतो...
माणूसकी कशी फोल
कैफियत ही मांडतो...
यत्न किती केले त्यांनी
खोटेपण रूजवाया ...
विवेकाने दिला दगा
कष्ट त्यांचे गेले वाया...
महात्म्याच्या मर्कटांनी
केले योग्य ते संस्कार...
केले नाही ते वावगे
आला अंगी सदाचार...
जर आहे मती ठाम
मनी ये ना कुविचार...
पारदर्शी वागण्याने
सुख जीवा मिळे फार...
     .... प्रल्हाद दुधाळ .

मंगळवार, ३० मे, २०१७

जाणीव

जाणीव.

जीवनात खोटे
वागणे बोलणे
नरकाचे जीणे
याच जन्मी.
आत नी बाहेर
निर्मळ स्वभाव
ब्रम्हांडात नाव
होते त्याचे.
जरी जग सारे
वाटे बिघडले
ज्याचा त्याला सले
गुन्हा मनी.
ध्यानात हे ठेवा
पहातो तो आहे
नोंद होते आहे
कुकर्मांची.
आयुष्य मोलाचे
आनंदाने जगू
विवेकाला जागू
सदैवच.
.... प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, २६ मे, २०१७

खेळ

आयुष्यात एकदाच माणसाने
खेळावा असा मनापासून डाव..!
असे जपावे जिवापाड भिडूला
चुकून बसू नये जिव्हारी घाव..!
.... प्रल्हाद दुधाळ

वंदन

सगळेच नमतात 
त्या उगवत्या सुर्याला..!
वंदन करावे कधी 
मावळतीच्या दर्याला..!
.... प्रल्हाद दुधाळ.

टांगणी

स्वप्नांना मी आजकाल 
कोलदांडा तो घालतो
उधळणे त्यांचे आता 
जीव टांगणी लावतो
....प्रल्हाद 

आवड

आवडतात छोट्या समस्या 
आम्हाला सदा मिरवायला..!
इवली इवलीशी ती दु:खे 
पुन्हा तीच ती गिरवायला..!
....... प्रल्हाद दुधाळ.

सत्य

कोणी कोणाला कशाला
दोष देत ते फिरावे
कलियुगाचा नियम
करावे तसे भरावे
.... प्रल्हाद दुधाळ.

झुळूक

चढलेला पारा 
घामाच्या या धारा
झलक एकच 
थंडगार वारा
....प्रल्हाद 

बदल

कुणी कुणाशी ते वागावे कसे
प्रमेय तयाचे नाहीच असे...
बदल व्हावा वाटते ना जेव्हा
स्वत:लाही बदलावे जरासे...
.... प्रल्हाद दुधाळ .

उपदेशघाव ह्रदयावरचे कुरवाळू नको,
वेदना वाढते आत सुडभावनेने!
वाटते जर का जगण्याचे व्हावे गाणे,
सोडून सारे चाल पुढे सद्भावनेने!
..... प्रल्हाद दुधाळ.

मार्ग

आयुष्य आपले जगत रहावे
बरे वाईटात बघत रहावे
करणे तसेच भरणे असते
कर्म चांगलेच करत रहावे
.... प्रल्हाद दुधाळ.

माणूस

जात माणसाची 
वैगुण्यांची खाण
वेचावे ते गुण
एकेकाचे !
...प्रल्हाद दुधाळ.

गुलमोहर

गुलमोहराचा गुण घेण्यासारखा
तप्त उन्हातही बहरत असतो...
माणूस एवढ्यातेव्हढ्याशा दु:खात
सदा रडत कुरकुरत असतो...
,,,,,,,,,,,,,प्रल्हाद दुधाळ पुणे .

आई

मदर माता अम्मी वा मम्मी
माय अथवा म्हणू दे आई ....!
जगात निरपेक्ष स्नेहाचे
दुजे नाते आस्तीत्वातच नाही...!
..... प्रल्हाद दुधाळ.

अर्थ

हातच्या काकणाला
आरसा आहे व्यर्थ
पुरावा विवेकाचा
समजून घ्या अर्थ
.... प्रल्हाद दुधाळ.

मूठ

झाकली मूठ ती 
लाखाच्या मोलाची
करता उघडी
जखम खोलाची 
.... प्रल्हाद दुधाळ

रविवार, १४ मे, २०१७

हर दिन मातृदिन...

हर दिन मातृदिन.....
मातृदिन आज
उमाळे मायेचे
हर दिवसाचे
होवू देत.
आईसवे फोटो
सजल्यात भींती
कविता या किती
लिहिल्या हो.
स्मरतात सारे
उपकार तिचे
जग ते आईचे
गुण गाई.
एका दिवसाचा
नको हा देखावा
हर दिन व्हावा
मातृदिन.
सांभाळले तुम्हा
लावला जो जीव
असावी जाणीव
रात दिन.
थकलेली माय
ओझे नये होऊ
काळजी घे भाऊ
आईची रे.
पालक म्हातारे
अनुभवांचा ठेवा
उपयोग व्हावा
संस्कारांचा.
नात्यांचे हे दिन
उपयुक्त सारे
समजून घ्यारे
मोल त्यांचे.
मातृदिनी आण
जोपासेन नाती
नाहीतर माती
जीवनाची.
   ... प्रल्हाद दुधाळ.