बुधवार, २० जुलै, २०११

मनोगत खुडल्या कळीचे.

मनोगत खुडल्या कळीचे.
जगण्यातले आव्हान ते पेलायचे होते!
मातापित्यानो मला हे जग पहायचे होते!
झालात कसे तुम्ही एवढे कठोर?
अव्हेरले निसर्गदेणे नाकारून मम जगणे!
काय दोष माझा कळी खुडली अवेळी?
जीवनगाणे रम्य मला ते गायचे होते!
मातापित्यानो मला हे जग पहायचे होते!
ममतेचा झरा तो ह्रदयीचा कसा आटावा?
आगमनाचा माझ्या अपशकुन वाटावा?
नारी असुन स्रीजन्माचा अभिमान नसावा?
भलेबुरे जगातले या अनुभवायचे होते!
मातापित्यानो मला हे जग पहायचे होते!
मायभगिनींची महती कशी भुलले हो?
धरित्रीचा गळा तुम्ही कसा घोटला हो?
कशी आठवली नाही सावित्री जिजाई?
मानवतेचे मंदिर भव्य उभारायचे होते!
मातापित्यानो मला हे जग पहायचे होते!
प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
...........काही असे काही तसे!

शुक्रवार, ८ जुलै, २०११

खजिना.

खजिना.
कोण काय म्हणाले
नको करू चिंता मना.

मनासारखे जगावे
हीच ठेव कामना.

इच्छा आकांक्षा मनीच्या
दाबू नको रे अशा तू.

स्वच्छंदी जगून आनंदे
दे जीवना दिशा तू.

तुझा हात मिळाला
तुझा साथ मिळाला.

संसारात खुल्या सुखाचा
खजिना हातोहात मिळाला.
प्रल्हाद दुधाळ.
........काही असे काही तसे!

संकरित.

संकरित.
प्रत्येकजण संशयखोर या गर्दीत आहे.
हत्यारे आपापली हरेक परजीत आहे.

गातात महती एकता अन समानतेची,
माणुसकीचे वागणे परंतु वर्जीत आहे.

सांगतात गोडवे साध्यासरळ रहाणीचे,
पेहराव परंतु तयांचा भरजरीत आहे.

नावापुढे जनसेवकाची लावली उपाधी,
सत्ता तयांची परंतु घातल्या वर्दीत आहे.

असणार कसा मेळ वागण्याबोलण्याचा?
हे पेरले बियाणे तयांचे संकरित आहे.

प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

मोह.

मोह.
अगम्यसे आता काही घडाया लागले.
चेहरे नको ते का आवडाया लागले.

वर्षाव शिव्याश्यापांचा ज्यांनी होता केला,
अवचित पाया असे का पडाया लागले.

तो नकार कुरूप त्या चेह-यातला होता,
मनातल्या सॊंदर्यावर मन का जडाया लागले.

तरल आठवणींना गाडून मी आलो,
अवशेष असे का सापडाया लागले.

आदर्श परिवार होता मने अभंग होती,
एवढ्या तेवढ्या ने खटके का उडाया लागले.

आत्मा अमर आहे सोड मोह शरीराचा,
जाणुनही मन जगण्यास्तव धडपडाया लागले.
प्रल्हाद दुधाळ.
........काही असे काही तसे!

बुजगावणे.

बुजगावणे.

कंगाल आयुष्य इथले हरेक रडगाणे आहे.
भेटतो तो वाजवतो आपापले तुणतुणे आहे.

दुमदुमले रस्ते हे मोर्चा अन मिरवणुकांनी,
सत्तेसाठी जनतेला दिले हे हुलकावणे आहे.

विकला कुणी आत्मसन्मान अन झाला चेला,
का असावे इतके जीणे यांचे लाजिरवाणे आहे.

चाड नीती अनीतीची हवी कशास ही खोटी,
तुडवा पायी नका घाबरू ते बुजगावणे आहे.
प्रल्हाद दुधाळ.
.....काही असे काही तसे!

बरे नाही.

बरे नाही.

जीव लाऊन असे उगा टाळणे बरे नाही.
वेरहवेदनेत असे जाळणे बरे नाही.

चिंब प्रेमात पुरता भिजला होतो तुझ्या,
उपहासाच्या उन्हात या सोडणे बरे नाही.

रेखाटले स्वप्नचित्र भाबडे एक देखणे,
रेषा वाळुवरच्या अशा पुसणे बरे नाही.

धुंद स्नेहाळ सहवासाचा तुझ्या भुकेला मी,
भुकेल्याचा घास तो असा तोडणे बरे नाही.

घायाळ पुरता मी आता सहेना ही यातना,
एखाद्याचा एवढा अंत पाहणे बरे नाही.

चुकलो जरासा गुन्हा माझा आहे मला मान्य,
एवढीशीच चूक ती! रागावणे बरे नाही.
प्रल्हाद दुधाळ.
..........काही असे काही तसे!