शुक्रवार, २३ मार्च, २०१८

फसवणूक .


फसवणूक .

नाहीच माझ्या काही शंका उरात.
एकटाच शेवटी माझ्या घरात.

ओझी कुणाची उगाच ती वाहिली  
डोकावेना कोणी भग्न परसात.

पेरले बियाणे जरी ते फुलांचे
फोफावले काटे आता वावरात.

आव्हान स्वीकारले असे म्हणाले
पळाले पाय लावूनी ते रणात.

कुणास आता दु:ख ते मरणाचे
पार्थिवाचीही निघतेय वरात. 
             ....प्रल्हाद दुधाळ. 

बुधवार, २१ मार्च, २०१८

कविता.



कविता.

शब्दबध्द होईलच असे नाही
मनात असतेच कविता

ओठांवर येईलच असे नाही
मौनात असतेच कविता 

पाषाण कोरडा माणूस जर तो
हृदयात ठसतेच कविता

भावनांची भाषा जाणतो जो जो 
त्याच्यात वसतेच कविता 
     ..... प्रल्हाद दुधाळ. 

शनिवार, १७ मार्च, २०१८

कलियुग.


कलियुग.

बेफिकीर ते सारे मन्मानी करू लागले
आपल्याच कर्माने जितेजी मरू लागले

जन्मदात्यांचेही आता वाटे ओझे तयांना
स्वार्थांस्तव सांजसकाळी ठोकरू लागले

धैर्यशीलता न अंगी इच्छिले ते मिळाले    
समस्येने इवलाश्याही बावरू लागले

प्रतिष्ठा होती श्रमांना गेली लयास आता
गाळण्यास घामाला भले घाबरू लागले

लाऊन मुखवटा जगती नास्तिकतेचा  
भीतीने नरकाच्या मन पोखरू लागले  

काय ती वर्णावी कलियुगाची कथाव्यथा
जगल्याविनाच आयुष्य हे सरू लागले
..... प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, १ मार्च, २०१८

कधी ?

कधी ?
घेतो अाज मोकळा श्वास
खरे हे की केवळ भास?
बहरला वसंत जरी
म्हणती त्या फाल्गुनमास!
जीवानिशी जातोय कोणी
माध्यमां प्रसिद्धीचा ध्यास!
वाममार्गे गच्च तिजोर्या
संपेना तरीही हव्यास!
येणार कधी रामराज्य
संपेल कधी वनवास?
___प्रल्हाद दुधाळ.

बदल....

बदल....

किल्मिषे नात्यांतली त्या होळीत जाळतो मी
सांगतो खरेच आता विसंवाद टाळतो मी

विसरून तेजोभंगा सुरुवात नवी केली
दुखावल्या माणसांना हृदयात माळतो मी

कर्मफळ ज्याचे त्याला मिळणार इथे आहे
जाणीवेने नव्या या जुने पीळ टाळतो मी

जखमा जरी त्या ओल्या घाव विसरलो आहे
वचन दिले आत्म्याला कसोशीने पाळतो मी

प्रतिसाद थंड आहे माझ्या त्या जिवलगांचा
गुन्हा नक्की काय माझा आसू अबोल गाळतो मी
..... प्रल्हाद दुधाळ