बुधवार, ८ डिसेंबर, २०१०

उपरती!

उपरती!
यॊवनाने आता दिली ती हूल!
लागली पॆलतीराची चाहूल!



झुकला ना कधी मग्रुर ताठा,
आहे कबूल मला होती भूल!



न उमेद, न तो जोम राहीला,
झालो वयस्क हे सत्त्य बिल्कुल!



मस्तीत सदा, ना पर्वा कशाची,
मी माझ्यात होतो सदा मश्गुल!



शल्य हे, रहातो उप-यासारखा ,
नाती गोती होती, बेगडी झूल!
प्रल्हाद दुधाळ.

क्रूतघ्न!

क्रूतघ्न!
आवाज आला पुन्हा जोरदार टाळ्यांचा!
उबग येतो या, राजकारणी चाळ्यांचा!

ठप्प ती सभा सारी, गप्प ही लोकशाही,
रोज नवा अंक उघडतो, घोटाळ्यांचा!

मिळताच सत्ता ती, नेते क्रूतघ्न झाले,
म्हणती ते जनता जमाव बावळ्यांचा!

लुटण्यास कट्टर शत्रूही एक झाले,
ना गंधही आता, त्या उकाळ्या पाकाळ्यांचा!

संवेदना त्या आता,त्यांना सोडून गेल्या,
न उरे एहसास, रस्त्यातील किंकाळ्याचा!
प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०१०

दिवाळी २.

दिवाळी २.
नाते प्रकाशासी नव्या सांगते दिवाळी!
अंधाराला लांब दुर टांगते दिवाळी!
कष्ट्ना-या जीवाला थोडा देते दिलासा,
बळीराजाला सुख ते दावते दिवाळी!
जीवनाला भेटतसी नव नव्या दिशा,
भटकल्या मनाला स्थिरावते दिवाळी!
गांजल्या दारात सदा दारिद्र्याचा सडा,
भुकेल्या तोंडी गोड भरवते दिवाळी!
अशी उत्साहाने साजरी होते दिवाळी,
स्नेह नाती नव्याने रुजवते दिवाळी!
प्रल्हाद दुधाळ.
५.११.२०१०.

बुधवार, ३ नोव्हेंबर, २०१०

दिवाळी!

दिवाळी!
वसू बारस धनतेरस,नरकचथुर्दशी,
लक्ष्मी पुजनाची धूम,उडते घाई!
आज येथे जल्लोश, वाजती फटाके,
रंगारंग रांगोळी दारी,केली रोशनाई!
भरजरी वस्रांनी नव्या,सजले सारे,
पाडव्याची पहाट,वाजे सुरेल शहनाई!
केले सुवासिक अभ्यंग,पसरला सुगंध,
ताटी पंचपक्वानांची मधुर मेजवानी!
भाऊबिजेला ती बंधुची, घडे स्नेहभेट,
लाभते बंधुप्रेमाची आगळी ओवाळणी!
परंपरा जरी ती जुनी, गाजते दिवाळी,
साजरे करूया सण,नव्या नव्या अर्थांनी!
प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

वाट.

वाट.
आस्मिता कुणाची इथेही भंगली आहे,
लाखोली शिव्यांची ओठी खोळंबली आहे.

उपाशी इथे जरी जवान त्या क्रांतीचे,
महफिल गुलाबी एक रंगली आहे.

नाही आळविले जरी तुकोबाने देवा,
गाथा इंद्रायणीमधे तरंगली आहे.

करिती टवाळी जरी माझ्या कल्पनेची,
कथा माझी वेदनेने ओथंबली आहे.

चालतोय आज इथे मी उंटाच्या चालीने,
बंडास्तव वाट ही अवलंबली आहे.
प्रल्हाद दुधाळ.
...........काही असे काही तसे!

बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०

माणसे अशी.

माणसे अशी.

अशी काही नको नको ती भेट्तात माणसे.
जगण्यातली मजा ती घालवतात माणसे.

उभा जन्म खाण्यासाठी जगतात माणसे
दात कोरूनही पोट ती भरतात माणसे.

आयुष्य सारे पॆशासाठी वेचतात माणसे
गच्च ती तिजोरी उपाशी मरतात माणसे.

जन्म मानवाचा व्यर्थ दवडतात माणसे
माणुसकीला बदनाम करतात माणसे.

अशा पुंगवांना कसे हो म्हणावे माणसे?
पुरा जन्म पशूसारखे वागतात माणसे.

प्रल्हाद दुधाळ.
काही असे काही तसे!

सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०

विनाकारण.

विनाकारण.
आपणच आपलं जगणं
अवघड करत असतो,
पालथ्या घड्यात पाणी
विनाकारण भरत असतो!
तोतस्सा ती ’तश्शी’,
विनाकारण बडबडत असतो,
साप साप म्हणून ब-याचदा,
भुईलाच बडवत असतो!
भिती चिंता कटकट वटवट,
करत असतो जीवनाची फरफट,
विनाकारण चडफडत असतो,
जगण अवघड करत असतो!
प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

नियतीचा गुलाम.

नियतीचा गुलाम.
स्वत:भोवतीच फिरणा-या अवनीवर
जेंव्हा मी फेकलो गेलो तेंव्हा......
लक्षात आलं ...इथे मी एकटाच नाही!
इथेही सगे सोयरे मित्र मॆत्रिणी सारे सारे आहेत!
चिटोरीभर पदवीवर जेव्हा चाकरी मिळेना तेव्हा...
घरच्यांनी घराबाहेरचा रस्ता दाखवला आणि ....
सांगीतलं एक कटू पण सत्त्य!
पाणी जेव्हा नाकापर्यंत येतं तेंव्हा-
पोट्च्या पिलालाही पायाखालीच घ्यावं लागतं... नाईलाजानं!
बागेमधे प्रेयसीने हातातला हात सोडऊन घेत
हळूच जमिनीवर आणलं....
नुसत्या प्रेमावर नाही जगता येत काही!
त्यासाठी लागतो पॆसा! एकवेळ प्रेम नसलं तरी चालतं!
महीनाभर मर मर कष्ट करून जेव्हा पाकीट भरलं तेव्हा...
बायकोनं बजावलं.......
तुमच्या घामावर हे नोटाचे कागद उगवले नसते तर...
.......तर... मी तुम्हाला कधीच स्विकारल नसतं!
.....वॆतागानं मी ओरड्लो......
अरे तू आहेस तरी कोण?
चारही दिशांनी आवाज आला..........
तू गुलाम आहेस!
नियतीचा गुलाम आहेस!
......प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

होळी.

होळी.
साद माझी आर्ततेची ती वा-यावरी उडून गेली
प्रतिसाद नाही मिळाला समजुनी तु रूष्ट झाली.


कथा तुला कथण्याची ती शब्दाविणा राहून गेली
कल्पित एक कथा गुंफित तू मात्र निघून गेली.


होतीस तू बेपर्वा ना फिकिर कुणाची केली
मस्करी अंगाशी आली अन शपथ ती खरी झाली.


क्षणोक्षणी आठवण दाटे जगण्याची चव गेली
सारा डाव मोड्ण्या नियतीने शर्थ उगाची केली.


सहजीवनाची याद सुखाच्या खरेच कधी आली?
विरहाने कायमची जीवनाची माझ्या होळी झाली.
प्रल्हाद दुधाळ.
.....................काही असे काही तसे!

सखे.

सखे.
सखे साथ ही जन्मोजन्मीची
चुकलं माकलं सुधारून घे.

अनुभवातूनच येतं शहाणपण
पाऊल वाकडं सावरून घे.

वागण कधी नसतं वावगं
मागील कारणं जाणून घे.

शंका मनातली नाही बरी
मनातलं खरं विचारून घे.

तुझ्यासाठी मी माझ्यासाठी तू
जीवनातलं मर्म समजावून घे.
प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

गुलाम.

गुलाम.

संस्कार आणि परंपरांचे त्या
डोक्यावरती मोठे झाले ओझे
पश्चिमेच्या बेफाम वा-यात या
झिंगतोय आम्ही बेभान आहे.

आता फक्त येथे चालते भाषा
कोरड्या शुद्ध या व्यवहाराची
कशास नातीगोती ही सांभाळू
माणुसकी झाली बदनाम आहे.

वाहते ही आता उलटी गंगा
नवसहस्रकाचे वाण आहे
मनामनातली दरी वाढतेय
बाकी सगळ छान छान आहे.

उगवतीच्या सुर्या नेहमीच
सगळ्यांचा सदा सलाम आहे
किती करा वल्गना प्रगतीच्या
माणूस नियतीचा गुलाम आहे.

प्रल्हाद दुधाळ.
........काही असे काही तसे!

गाडा हा.

गाडा हा.

कुणापुढे आयुष्याचे
उभे ठाकले आव्हान
जगण्याच्या लढाईत
कोणी झाले गतप्राण.

काही जन्माला येताना
सम्रुद्धीचा ओठी प्याला
सर्व सुखे असुनी
रडण्यात जन्म गेला.

कोण जगे कशासाठी
ज्याचे त्याला ठावे नाही
मुर्दाडाचे जगण्याला
ध्येय्य वा दिशा नाही.

कोणी लोभी वा लोचट
वाकला कयम कणा
जन्माला यांना घालूनी
निर्मिकाने केला गुन्हा.

या भयाण जगामधे
कोणी महात्मा भेटतो
सा-या जगाचा तो गाडा
त्याच्या कर्माने रेटतो.

प्रल्हाद दुधाळ.
.........काही असे काही तसे.

इशारा!

इशारा!
आस्तित्व हे सांभाळ आता
बदलला रे काळ आता.

दुर्दॆवी फे-यांशी येथल्या
जोडली रे नाळ आता.

संपविण्या तुला येथुनी
शिजतेय ही डाळ आता.

सुंभ केव्हाच जळाला
हा पिळही जाळ आता.

ही वॆ-याशी फाजील दोस्ती
घालणार तो घोळ आता.

जरी सज्जनांची एकी
दुर्जना गळा माळ आता.

सावध जाणुन इशारा
मुखवट्यांना टाळ आता.

प्रल्हाद दुधाळ.
..........काही असे काही तसे!

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०१०

कधीतरी वेड्यागत!

कधीतरी वेड्यागत!
रात्रभर चांदणे मोजत जागायला हवं!
कधी पुन्हा अस वेड्यागत वागायला हवं!
लपाछपी विटी दांडू रंगला गोट्यांचा डाव,
खो खो लंगडीत बालपण शोधायला हवं!
एकदा तरी ती फेकावी पोक्तपणाची झूल,
चिंब पावसात मनसोक्त भिजायला हवं!
घडता काही मनासारख फोडावी किंकाळी,
सोडून लाज गडगडाटी हसायला हवं!
नको सदा पाप पुण्य जन्म मरणाची भिती,
आता तरी मस्त गात गाणे जगायला हवं!
प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, ९ ऑगस्ट, २०१०

नशा.

नशा.
आजच्या घाईगर्दीत उद्याचा भरवसा आहे!
प्रत्येकाच्या मनात लपलेला एक ससा आहे!
मी कशाला माझा हा मार्ग असा वाकडा करावा?
सरळमार्गी चालण्याचा घेतला तो वसा आहे!
जीवन त्यांचे इतके का हे बापुड्वाणे आहे?
जगणे येथे खरे तर सुंदरसा जलसा आहे!
हपापल्या माणसांची अशी ही झुंबड उडाली येथे,
जगण्यास पुरेसा जरी मुठ्भर पसा आहे!
हरघडीला आव्हानांनी जगण्यास अर्थ आला,
क्षण प्रत्येक नव्याने जगण्यात ती नशा आहे!
प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, २३ जुलै, २०१०

आषाढधारा.

आषाढधारा.
बरसल्या धुवांधार आषाढधारा!
करे मजला धुंद, हा थंडगार वारा!
ही बोचरी थंडी, सहन रे होईना,
ये ना जवळी तू मला सहारा!
न्हाऊन सारा निसर्ग ताजातवाना,
गारठून मोरानेही, मिट्ला पिसारा!
पहा तू इथे एक जादुच झाली,
नाचुन गातोय हा खळाळता झरा!
धुंदीत संगे नाचण्याची उर्मी मला,
मी एकटी येथे अन,तू तिथे बिचारा!
प्रल्हाद दुधाळ.
काही असे,काही तसे!

शनिवार, १७ जुलै, २०१०

मेळा.

मेळा.
पंढरीच्या वारी मधे
ठेका भजनाचा लागला.
कुणी भजे मोक्षासाठी
कुणी पोटासाठी चालला.

वॆष्णवांचा जमला मेळा
भेटेल त्यांना सावळा.
संतांसंगे किर्तन रंगे
मळा भक्तीचा फुलला.

बहरला उत्सव असा
भेटती भक्त उराभेटी.
मराठी मुलखाचा न्यारा
महामेळा हा रंगला.
प्रल्हाद दुधाळ.
...........काही असे काही तसे!

शुक्रवार, १६ जुलै, २०१०

नाती.

नाती.
अशी जगण्याची उर्मी देतात काही नाती.
मात्र जगणे नकोसे करतात काही नाती.
मुलखात परक्या आहे कोण कुणासाठी,
जुळती तरीही जिव्हाळ्याची काही नाती.
अचानक उभी ठाके मालिका संकटांची,
घट्ट मागे आधारास येती काही नाती.
कधी वागते कुणी जसे हाडवॆर आहे,
जगणे अवघड करती हे काही नाती.
माणुसकी नात्याने जुळती काही नाती,
रक्तापेक्षाही महान असती काही नाती.
प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

गुरुवार, १५ जुलै, २०१०

चुरगळले स्वप्न.

चुरगळले स्वप्न.
जगताना इथे केव्हाच हे कळले होते.
भरजरी वस्र चारित्र्याचे मळले होते.
ती जवानीची मस्ती, होते उनाड वय ते,
उमगले हे जेव्हा,स्वप्न चुरगळले होते.
ठाऊक नाही कशी फितुरी मनाने केली,
क्षणभंगुर सुखासाठी कशी चळले होते.
जगणे हे मरणाहुनी भयंकर झाले,
कळले हे सारे पण कुठे वळले होते.
प्रल्हाद दुधाळ.

जागर.

जागर.
हाती न धरले शस्र, केल्या तरी लढाया.
पराक्रमाने त्यांच्या शत्रू लागे लड्खडाया.
तो जोश अनोखा,माणसे जिध्दीची होती,
खंबीर मनाने झाल्या तेव्हा यशस्वी चढाया.
नाकर्तेपणा भिनला आता,भय मनी आहे,
माजता दहशत नेतेच लागती रडाया.
करती ते वल्गना आमुलाग्र बदलांच्या,
आचरणात न येती, खोट्या त्या बढाया.
जनताजनार्दना आता जागवी स्वत:ला,
ललकार असे की शत्रु लागे गडबडाया.
प्रल्हाद दुधाळ.

मेवा.

मेवा.
आयुष्याच्या जमाखर्चाचा,
घालतोय मेळ!
ताळेबंद हा मांडण्याची,
हीच खरी वेळ!
भेटल्या माणसांनी ती
घातली अशी कोडी!
फार तेथली सोंगे अन
रात्र फक्त थोडी!
संकटांना जेव्हा केव्हा
जीवनात भेटलो!
समजून आव्हान नवे
पुन्हा मी पेटलो!
दिवस रोजचा जाणीवेने
जगतो हा नवा!
अनुभवांचा रोज चाखतो
तो कडूगोड मेवा!
प्रल्हाद दुधाळ

सवय.

सवय.
असुनी मर्द हे आम्ही,सोसण्याची सवय झालीय!
मुर्दाडासारखे जगण्याची,आता सवय झालीय!
पेटवा दंगे मारा कुणीही,जाळा या खुशाल वस्त्या,
रक्तबंबाळ जीवनाची,आता सवय झालीय!
करा तुम्ही नेहमीच्याच आश्वासनांची बरसात,
खोट्या स्वप्नातच जगायची,आता सवय झालीय!
नाही मिळाले तरी,बसणार गप्प गुमान आम्ही,
उपाशी रहायची काहीशी,आता सवय झालीय!
भरा तुम्ही आपली गोदामे,करणार कष्ट आम्ही,
जीवंतपणीच्या यातनांची,आता सवय झालीय!
प्रल्हाद दुधाळ.
....काही असे काही तसे!

शनिवार, ३ जुलै, २०१०

तुझ्याविना…… आई ……

तुझ्याविना…… आई ……

वात्सल्य करूणा माया ममता,
ह्र्दयात भरली ठाई ठाई,
त्यागास त्या तव लेकरांस्तव,
वर्णावयास योग्य शब्द नाही!
तव कष्टास त्या सीमा नव्ह्ती,
संकटांची मालिका ती भवती,
हसतमुखी गाईली अंगाई,
कसे ग आम्ही होऊ उतराई!
सुसंस्काराची ती दिली शिदोरी,
स्वाभिमानाची बळकट दोरी,
आशिर्वाद अन तुझी पुण्याई,
चाललो आड्वाट-वनराई!
जात्यावरली ती ओवी आठवे,
स्वाभिमानाची ती ज्योत आठवे,
आहे येथेच भास असा होई,
तुझ्याविना हे व्यर्थ जीणे आई!

प्रल्हाद दुधाळ.
५/९ रूणवाल पार्क,
गुलटेकडी पुणे ३७.
९४२३०१२०२०.

आव्हान.

आव्हान.
वाटतय सगळ आहे आयुष्य सुरळीत तरी,
कधी गाफिल उगा राहू नयेच माणसान!
कधी अचानक गडगडाटी मुसळधार पाऊस,
गोठवणारी थंडी,जाळणार कडाक्याच उन,
घोंगावणार वादळ, भयानक त्सुनामी,
वेळ कधीच सांगुन येत नाही,
एक घरट जरूर उभाराव माणसान!
भले भले कोसळतात,जगण्याला कंटाळतात,
गोंधळात या काही संधिसाधू भेटतात,
एवढ्या तेव्ह्ढ्यान असं निराश नसतं व्हायचं,
प्रत्येक क्षण नवं आव्हान समजून,
आनंदानं सामोरं जात रहाव माणसानं!
अकल्पित अपेक्षाभंग,जिव्हारी घाव,
संकटामागुन संकटं,जुलूम जबरदस्ती,
धर्मांध दंगली,माथेफिरूंची मनमानी,
विश्वासानं अशावेळी मान टेकता येईल,
एकतरी असा आधार जोडावा माणसानं!
वाटतय सगळ आहे आयुष्य सुरळीत तरी,
कधी गाफिल उगा राहू नयेच माणसान!
प्रल्हाद दुधाळ.

शर्यत.

शर्यत.

माणसांच्या गर्दित या लपला एक सैतान!
स्वत:कडे पहाण्याचे हरवले आता भान!

कुणासाठी कसे आता घालायाचे साकडे?
पैशासाठी विकला जातो खुला आत्मसन्मान!

नाती गोती व्यर्थ येथे दुरावली सारी मने,
आत्मकेंद्री जगात, उच्च झाले रहाणीमान!

बंगला माडी हाती गाडी ऐश्वर्याची धुन्दी,
मतलाबी तो हरेकजण,मस्ती झाली शान!

शर्यत चालू आहे आतमधल्या सैतानाशी,
धकाधकिच्या आयुष्यात मनशांती गहाण!

प्रल्हाद दुधाळ.

बिघडली लय.

बिघडली लय.

सुंदरशा जगण्याचे कसे वाटले रे भय!
असे हे संपण्याचे, होते कुठे तुझे वय?

जिंकण्यासाठी पुढे सगळे आयुष्य ते होते,
कसा न पचविला,एक छोटा हा पराजय!

असा-तसा हा घातकी,जेंव्हा निर्णय घेतला,
आई-बाबांच्या कष्टांची कशी आली नाही सय?

पराभवाने या साध्या,कसा खचून तू गेला?
कसा पाषाण ह्र्दयी,बिघडवली ती लय!

तडजोडीला आयुष्यात या जगणे म्हणती,
आली नव्हती रे येथे, जगबुडी वा प्रलय!

प्रल्हाद दुधाळ.

माझ्यासाठी!

माझ्यासाठी!

प्रेम जिव्हाळा नाती खोटी!
जगणे माझे माझ्यासाठी!
सेवा धर्म नावापुरता,
खटाटोप हा सत्तेसाठी!
जगणे माझे माझ्यासाठी!
निती अनिती फुका गप्पा,
कसरत सारी खुर्चीपोटी!
जगणे माझे माझ्यासाठी!
शिक्षण संस्कार बेगडी,
सारे इथे दिखाव्यासाठी!
जगणे माझे माझ्यासाठी!
येता जाता त्या गप्पा मोठ्या,
देखावा अहंकारापोटी!
जगणे माझे माझ्यासाठी!
कोण कुणाचा साथ खोटी,
उरते काय येथे शेवटी!
तरी.......
जगणे माझे माझ्यासाठी!

प्रल्हाद दुधाळ.

गुंता.

गुंता.

हसलो अती खुशीने भरले डोळ्यात पाणी!
दु:खातल्या वेदनांनी भरले डोळ्यात पाणी!

तेथल्या गांजल्या जिवांचे हाल हे अतोनात,
पाहता निराश डोळे भरले डोळ्यात पाणी!

शिखरावरूनी यशाच्या डोकावले पायथ्याला,
वळता नजर खाली भरले डोळ्यात पाणी!

हसलो खिदळलो महफिलीत त्या नाचलो,
मस्तीत डोलता नाचता भरले डोळ्यात पाणी!

आठवणींचा हा गुंता सुटता कसा सुटेना,
मुखवटा तो गळाला भरले डोळ्यात पाणी!

प्रल्हाद दुधाळ.

कायदा!

कायदा!
व्यवहारी बाजारात पाह्यला ना फायदा!
करंटा मी,पाळला न एकही वायदा!

सन्मार्ग जयाला मानीत होतो तो न तसा,
मार्ग सरळ माझा ठरला तो बेकायदा!

मिळविले ग्यान ते कुचकामी आहे इथे,
या जगाची तत्वे,आहे वेगळीच संपदा!

यशाचे गणित ते माझ्यास्तव होते साधे,
अपयशाचा कलंक लागला माथी सदा!

शिकलो आता मी वावगी ही भाषा येथली,
म्हणती आता पाळतो येथला कायदा!
प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, २५ जून, २०१०

भाकित!

भाकित!
ना भेटतात चेहरे भावणारे आता!
ना उरले जगी देव पावणारे आता!

थोडासा काय पाय वाकडा पड्ला,
टपलेत हिंस्र पशु चावणारे आता!

गोंगाट माथेफिरूंचा वाढला येथे,
स्तब्ध झाले पाय नाचणारे आता!

ढळला समतोल या वसुंधरेचा,
उभे संकट हे घोंगावणारे आता!

प्रल्हाद दुधाळ.

भगवंत.

भगवंत.

जगात माझ्या या, ना धर्म जात वा पंथ होता!
भेटला सह्रदय खरा तोच महंत होता!

रोज मिळे ठोकर नवी,लढाई नवी तेथे,
लागलेली ठेच अनुभवांचा नवा संच होता!

नव्ह्तेच समाधान भरल्या जरी तिजो-या,
कसला श्रीमंत तो,दरिद्री मनाचा रंक होता!

जपले जयांना असे की तळहाताचे फोड,
स्वकियांनीच त्या मारला विखारी डंख होता!

न मंदीरात गेलो ना हाताळली जपमाळ,
दगडात नाही, माणसात भगवंत होता!

प्रल्हाद दुधाळ.

बहाणे.

बहाणे.

जिंकले जेंव्हा लढाई,गळा पडले हार होते!
झेलण्यास शब्द तयांचे,हुजरे हजार होते!

पोटासाठी या करती अनेक चो-या लबाड्या,
ठेवणारे उपाशी तयांना, खरे गुन्हेगार होते!

मायभूमी साठी आपल्या सांडले रक्त जयांनी,
स्वातंत्र्यानंतर ठरले ते,झाले वेडे ठार होते!

उभारले अडथळे लाखो,उभी संकटे समोर ती,
ना घाबरता मानले त्या संकटांना यार होते!

मी वेळ द्यावी, तू ती न पाळावी,झाले कायमचे,
टाळण्यास मला शोधले,कित्त्त्येक बहाणे होते!

प्रल्हाद दुधाळ.

फुका मेला!

फुका मेला!
नाही कुणास आता चिंता,
तो कोण आला कोण गेला!
मस्तीत जगतो मी माझ्या,
रिचवतो पेल्यांवर पेला!
सजविले जगणे माझे,
आनंदाचा मुक्त हा ठेला!
हसते कोण रडे कोण,
म्हणती कोण फुका मेला!
प्रल्हाद दुधाळ.

प्रसंग

प्रसंग
काय सांगू आज तुझा भलताच रंग आहे!
आस्तीत्वाने तुझ्या येथे उठला तरंग आहे!

आवई आली येथे तुझ्या आगमनाची आता,
लढवण्यास नजर बांधला हा चंग आहे!

रोखती श्वास कोणी तेथे घायाळ कीती झाले,
मस्तीत स्वत:च्या कशी ग झाली तू दंग आहे!

नखरा तूझा ठसका तूझा न्यारी अदा तूझी,
कित्त्येकांची येथे जाहली समाधी भंग आहे!

यॊवनाची नशा येथे तूझी नजर मोहीनी,
रूपड्याने गुदरला भलता प्रसंग आहे!

प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०

मंगळवार, २२ जून, २०१०

पांडुरंग.

पांडुरंग.

असा रे विचलू देऊ नको मना.
असू शकेल नियतीची योजना.

कुणीतरी देई अजानता हात,
चाद्ण्यांची होईल काळोखी रात.

कधीतरी येईल पुन्हा ती जाग,
पुसला जाईल जीवनाचा डाग.

पदरात पडेल हवेसे दान,
मानव जन्माचे होईल कल्याण.

यशाने त्या नको जाऊ हुरळून,
अहंकार फुगा जाईल फुटून.

नको कर्मकांड नको तो सत्संग,
कर्तव्यात तुझ्या वसे पांडुरंग!

प्रल्हाद दुधाळ.

नाही.

नाही.
जगावे झाकून हे डोळे,
काहीही बोलायाचे नाही.
जगणे तुमचे असे हे,
कुणाशी तोलायाचे नाही.
सोसायाचे हे मुकपणे,
तोंड हे खोलायाचे नाही.
नाचले कुणी आनंदाने,
असे तू डोलायाचे नाही.
फुले वसंत बहरात,
तरी तू फुलायाचे नाही.
प्रश्न सारे ठेव मनात,
शब्द उच्चारायाचा नाही.
खाली झुकव ती नजर,
ताठा हा चालायाचा नाही.
प्रल्हाद दुधाळ.

नाते.

नाते.

माझी शब्दातीत गाणी!
तुझी ओळखीची वाणी!

जसे वा-याच्या तालावर,
बरसे पावसाचे पाणी!

त्याने ऎकले मागणे,
भेटली मनासवे मने!

जसे तालावर डफाच्या,
वाजू लागे तुणतुणे!

काय सांगावा ग त्या,
नियतीचा महीमा!

प्रेमभरल्या नात्याला,
नाही जात धर्म सीमा!
प्रल्हाद दुधाळ.

दिखावा.

दिखावा.
बरसना-यांचे ना होते नाव येथे.
गर्जना-यानाच मिळतो भाव येथे.

गुन्हेगार ठरतो रंक तो बिचारा,
उजळमाथी फिरे पापी राव येथे.

अर्धपोटी राहीना का जनता येथे,
महासत्तेचा डांगोरा भरघाव येथे.

ओळख ना पुरेशी भारतीय अशी,
जात धर्माने जाणती ते नाव येथे.

उदघोष चाले जरी तंटामुक्तीचा,
वादाविना नांदे एक न गाव येथे.
प्रल्हाद दुधाळ.

ते आम्ही!

ते आम्ही!

चुकिच्या उत्तरांची ती गणिते मांडतो आम्ही!
उत्तरांसाठी आभासी उगाच भांडतो आम्ही!

जीवन घडीचा डाव, जो उधळणार आहे,
जात धर्म प्रांता साठी हे रक्त सांडतो आम्ही!

नीती अनिती नियम कायदे ते कुणासाठी?
स्वार्थासाठी सगळे ते,खुंटीस टांगतो आम्ही!

हा जन्म जसा सत्ता नी संपत्ती साठीच आहे,
खुर्चीसाठी कुणाच्याही पायाशी रांगतो आम्ही!

ठकलो अनेक वेळा गिळले अपमान किती!
पड्लो जरी उताणे,नाक वरती सांगतो आम्ही!

प्रल्हाद दुधाळ.
9423012020

जोगवा.

जोगवा.
नमस्कार भाऊ,ओळखलत का ताई?
पाच वर्षात भेटायचा योगच आला नाही!
पुन्हा नशिबाचा कॊल मागावा म्हणतोय,
मतांसाठी तुमच्या दारोदार हिंडतोय!
सॊभाग्यवतीच स्वप्न लाल दिव्यात फिरतोय,
चिरंजिवासाठी बिअर बारच बघतोय!
दोघांच्या स्वप्नांसाठी निवडून यायचय,
सत्त्तेमधल सुख ते चाखून बघायचय!
सत्त्ता एकदा मिळाली की मागे बघणार नाही,
पाच वर्षात सात पिढ्यांच भल करायचय!
जागेचे भाव येथे भरमसाट वाढलेत,
कोट्यातल घर पदरात पाडून घ्यायचय!
गळफास घेणा-या बंधूंचे हाल बघवत नाही,
आत्महत्त्येसाठी सरळसोपं विष शोधायचय!
म्हणुन म्हणतो भाऊ विचार करा पक्का,
नावासमोरच बटण दाबून खुर्चीत बसवयाचय,
एकदाच मला हा जोगवा घाला तुम्ही ताई,
पाच वर्षे पुन्हा हा हात पसरणार नाही!
प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, २१ जून, २०१०

जगणे.

जगणे.

माणसांचे इथल्या काहीतरी बिनसले आहे.
मनामनाला अहंकाराने का ग्रासले आहे.

शब्दा शब्दात या भरली आहे विखारी कटूता,
सगळी सुखे पायाशी मनस्वास्थ्य नासले आहे.

नाही साधेसरळ बोलणे सदा स्वर टिपेचा,
संवाद संपला विसंवादात घर हरेक फसले आहे.

काय हवे तयांना कोठे जायचे आहे उमगत नाही,
स्नेहाळ शब्दांना हरेक मन तरसले आहे.

अशांतता अराजक सर्वत्र माजले आता येथे,
उलाघाल दाट्ली मनात जगणे त्रासले आहे.

प्रल्हाद दुधाळ.

गैरसमज.

गैरसमज.

माणसांना ज्या आयुष्यभर टाळले होते,
दु:खात माझ्या त्यांनीच आसू ढाळले होते.

फुल अर्पिले तुला जरी होते सुकलेले,
पाहीले मी तुझ्या गज-यात माळले होते.

रस्ता अवघड तो, वाट वळणांची आहे,
जाणुनही मार्ग काटेरी कवटाळले होते.

जंगलातली माणसे ती जसे पशुच ते,
साथ मिळताच ते माणसाळले होते.

पार्थिवाला माझ्या देता अग्नी कशाला?
आतल्या माणसाला केव्हाच जाळले होते.

प्रल्हाद दुधाळ.

क्रांती साठी.

क्रांती साठी.

वाटून घेतले एकमेकांत आभाळ आता!
एकदिलाने यासाठी जमले हे नाठाळ आता!

मिळाले कित्येक घाव जाहल्या जखमा किती,
नाही दुसरी दवा शिवाय येणारा काळ आता!

सुजलाम सुफलाम जाहला देश आमुचा,
सिध्द पिकविण्या सोने नांगराचे फाळ आता!

गाळला घाम ज्यांनी त्यांची झोपडी ही अंधारी,
उपट्ले श्रेय घ्याया अनेक वाचाळ आता!

नको त्या लढाया नकोत दहशतीची छाया,
समर्थ क्रांतीसाठी मॄदंग व टाळ आता!

प्रल्हाद दुधाळ.

कोणी?

कोणी?

केले तयांना असे बदनाम कोणी?
दाखविला विनाशी मार्ग वाम कोणी?

लागेना टिकाव त्या कपटी नीती ने,
धरला वेठीला प्रभू श्रीराम कोणी?

जन्म नासला यांचा त्या पाप कर्मांनी,
क्षालनास शोधले चारी धाम कोणी?

ही संपत्ती अन या आलिशान वस्त्या,
मरेतो या साठी गाळला घाम कोणी?

नाही हातास काम न पोटास घास,
पिऊन रक्त धरला हातात जाम कोणी?

माणसांचे जगणे पशुवत झाले,
नाकारले यांना होऊन ठाम कोणी?

प्रल्हाद दुधाळ.

काहीतरी चुकलेले.

काहीतरी चुकलेले.

भासते ते काहीतरी चुकलेले.
तोंड तुझे असे का ग सुकलेले?

रंग नेहमीचा तो आज का नाही?
काय नजरेत माझ्या खुपलेले.

ताठा नेहमीचा तो आज कुठे ग,
फुल कुंतलावर ते सुकलेले.

लगबग नेहमीची ती दिसेना,
रेशमी कापड चुरगळलेले.

रागाऊ नकोस अशी सखये ग,
गाव तुजसाठी चुकचुकलेले.

प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, १८ जून, २०१०

कांगावा.

कांगावा.

जरी आम्ही हे वाट्तो तुम्हांस बावळे,
तेच आम्ही शिवरायाचे प्रिय मावळे!

गांजले क्रूरतेने या दीन दुबळ्यांना,
करतात कांगावा तेच काढून गळे!

जल्लोष हा भजन किर्तनाचा चालला,
वेड लावते भक्तास रूप ते सावळे!

बियाणे पेरले तयांनी अशा भेदांचे,
कसे पिकणार तेथे एकतेचे मळे?

गर्जना अशी की जणू पोशिंदे जगाचे,
लागले तयांना माजो-या सत्तेचे चळे!

वागले जे मगरूर होऊनी या जगी,
पिंडास त्यांच्या नाहीच शिवले कावळे!

प्रल्हाद दुधाळ.

कशाला?

कशाला?

तुझ्या माझ्या जगी, जमाना कशाला?
रोज तुझा नवा, बहाना कशाला?

जगणे इथे महाकठिण झाले,
अर्ध्या घासात या, पाहुणा कशाला?

नशिबाची बात, नियतीची खेळी
एकमेकांवरी, निशाना कशाला?

कटू ही कहाणी, जगण्याची आहे
दाखविण्या खोटा, मुलामा कशाला?

माथेफ़िरूंचे राज्य, खुळ्यांची वस्ती
जगी एकटा या, शहाणा कशाला?

प्रल्हाद दुधाळ.

करार.

करार.
होकारात लपविले नकार होते.
खरेच लोक तेथले हुशार होते.

पोशाख गबाळा रहाणी अती साधी,
उच्च प्रतीचे परंतू विचार होते.

कुणावाचुन का न अडते कुणाचे,
घेण्यास आव्हान नवे तयार होते.

लागला येथे विसंवादी कसा सूर,
लोक एकमेकाशी बोलणार होते.

होता बो्लाचा भात बोलाचीच कढी,
केले लुटारूंशी छुपे करार होते.

प्रल्हाद दुधाळ.

कधी?

कधी?

मातापितरांचे फ़ेड्णार पांग कधी?
शहाण्यासारखा वागणार सांग कधी?

इशा-य़ा इशा-यामधे कुठ्वर बोलणे,
लागणार तुझ्या ग मनाचा थांग कधी?

जिकडे तिकडे गर्दी ही तुफान झाली,
देवा रे इथली संपणार रांग कधी?

येथे कुणासाठी कोणाकडे वेळ नाही,
रम्य पहाटेची ऎकणार बांग कधी?

जरी चालली नाकासमोरची वाट
आड मार्गातली टाळ्णार टांग कधी?

कुठ्वर चालणार नजरेचा खेळ,
नावाने माझ्या भरणार भांग कधी?
प्रल्हाद दुधाळ.

उपरे.

उपरे.

अनोळखी सारे तेथले चेहरे होते.
वाटते माझ्यासाठी त्यातले बरे होते.

शब्द कसले ती बोचरी हत्यारे बरी,
बोल असे पडले काळजा चरे होते.

चालतो जरी नाकासमोर च्या वाटा,
पारध करण्या लावले पिंजरे होते.

माणसांनी तेथल्या केला विरोध मोठा,
ह्र्दयात अनेक हळवे कोपरे होते.

संपविण्या येथुनी शिजतो कट आहे,
घेण्या फायदे जमले सारे उपरे होते.

प्रल्हाद दुधाळ.

आस्तीत्व.

आस्तीत्व.

मीच माझे आस्तीत्व चाचपाया लागलो.
गर्दीतली प्रतिमा ती जपाया लागलो.

भलताच अभिमान माझा कुणा होता,
आरशात शोधण्यास थकाया लागलो.

तसा म्हणतात जरा गुणवान होतो,
अवगुण खाणीत सापडाया लागलो.

नरक दरवाजात नव्हतो एकटा,
सोबती पाहुन गुणगुणाया लागलो.

मी कुठे एवढा कधी बहकलो होतो?
आता मी मला कसा आवडाया लागलो?

प्रल्हाद दुधाळ.

आभार.

आभार.

तुला झोंबले माझे शब्द फार होते.
शहाण्यांना त्या पुरे शब्दांचे मार होते.

तेथला मार्ग होता फक्त विनाशाकडचा,
तेथे फक्त उघडणारे आत दार होते.

होती धुंद मस्त नशा तीथे जगण्याची,
सोडणारे साथ ते माझेच यार होते.

बरे झाले वेळीच मजला जाग आली,
वाटेवरी तेथे पेटले अंगार होते.

कडेलोट होता होता वाचलो येथे मी,
मानले निर्मिकाचे पुन्हा आभार होते.

प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, १६ जून, २०१०

आपलासा!

आपलासा!

मम वागण्याचा काय करावा खुलासा!
एखादा शब्द माझा देतो कुणा दिलासा!

जगण्यास तयांच्या तो नवा अर्थ आला,
आशेस कधी त्या कोंब फ़ुटला जरासा!

आस्तीत्वाने तुझ्या इथे फ़ुलतो सुगंध,
विरहात सुटतो जीवघेणा उसासा!

वाटेकरी कुणी दुख:त नाही कुणाच्या,
फ़ुंकर एखादी करी कुणा आपलासा!

प्रल्हाद दुधाळ

आनंदाचे गाणे!

आनंदाचे गाणे!

कुदळ फावडे नांगर पाभर!
विळा खुरपे नाडा वा दोर!

नांगरणी पेरणी खुरपणी,
काढ्णी मळणी व भरणी!

हत्यारे माझी प्रिय कामे,
हेच माझे आनंदाचे गाणे!

नकोच मजला ऎश्वर्य ते,
सेझची मृगजळी आशा !

प्रिय मजला मातीतल्या,
कष्ट अन घामाची भाषा!
प्रल्हाद दुधाळ.

आतुर.

आतुर.

लागला जीवाला आता नवाच घोर आहे.
जवळी येथेच लपला चित्तचोर आहे.

पावसाची रिमझिम अन ऋतू हिरवा,
मनातला थुईथुई नाचतोय मोर आहे.

ना समजले काय घड्ली ती जादू,
पाहीला तो खरा का आभासी विभोर आहे.

गोकुळात वेड्यापिशा गवळ्याच्या पोरी,
कारण तयाचे नंदाचा तो पोर आहे.

पोर्णिमेची रात आणि अधिर चंद्र हा,
भेटीसाठी आतुरला वेडा तो चकोर आहे.

प्रल्हाद दुधाळ.

आठवणी.

आठवणी.
पुन्हा तोच फणा काढी,
आठवणींचा नाग!
किती जरी गिळला तरी,
येतो फार राग!
पोथ्या,किर्तन,योग समाधी,
चोखाळले किती मार्ग!
अहंकार अंतर्मनातला,
संपवू कसा सांग!
धुंडाळली गंगा जमना,
केले चारी धाम!
पुसला नाही गेला तरी,
चारित्र्याचा डाग!
प्रल्हाद दुधाळ.

अतिक्रमण.

अतिक्रमण.

झाले दयनीय त्यांचे जीणे.
खा्तात ते लोखंडाचे चणे.

वाट्मारी चाले सत्तेसाठी,
कशी मिटावी त्यांची भांडणे.

सरले काय उरले काय,
बदलले जनांचे वागणे.

तीच का संस्काराची पंढरी,
तेच का हेच शिवबाचे पुणे?

पसरण्या पाय दिली ओसरी,
बसले बळ्काऊन पाहुणे!

प्रल्हाद दुधाळ

गुरुवार, १० जून, २०१०

महासत्ता.

महासत्ता.
कापतो आम्ही एकेकाचा पत्ता!
व्हायचे आहे आम्हास महासत्ता!
कशाला हवे ते चुल आणि मुल,
भिरकावली ती संस्कारांची झुल!
सोड्ली आम्ही शिकायची यत्त्ता,
व्हायचे आहे आम्हास महासत्ता!
भल्या पहाटे्स कामाला लागतो,
मरेपर्यंत फक्त कष्ट्च करतो,
घामावर मिळेना पोटापुरता भत्त्ता,
व्हायचे आहे आम्हास महासत्ता!
कमावतो कमी खर्चतो जा्स्त आम्ही,
उपाशी जरी मिशीला तुप चोपतो आम्ही,
सोडला ना गावातला एकही गुत्त्ता,
व्हायचे आहे आम्हास महासत्ता!
जो बळी तो कान पिळतो येथे,
लाळघोट्यांनाच भाव मिळतो येथे,
कुणाच्या घामावर कुणाची सत्त्ता?
व्हायचे आहे आम्हास महासत्ता!
कापतो आम्ही एकेकाचा पत्ता!
व्हायचे आहे आम्हास महासत्ता!
प्रल्हाद दुधाळ.

मार्ग.

मार्ग.
जे दिले नियतीने तयाशी तड्जोड केली.
लिहीले होते भाळी त्यात न खाडाखोड केली.

या जींदगीत माझ्या सदा फ़सलो मी हमेशा
अशी इतकी जगण्यात मी धरसोड केली?

जोड्ण्यास मनास मने मी लाख यत्न केले,
जात धर्म प्रांतापोटी त्यांनी तोड्फ़ोड केली.

अशी कितीतरी कोडी सुट्ली ना कधी
ना पुसले कुणाला ना कुणी फ़ोड केली.

होता मिळाला जरी हा खड्तर मार्ग माझा
चट्णी भाकरी मिळाली तुजसवे गोड केली.

प्रल्हाद दुधाळ.

मी निवांत.

मी निवांत.
चुकलो कधी धड्पड्लो कधी!
रस्त्यात या कितिदा पड्लो कधी!
हार माझी मजला माहीत होती,
लुटूपुटू लढाई लढलो कधी!
ती वाट जरी होती विनाशकारी!
हट्टाने मार्गाने त्या चढ्लो कधी!
मामला होता खरा तर खुशीचा,
नशिबाच्या नावाने रडलो कधी!
भेट तुझी माझी ती झालीच कुठे?
दिवास्वप्नांत वेड्या गढ्लो कधी!
आभाळाचे छ्त दगड उशाला,
मी निवांत असा पहुडलो कधी!

रे माणसा!

रे माणसा!
काय तुझी ही जिंदगी रे माणसा!
वागणे पशूहुनी हीन रे माणसा!
स्वकियांचे स्वार्थात कापतो गळे,
स्वत:साठी किती जगतो रे माणसा!
येताना उघडा जाणार तसाच रे तू,
भरजरी वस्रांसाठी वेडा रे माणसा!
भरण्यास खळी पोटाची एक मूठ पुरी,
हपापला भरण्या तिजोरी किती रे माणसा!
ना बदलती ललाटरेषा नियतीने रेखल्या,
बदलण्य़ास प्रारब्ध किती लढा रे माणसा!
सुख-दुख:ची कळली नाही कधीच सीमा,
नाही समजले हे जगणे तुला रे माणसा!
समजुन घे एकदा शहाणपणा येथला,
वारशात फक्त उरते हे नाव रे माणसा!

वरात.

वरात.
अंत ना ही सुरूवात आहे.
जात्यात कोणी सुपात आहे.
आज भरले दिवस त्यांचे,
संकट तुझ्या दारात आहे.
गाफिलता न अशी कामाची,
धोका छुप्या त्या रूपात आहे.
कळपात मेंढरे ही सारी,
लांड्गा तो कळपात आहे.
येईल कोठून कसा घाला,
पहारा जरी दिनरात आहे.
माणसे कसली पशूच ते,
शहाण्यांची ही वरात आहे.
प्रल्हाद दुधाळ.

वार.

वार.

जाणिवांचे बंद केले आता दार त्यांनी.
पाठीमागुन केला होता तो वार त्यांनी.

कर्जात बुडून आत्मघात की हो केले,
संपविले दिला जगण्या नकार त्यांनी.

कितीक आले अन आसू पुसून गेले,
दिखाव्यापुरता घेतला कॆवार त्यांनी.

धड्गत नाहीच आता त्या दलालांची,
स्वाभिमानास दिली ही ललकार त्यांनी.

घेतला जनसेवेचा वसा मिळाली सत्ता,
वेचली अनितीने माया चिकार त्यांनी.

प्रल्हाद दुधाळ.

विनवणी.

विनवणी.
हे तुझे अशावेळी,
दर्शन सकाळी सकाळी!
जागविण्यास कोणी,
गायली ही भुपाळी!
तुझ्या आर्त हाका,
कोमेजली ग आशा!
कशास बोलते ती,
पुनर्जन्माची भाषा!
ठाऊक कुणा नाही,
कसे पल्याड्चे गाव!
सखये आताच लाऊ,
तुझ्यासमोर मम नाव!
प्रल्हाद दुधाळ

विसर.

विसर.

पाने इतिहासाची पुन्हा पुन्हा चाळू नको!
नयनातले अश्रू फुका,असे ढाळू नको!

घातली शपथ ओली,सुटली म्हण आता,
विसर दिली वचने,आता ती पाळू नको!

नकळत कधी जर ती आठवण आली,
जीव कुणासाठी उगा,असा हा जाळू नको!

कुणासाठी येथे कधी,हा थांबला न काळ,
जग मस्तीमधे एक क्षणही टाळू नको!

फेकुन दे शिळी, जुनी मुठीमधली फुले,
गजरा कुंतलावरी आता, त्याचा माळू नको!

प्रल्हाद दुधाळ.

रविवार, ३० मे, २०१०

शोध.

शोध.
शब्दांशी खेळ्णे मुक्त माझा छंद आहे.
जगण्याशी मस्त तयाचा संबंध आहे.

सोडून गेल्या संवेदना या माणसांना,
असुनी डोळे वागती जणू अंध आहे.

यातनांची येथल्या वर्णावी काय कथा,
शहाण्यांनी किती लिहीले प्रबंध आहे.

उरला न कुणाचा धाक येथे कुणाला,
वागणे इथे हरेक जाहले बेबंद आहे.

पसरले वाटेवरी काटे येथे अतोनात,
वेचतो एक एक शोधतो सुगंध आहे.

प्रल्हाद दुधाळ.

शनिवार, २९ मे, २०१०

सहवास.

सहवास.
हरेक आयुष्य येथले,
नियतीने आखलेली रेषा!
सरळ कुणाची कोण वाकडी,
ठळक कुणाची, फिक्की कुणाची,
छेदबिंदू जेथे मिळतात रेषा,
तेवढीच भेट दोघांची!
छेदबिंदू जेवढे जास्त-
घट्ट तेव्ह्ढा सहवास!
काही रेषा समांतर-
जन्मभर भेट नाही!
कुणाचा कुणाला किती सहवास..
ठरवतात या रेषा!
आपण मात्र म्हणत रहातो....
हा भेट्लाच नाही!
ती दिसली पण बोललीच नाही!
आणि बरच काहीबाही.
खर तर त्यांच्या रेषाच तशा!
माणसाच्या हातात काहीच नसत.....
विधिलिखित कधीच बदलत नसत!
प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, २८ मे, २०१०

साथ.

साथ.

जमे तुझी माझी जोडी.
आली जगण्यास गोडी.
तुझ्या आस्तीत्वाचा भास,
येई मोग-याचा वास.
तु ग सदगुणांची खाण,
आले जगण्याचे भान.
तुझे माझे येणे जाणे,
बहरले हे जीवणगाणे.
हातामधे तुझा हात,
झाली आयुष्याची साथ.

प्रल्हाद दुधाळ

सुख.

सुख.
सहती सारे,रूदन यांचे मूक आहे.
मानती जन्म घेतला,झाली चूक आहे.

सुजलाम सुफलाम देश जरी झाला,
मरती उपाशी,प्रखर ती भूक आहे.

आले नी उध्दाराची आशा पेरून गेले,
जीणे यांचे,तयांची करमणुक आहे.

देऊन आव्हान मोठे,बंड ज्यांनी केले,
तयांवर जन्माचा,धरला तो डूख आहे.

सत्तेच्या उत्सवी,रोशनाई शहनाई,
आशेवरी जगणे,एवढेच सुख आहे.

प्रल्हाद दुधाळ.

हव्यास.

हव्यास.

भल्याभल्यांचा इथे चुकला कयास आहे!
प्रगतीचा आमच्या फसला प्रयास आहे!

पसरती ना पाय अंथरून पाहुन येथे,
कर्जात फसण्याचा घेतला ध्यास आहे!

स्वप्न सुखाचे शोधती भरल्या तिजो-यात,
कळते न वळते मनस्वास्थ्य लयास आहे!

धुंडाळले आश्रम सारे बांधले गंडे दोरे किती,
ना लाभले सुख परी व्यर्थ तो सायास आहे!

सोडती हातचे अन लागती पळत्या पाठी,
सारे राहणार इथे परी सुट्ला न हव्यास आहे!

प्रल्हाद दुधाळ.

हार.

हार.

झेलले जयांचे जिव्हारी घाव मी!
नात्यांस अशा काय देउ नाव मी!

पाठीवरी बिरहाड घेऊन चालतो,
मानला ना माझा एकही गाव मी!

लाथाड्ले कुणी दिधले शिव्याशाप,
सोड्ली ना मने माळण्याची हाव मी!

आरोप हा की माणसा सारखा वागतो,
नाहीच स्वत:चा केला बचाव मी!

खेळात रडीच्या फ़ेकले असे फ़ासे,
चुकूनही ना जिंकलो एक डाव मी!

प्रल्हाद दुधाळ.