मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

बळीराजा

बळीराजा
राजा नावाचा रे  नेहमीच कंगाल
घामावर तुझ्या जगतात दलाल

कधी ओला कधी सुका झोडपे गार
चोहोबाजूंनी सदैव पडतो मार

पिकते तेव्हा मातीमोलाने विकते
कष्ट जाती वाया भांडवल बुडते

दावणीच्या  बैलाना चाराही मिळेना
लळा जित्राबांचा विकायाला धजेना

शेतीप्रधान देश घामा नसे मोल
शेतकरी  हिताचे सारे नारे फोल

येवो संकटे कितिही नाही हटणार
लवकरच राज्य बळीचे येणार
       ...... प्रल्हाद दुधाळ , पुणे .

रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी!
मौन आज सोडले सारे सांगण्यासाठी
शब्द शब्द जपले मी शब्द होण्यासाठी

नजरेतले इशारे आता संपवू ना
कोड्यात टाकणारा आता नको बहाणा

शब्द आता गुंफले व्यक्त मी होण्यासाठी
शब्द शब्द जपले मी शब्द होण्यासाठी

नात्यात तुझ्या माझ्या नाही वावगे काही
सौंदर्य आंतरीक माझ्या मनास मोही

काव्यात गुंफलेले शब्द मी तुझ्यासाठी
शब्द शब्द जपले मी शब्द होण्यासाठी
       ....... प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

देशाभिमान.

देशाभिमान.
बहुमोल हे स्वातंत्र्य आपले
असावी मनापासून ही जाण
लढले अगणित त्या वीरांचा
उरी बाळगू सार्थ अभिमान

देशभक्ती देशाभिमानासाठी 
उभारूया चळवळ ती नवी   
भेदाभेद आपसातले विसरू  
तिरंग्यास मानवंदना हवी

स्वार्थासाठी घेती हत्यार हाती  
उगाच मारती निरपराध्यांस
एकजुटीने आणि एकमुखाने
निपटून टाकू त्या आतंकास

जात धर्म अन प्रांतापलीकडे
भारतीयत्वाची जपूया शान
जनगण मन राष्ट्रगीताचा
ध्यानीमनी करूया सन्मान
    ..... प्रल्हाद दुधाळ.रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

पाण्याचे अभंग

अभंग पाण्याचे .... प्रल्हाद दुधाळ

पाण्याचे महत्व,जाण रे माणसा,
असा रे तू कसा,हलगर्जी.

नको ओतू अशी,भरलेली भांडी
उगाच का सांडी,जाते वाया.

होत नाही शिळे,पाणी हे जीवन
साफ ठेव मन,पाण्या प्रती.

मुबलक येथे,दिसतसे तुला,
महाग थेंबाला,किती लोक.

घोटातला घोट,द्यावा तहानेल्या,
किती पिढ्या गेल्या,शिकवून.

पुनर्वापराची,व्हावी चळवळ,
प्रत्येकाने बळ, द्यावे त्याला.

पावसाचे पाणी,साठवण व्हावी,
त्यायोगे टंचाई, दूर व्हावी.

जगण्यास जीवा,आवश्यक पाणी,
जाण ती कहाणी,जलाची या.

मुबलक साठा,कोण एक काळ,
नद्या नी ओहोळ,तुडूंब ते.

नाही उमजले,महत्व पाण्याचे,
नासले तयाचे,स्रोत सारे.

कसा कुठे गेला,अनमोल साठा,
आता का हो तोटा,जाणवतो.

माणसाने केला,जंगल विनाश,
आवळला फास,स्वगळ्याशी.

ढळला तो तोल,वाढे प्रदूषण,
कशाला दुषण,पर्जन्याला.

जाणला ना वेळी,महीमा पाण्याचा,
धोका दुष्काळाचा,डोईवरी.

होते मुबलक,पाण्याचे तलाव,
लावले लिलाव,अंगी आले.

जनावरे धुती,प्यायच्या पाण्यात,
केला उतमात,अपव्यय.

काही शहरांत, पाण्याची ही चांदी,
कुठे अनागोंदी,कायम ती.

तोंड धुण्यासाठी,धो धो वाहे नळ,
मुक्त चाले खेळ,पाणी पाणी.

पावसाचे पाणी,सर्व जाते वाया,
त्यास साठवाया,करा काही.

धरणात साठे,हल्ली कमी झाले,
गाळाने भरले,पात्र त्याचे.

पाणी वाचवण्या,आता करा घाई,
अमर्याद नाही,जीवन हे.

आता हो रे जागा, कर जागरण,
पाण्यासाठी जन,एकत्र या.

हीच विनवणी,वाचवा हो पाणी
मंत्र ध्यानीमनी,पाण्याचाच.
     .... प्रल्हाद दुधाळ . पुणे.
              ९४२३०१२०२० .

शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०१६

श्रावणसरी

श्रावणसरी.
श्रावणधारानी ही भिजली धरती
रानात हिरवे अंकूर सजलेले....
सोहळ्यात सृष्टीच्या या रंगीबिरंगी
आकाशही विविधरंगी रंगलेले....
झरझर झरती या पाऊसधारा
हसती गाती निर्झर फेसाळलेले....
गाणी गाऊ मस्त नाचू फेर धरूनी
तन चिंब मनही हे मोहरलेले....
             ..... प्रल्हाद दुधाळ.