बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

मायेची गोधडी .

मायेची गोधडी.
नववारी जुन्या साड्या जपून जपून ती ठेवायची,
फाटक्या कपड्यातले डिझाईन कापून जपायची,
रंगीबेरंगी चिंध्या नी काठ शिंप्याकडून आणायची,    
उन तापायला लागल की स्वच्छ धुवून सुकवायची,
फुरसतीच्या दिवशी मोठ्या सुईत दोरा ओवायची,
जमिनीवर कपडे अंथरुन तयार व्हायच डिझाइन!
चौकोन त्रिकोन पक्षांचे आकार व रंगीत बेलबुट्टी,
कल्पनेला फुटायचे पंख,पळायचा धावदोरा सुसाट,
आकाराला यायची आईच्या हातची मायेची गोधडी!
तिच्यात असायची मायेची उब गारठ्यात रक्षणारी,
गुरफटून घेताच गाढ झोप लागायची कुशी सारखी!
आता गोधडी जीर्ण झालीय,तरी जपतोय आठवण!
मन सैरभैर होत जेंव्हा जेंव्हा,शिरतो त्या गोधडीमधे,
मायेचा हात फिरतो  पाठीवरून,मिळते नवी उमेद!
लाखोंच्या आलिशान गादीवर नाही मिळत ते सुख,
मिळते जे माय च्या त्या ओबड धोबड गोधडीतुन !
                          ......प्रल्हाद दुधाळ .

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०१४

पाऊस स्मरणांचा!

पुन्हा कितीक दिवसांनी
रस्त्याने त्या गुजरलो  
ते दिसले झाड बहरले
अवचित तो कोसळला  
पाऊस तुझ्या स्मरणांचा!
त्या नजरेमधल्या भेटी
शब्दाविण बोललेली भाषा  
आठवले क्षण ते गहिरे  
नकळत गाली बरसला  
पाऊस तुझ्या स्मरणांचा!
सहवास किंचितसा होता
चालली मूकपणे ती वाट  
समंजस किती ती प्रीती
बरसला स्मरता विरहक्षण      
पाऊस तुझ्या स्मरणांचा!
       .......प्रल्हाद दुधाळ.