रविवार, २६ जून, २०११

उशीर.

उशीर.
आर्त विनवणी तुझी अचानक स्मरून गेली.
नकळत आसवांची सर एक झरून गेली.

नाकारले तुला वागणे माझे मतलबी होते,
अंतरात जखम ओली ती एक उरून गेली.

चोखाळतोय वाट आता मी काटाकुट्यांची,
मखमली चांदणी रात केव्हांच सरून गेली.

बेफाम बेलगाम जवानीची होती नशा ती,
अघोरी लालसा ती स्वप्ने कुस्करून गेली.

जगणे आता व्यर्थ आणि मरण अनर्थ आहे,
अचेतन देह सारा आकांक्षा मरून गेली.
प्रल्हाद दुधाळ.
........काही असे काही तसे!

सावित्री वंदना.

सावित्री वंदना.
अखंड सेवा वृत्तीने पावन झाली धरित्री,
सकल स्री जगताचे वंदन तुला सावित्री.
कर्मठांचे दगड झेलले तू,
घेतलास सेवेचा वसा तू,
उघडल्या मुलींच्या शाळा,
आम्हा शिक्षणदान दिले तू,
कार्याने पवित्र या पावन झाली धरित्री,
सकल स्री जगताचे वंदन तुला सावित्री.
अनाथ बालकांची आई तू,
गांजल्या विधवांची दाई तू,
साथ जोतीबांच्या कार्याला,
सावली पतीची झाली तू,
तुझ्यामुळॆ आम्ही सबला पावन झाली धरित्री,
सकल स्री जगताचे वंदन तुला सावित्री.
रूढी परंपरांना छेदले तू,
दलितांसाठी आयुष्य वेचले तू,
रूग्णांची करून सेवा,
अजरामर झालीस तू,
स्रीमुक्ती आद्य प्रणेती पावन झाली धरित्री,
सकल स्री जगताचे वंदन तुला सावित्री.
अपूर्ण कार्य ते करण्या तू,
नारी शोषण संपविण्या तू,
होऊन ये धगधगती ज्वाला,
जन्म नवा घे सावित्री तू,
क्रांतीच्या हाकेने त्या पावन झाली धरित्री,
सकल स्री जगताचे वंदन तुला सावित्री.
प्रल्हाद दुधाळ.
........काही असे काही तसे!

माज.

माज.
का करावी दुनियेची पर्वा दुनिया कावेबाज आहे.
स्वाभिमान ठेव जागा खरा तोच तुझा साज आहे.

का झिजतोस जगासाठी झूटी सारी दुनिया ही
सारीच फुकट्यांची फॊज येथे कष्टांची लाज आहे.

कशासाठी हवा आटापिटा कुणा हवी सत्त्य अहिंसा
प्रत्त्येकास वाटतो आपल्या मनगटाचा नाज आहे.

मिरवू नकोस जुनी ती महती संस्कृती परंपरांची
चालही वेश्येची आता येथे वाटते घरंदाज आहे.

भाषणे मोठी लोकशाहीची पेरणी आश्वासनांची
बोलणे एक कृती एक आला सत्तेचा माज आहे.
प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

बुधवार, २२ जून, २०११

स्मृती त्या.

स्मृती त्या.
वृक्ष तरू लता जेंव्हा या यॊवनात आल्या,
धुंद सुगंधी तुझ्या स्मृती त्या जीवंत झाल्या.

आली चॆत्रपालवी जेंव्हा फुलवीत सृष्टी,
ओघळले निर्झर जेंव्हा खळाळत्या कंठी,

गीतांच्या त्या सुंदर ओळी ओठांवरी आल्या,
धुंद सुगंधी तुझ्या स्मृती त्या जीवंत झाल्या.

भटकलो माळावरी स्वच्छंदी खूणेच्या मंदिरी,
चिंबवले जेव्हा बेछूट तुफानी या धारांनी,

स्पर्शाच्या बेभान त्या स्मृती अनावर झाल्या,
धुंद सुगंधी तुझ्या स्मृती त्या जीवंत झाल्या.

भुललो जेंव्हा त्या सॊंदर्यास या ताटव्याच्या,
मती गुंग झाली सुगंधाने त्या फुलांच्या.

काटयांनी अवचित जखमा बंबाळ केल्या,
धुंद सुगंधी तुझ्या स्मृती त्या जीवंत झाल्या.

प्रल्हाद दुधाळ.
....काही असे काही तसे!

बदल.

बदल.
उपकार केलेले सारे,विसराया लागले.
काय असे घडले?मला घाबराया लागले.

हा जवानीचा बहर,नजरेतली आव्हाने ती,
सगळेच कसे माझ्यावरी,मराया लागले.

उभारल्या कमानी,घातल्या होत्या पायघड्या,
बघताच त्यांना,सारे का कतराया लागले?

होऊनी दीनांचे कॆवारी,सत्तेवरी जे बॆसले,
येताच संधी,खिसे स्वत:चे भराया लागले.

लबाड लांडग्यांची फॊज,आता जमली तेथे,
फुटता बिंग,एकमेका सावराया लागले.
प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

कळेना.

कळेना.
होतो कोणत्या ठिकाणी,आलो कुठे कळेना,
कोणता मार्ग खरा,काहीच कसे कळेना.

होतो सरळमार्गी,कटू बोलणे कधी न आले,
अर्वाच्या भाषा ही,ओठांवर कशी कळेना.

आदर्श कुणाचा होतो,म्हणती परोपकारी,
पुकारतात आज तेच,चोर का कळेना.

नांदणार होती संगे,सातजन्मे सुखाने,
नजरेत त्याच तुझ्या,अंगार का कळेना.

कालचे ते जग खरे,की आजचे कळेना,
ढोंगी जगात या,मी गुन्हेगार का कळेना.
प्रल्हाद दुधाळ.
......काही असे काही तसे!

शनिवार, १८ जून, २०११

शेवट.

शेवट.
खेळात या जगाच्या
खेळणे होत गेलो.
जेथे तेथे जीवनी
बर्बाद होत गेलो.
होण्या फूल कळीचे
जगण्याचे सार्थक.
झालो न फुल येथे,
काटेच होत गेलो.
बनविण्या स्वर्ग तेथे,
रक्त माझे शिंपले.
झाला न स्वर्ग तेथे,
नरका मीच गेलो.
प्रल्हाद दुधाळ.
.....काही असे काही तसे!

स्मृती.

स्मृती.
आयुष्याच्या संध्याकाळी,
असाच एक निवांत क्षण,
जीर्ण शरीर आराम खुर्चीत पहुडलेलं,
डोळ्यावर चष्मा,हातात वर्तमानपत्र...
डोळे मिटता मिटता,चाळवल्या जातील,
गतकाळातील स्मृती...
काही सुखद...काही नकोशा...
त्यातच आठवेल,तुझा सुंदर चेहरा!
हळूच चाळवतील,हव्या हव्याशा,
त्या सुखद आठवणी...
उत्कट भेटी,जीवघेणी हुरहुर,
ओल्या शपथा,हळवे रूसवे फुगवे,
आठवेल तो ही क्षण...
वियोगाचा!
ओघळतील चष्म्याच्या काचांवर,
नकोशा स्मृतींचे अश्रू!
जाणवेल जीवघेणा,
एकटेपणा!
प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

ससा.

ससा.
आज मी जगाला, दिसतो असा आहे.
समजून घ्याल का कुणी? खरचं मी कसा आहे.
सांगायचे जगाला, मला खूप आहे,
ओठांवर शब्द आहे,पण कोरडा हा घसा आहे.
डावपेच येतात खूप, कपटनीतीही जाणतो,
सत्त्यमेव जयते परंतु,माझा घोषा आहे.
अन्यायाचा सूड घेण्या,स्फुरतात बाहू माझे,
ते अहिंसेचे व्रत माझे,परंतु वसा आहे.
जानती हे सारे,मनाने असूनी वाघ मी,
वॄत्तीने मात्र गरीब ससा आहे,ससा आहे.
प्रल्हाद दुधाळ.
..........काही असे काही तसे!

बुधवार, १५ जून, २०११

कळलेच नाही.

कळलेच नाही.
मोहात तुझ्या मी कसा फसलो कळलेच नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच नाही!
आयुष्य होते वाळवंट,
काटेकुटे सोबती माझे,
रानात काटेरी,फुले फुलली कळलेच नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच नाही!
नको ती मनाची बेचॆनी,
अन हुरहुर जीवघेणी,
विश्वात माझ्या,तू गुंतली कधी कळलेच नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच नाही!
वाटत होतं जगणं बिकट,
व्यर्थ भासत होती स्वप्ने,
स्वप्नांच्या दुनियेत,सत्त्य उतरले कळलेच नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच नाही!
प्रल्हाद दुधाळ.
.....काही असे काही तसे!

शनिवार, ११ जून, २०११

लक्षात घे!

लक्षात घे!

अत्तराच्या कुपीमधेच,
वेळी अवेळी कामाला यावे म्हणून...
विष ठेवण्याची तुझी कल्पना!
.........फारच आवडली!
फक्त आवडली नाही....
तुझी मनिषा....
जमलंच नाही जर,
सुगंध पसरवणे तर...
कालवायचे विष!
पण लक्षात घे.....
अगं स्नेहभरल्या नजरेने..
तिरस्कारही बदलतो प्रेमात!
मग तुझ्याकडील विषाचे...
अमृत व्हायचं का थांबणार आहे?
प्रल्हाद दुधाळ.

काय बिघड्णार?

काय बिघड्णार?

एकटाच मी असा
त्याने काय फरक पडणार?
जगरहाटी अशीच
तर वेगळे काय घडणार?
जातायेता रस्त्यावर
दिसतात पिंकदाण्या या,
माझ्या या पिचकारीने
आकाश का कोसळणार?
कचरयामधे सारा
बुडून गेला गाव,
मुठभर माझी भर,
याने काय बिघड्णार?
सगळ्यांनाच आता
कष्टाची वाटते लाज,
माझ्या इमानदारीने
काय नवे मिळणार?
विचाराने स्वार्थी
आता होणार आहे घात,
माणासाचा जन्म
लाजीरवाणा का ठरणार?
प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, १० जून, २०११

जगण्यास्तव.

जगण्यास्तव.
आता नका विचारू हो,माझी कुणी खुशाली!
स्वप्ने सारी पाहीली,मृगजळे की निघाली!

आलास तू रे जीवनी,आली नवी उभारी,
समजले मी मला,सगळ्यात भाग्यशाली!

तुझ्या भुलले रे स्वप्नांना,नवजीवनाच्या.
जाळून मला गेल्या,त्या क्रांतीच्या मशाली!

नव्हताच तू रे दोषी,का दोष तुला लाऊ,
माझेच दॆव खोटे,ही वेळ आज आली!

लुटतोय कोण येथे,कोणी देतोय गाळी,
जगण्यास्तव विकते,ओठांवरील लाली!

प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
.........काही असे काही तसे!

खेळ सावल्यांचा.

खेळ सावल्यांचा.


केसातल्या जुईला गंध यॊवनाचा,
आरक्त गाल तुझे की रंग गुलाबाचा!


डोळ्यातल्या लज्जेस,साज जिव्हाळ्याचा,
भाळी कुंकूम तुझ्या,की चांद पुनवेचा!


मॊनातल्या त्या स्मितास,अर्थ गुढतेचा,
नजरेतल्या तीरांना,का हार हा फुलांचा?


चालण्यातल्या लयीला,ताल ठुमक्याचा,
वास्तवातले हे भाव की खेळ सावल्यांचा?


प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
.......काही असे काही तसे!

बुधवार, ८ जून, २०११

मोती.

मोती.

दुर्मिळ मोती शोधण्याच्या उद्देशाने,
वाळूमधे शिंपली वेचलीत खूप!

त्या वेड्या वयातच समजलं एक सत्त्य,
सगळ्याच शिंपल्यात मोती नसतात,
आपल्याला भेटतात ती फक्त शिंपली!

कालपरत्वे.......
ते मोती शोधण्याचं वेड आणि वय निघून गेलं!

अनपेक्षितपणे,आज.........
हातात आली
दोन शिंपली
आणि हो........
त्यात मोतीसुद्धा आहेत,
तुझ्या तेजस्वी धुंद डोळ्यांचे!

प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
.........काही असे काही तसे!

रविवार, ५ जून, २०११

गमती गमतीत

गमती गमतीत.



एक गंमत सांगू तुला?
जगणं आहे सुंदरशी कला!



तुटेल एवढं ताणायचं नसतं,
उसवलेलं नातं विणायचं असतं!



एक गंमत सांगू तुला?
जगणं म्हणजे अधांतरी झूला!



धोक्यांनी डगमगायचं नसतं,
एकमेकांना सावरायचं असतं!



एक गंमत सांगू तुला?
जगणं असावं रंगमंच खुला!



मुखवट्यांना भुलायचं नसतं,
चेह-यांना ओळखायचं असतं!



एक गंमत सांगू तुला?
स्वत:तच बघ मला!



एकमेकातलं उणं बघायचं नसतं,
सूर जमवून जीवनगाणं गायचं असतं!



प्रल्हाद दुधाळ.
९४२३०१२०२०.
........काही असे काही तसे!