मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

कटू सत्य!

 कटू सत्य!
जिंवंतपणाचा या कसला तोरा?
मान्य, आहेस गडगंज नी गोरा!
अहंकाराने फुगवतो का छाती?
पेटतो जशा, फटाक्यांच्या वाती!
माणूस तू, अमरत्व तुज नाही,
उत्मात असा,नच कामाचा काही!
जीवन-मरण तुझे, घडीचा डाव,
कशास धरतो,ऐहीकाची हाव?
धनदौलत तुझी इथेच रहाते,
जेंव्हा देहाचे या,कलेवर होते!

     .....प्रल्हाद दुधाळ.

शनिवार, १८ एप्रिल, २०१५

झळा.

.....झळा.....
गारपिट अन अवकाळी पाणी ,
डोळ्यातुन अश्रूधारा बरसल्या...
उध्वस्त पिके,मेहनतीवर पाणी,
नभ थेंबातून झळा बरसल्या....!
अवघड झाले जगणे इथले,
उन्हात आशा आकांक्षा करपल्या...
चक्र निसर्गाचे फिरते उलटे,
नभ थेंबातुन झळा बरसल्या ....!
ग्लोबल वार्मिंग आणि प्रदूषण,
आकांक्षा मानवाच्या करपल्या...
निसर्ग कोपला, ऋतू बदलले,
नभ थेंबातुन झळा बरसल्या....!
आयुष्य आपले सुंदर ते होते,
नजरा वाईट तयास लागल्या ...
विरहात मी होरपळतो आता,
नभ थेंबातुन झळा बरसल्या ...!
         ........प्रल्हाद दुधाळ.
           
       

शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

जीवन.

.. जीवन..
सांज वा सकाळी
चिडचिड उगा
जीवनात त्रागा   
कशापायी?
अपेक्षे प्रमाणे
घडेना ते काही
हरकत नाही
थांब थोडे!
आहे जे सामोरे
आहेच की बरे
दु:खाचे डांगोरे
कशासाठी?
ओठांवर नको
तक्रारींचा पाढा
अशांतीचा घडा
ठरलेला!
असूदे कायम
वास्तवाचे भान
आनंदाची खाण
जीवनात!
क्षण छोटे मोठे  
करा रे साजरे
आनंदाने भरे
आयुष्य हे!

.....प्रल्हाद दुधाळ.

बुधवार, १५ एप्रिल, २०१५

आरसा.

आरसा.
गर्व हा अप्रतिम लावण्य माझे,
सौंदर्य कधी मम ढळलेच नाही....
कशास मी त्यात प्रतिबिंब पहावे?
आरशाला मी खरी कळलेच नाही ...
!!!

एकरूप तू अन मी इतुके होतो,
आसित्व वेगळे ते कळलेच नाही....
तुझ्याविना शोधते मला इथे तेथे,
आरशाला मी खरी कळलेच नाही ...!!!
                               
मुखवट्यांच्या जगात रहाते मी 
चेहरे खरे कधी दिसलेच नाही....
वावरते ठेवून ओठांवर हास्य ,
आरशाला मी खरी कळलेच नाही ....
!!!
                               
अबला म्हणती कुणी सबला म्हणे,
कष्ट कुणी जाणण्या घेतलेच नाही....
मर्जी राखत अजमावले मीपण,
आरशाला मी खरी कळलेच नाही....!!!
                               
सजते,रोज बाजार मांडते नवा ,
मन माझे कुणा समजलेच नाही .....
फसले पुन्हा त्या मुखवट्यास नव्या,
आरशाला मी खरी कळलेच नाही...!!!
                    .....प्रल्हाद दुधाळ.
मंगळवार, ७ एप्रिल, २०१५

मन.

मन.
नामस्मरणात
गुंतविता मन
आत्मसमाधान
मिळतसे!

सुख आणि दु:ख
मनाचेच खेळ
घालावा तो मेळ
विवेकाने!

जणांचे ऐकावे
मनाचे करावे
सुखाचे असावे  
जीवन हे!

विवेकी वागणे
चिंतन मनन
असावे ते मन
शांत सदा!
..........प्रल्हाद दुधाळ.


गुरुवार, २ एप्रिल, २०१५

देव अंतरात.

देव अंतरात.


बुवा आणि बाबा 

गल्लोगल्ली झाले 

बाजार मांडले 

अध्यात्माचे!

सत्संगास गर्दी 

किर्तन भजन 

अस्थिर ते मन 

माणसाचे!

बुवा बाबा तेथे 

खेळती जिवांशी 

अशांत मनांशी 

चाळा चाले!

शोधती सुखास 

मठ मंदिरात 

देव अंतरात 

कळेना हे!

…. प्रल्हाद दुधाळ.


कविता.

कविता.
बिघडलो आता
धन्य हे जीवन
लागले व्यसन 
कवितेचे!
काय ती सांगावी
कवितेची नशा
आनंदाची दिशा
जीवनाला!
नाद हा वेगळा
कविता कविता
रात्रदिन आता
तोच छंद.
नको आता काही
योगाभ्यास ध्यान
गुंतता हे मन
कवितेत!
…. प्रल्हाद दुधाळ.
Like ·