शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

नियतीचा गुलाम.

नियतीचा गुलाम.
स्वत:भोवतीच फिरणा-या अवनीवर
जेंव्हा मी फेकलो गेलो तेंव्हा......
लक्षात आलं ...इथे मी एकटाच नाही!
इथेही सगे सोयरे मित्र मॆत्रिणी सारे सारे आहेत!
चिटोरीभर पदवीवर जेव्हा चाकरी मिळेना तेव्हा...
घरच्यांनी घराबाहेरचा रस्ता दाखवला आणि ....
सांगीतलं एक कटू पण सत्त्य!
पाणी जेव्हा नाकापर्यंत येतं तेंव्हा-
पोट्च्या पिलालाही पायाखालीच घ्यावं लागतं... नाईलाजानं!
बागेमधे प्रेयसीने हातातला हात सोडऊन घेत
हळूच जमिनीवर आणलं....
नुसत्या प्रेमावर नाही जगता येत काही!
त्यासाठी लागतो पॆसा! एकवेळ प्रेम नसलं तरी चालतं!
महीनाभर मर मर कष्ट करून जेव्हा पाकीट भरलं तेव्हा...
बायकोनं बजावलं.......
तुमच्या घामावर हे नोटाचे कागद उगवले नसते तर...
.......तर... मी तुम्हाला कधीच स्विकारल नसतं!
.....वॆतागानं मी ओरड्लो......
अरे तू आहेस तरी कोण?
चारही दिशांनी आवाज आला..........
तू गुलाम आहेस!
नियतीचा गुलाम आहेस!
......प्रल्हाद दुधाळ.

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

होळी.

होळी.
साद माझी आर्ततेची ती वा-यावरी उडून गेली
प्रतिसाद नाही मिळाला समजुनी तु रूष्ट झाली.


कथा तुला कथण्याची ती शब्दाविणा राहून गेली
कल्पित एक कथा गुंफित तू मात्र निघून गेली.


होतीस तू बेपर्वा ना फिकिर कुणाची केली
मस्करी अंगाशी आली अन शपथ ती खरी झाली.


क्षणोक्षणी आठवण दाटे जगण्याची चव गेली
सारा डाव मोड्ण्या नियतीने शर्थ उगाची केली.


सहजीवनाची याद सुखाच्या खरेच कधी आली?
विरहाने कायमची जीवनाची माझ्या होळी झाली.
प्रल्हाद दुधाळ.
.....................काही असे काही तसे!

सखे.

सखे.
सखे साथ ही जन्मोजन्मीची
चुकलं माकलं सुधारून घे.

अनुभवातूनच येतं शहाणपण
पाऊल वाकडं सावरून घे.

वागण कधी नसतं वावगं
मागील कारणं जाणून घे.

शंका मनातली नाही बरी
मनातलं खरं विचारून घे.

तुझ्यासाठी मी माझ्यासाठी तू
जीवनातलं मर्म समजावून घे.
प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

गुलाम.

गुलाम.

संस्कार आणि परंपरांचे त्या
डोक्यावरती मोठे झाले ओझे
पश्चिमेच्या बेफाम वा-यात या
झिंगतोय आम्ही बेभान आहे.

आता फक्त येथे चालते भाषा
कोरड्या शुद्ध या व्यवहाराची
कशास नातीगोती ही सांभाळू
माणुसकी झाली बदनाम आहे.

वाहते ही आता उलटी गंगा
नवसहस्रकाचे वाण आहे
मनामनातली दरी वाढतेय
बाकी सगळ छान छान आहे.

उगवतीच्या सुर्या नेहमीच
सगळ्यांचा सदा सलाम आहे
किती करा वल्गना प्रगतीच्या
माणूस नियतीचा गुलाम आहे.

प्रल्हाद दुधाळ.
........काही असे काही तसे!

गाडा हा.

गाडा हा.

कुणापुढे आयुष्याचे
उभे ठाकले आव्हान
जगण्याच्या लढाईत
कोणी झाले गतप्राण.

काही जन्माला येताना
सम्रुद्धीचा ओठी प्याला
सर्व सुखे असुनी
रडण्यात जन्म गेला.

कोण जगे कशासाठी
ज्याचे त्याला ठावे नाही
मुर्दाडाचे जगण्याला
ध्येय्य वा दिशा नाही.

कोणी लोभी वा लोचट
वाकला कयम कणा
जन्माला यांना घालूनी
निर्मिकाने केला गुन्हा.

या भयाण जगामधे
कोणी महात्मा भेटतो
सा-या जगाचा तो गाडा
त्याच्या कर्माने रेटतो.

प्रल्हाद दुधाळ.
.........काही असे काही तसे.

इशारा!

इशारा!
आस्तित्व हे सांभाळ आता
बदलला रे काळ आता.

दुर्दॆवी फे-यांशी येथल्या
जोडली रे नाळ आता.

संपविण्या तुला येथुनी
शिजतेय ही डाळ आता.

सुंभ केव्हाच जळाला
हा पिळही जाळ आता.

ही वॆ-याशी फाजील दोस्ती
घालणार तो घोळ आता.

जरी सज्जनांची एकी
दुर्जना गळा माळ आता.

सावध जाणुन इशारा
मुखवट्यांना टाळ आता.

प्रल्हाद दुधाळ.
..........काही असे काही तसे!

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०१०

कधीतरी वेड्यागत!

कधीतरी वेड्यागत!
रात्रभर चांदणे मोजत जागायला हवं!
कधी पुन्हा अस वेड्यागत वागायला हवं!
लपाछपी विटी दांडू रंगला गोट्यांचा डाव,
खो खो लंगडीत बालपण शोधायला हवं!
एकदा तरी ती फेकावी पोक्तपणाची झूल,
चिंब पावसात मनसोक्त भिजायला हवं!
घडता काही मनासारख फोडावी किंकाळी,
सोडून लाज गडगडाटी हसायला हवं!
नको सदा पाप पुण्य जन्म मरणाची भिती,
आता तरी मस्त गात गाणे जगायला हवं!
प्रल्हाद दुधाळ.

सोमवार, ९ ऑगस्ट, २०१०

नशा.

नशा.
आजच्या घाईगर्दीत उद्याचा भरवसा आहे!
प्रत्येकाच्या मनात लपलेला एक ससा आहे!
मी कशाला माझा हा मार्ग असा वाकडा करावा?
सरळमार्गी चालण्याचा घेतला तो वसा आहे!
जीवन त्यांचे इतके का हे बापुड्वाणे आहे?
जगणे येथे खरे तर सुंदरसा जलसा आहे!
हपापल्या माणसांची अशी ही झुंबड उडाली येथे,
जगण्यास पुरेसा जरी मुठ्भर पसा आहे!
हरघडीला आव्हानांनी जगण्यास अर्थ आला,
क्षण प्रत्येक नव्याने जगण्यात ती नशा आहे!
प्रल्हाद दुधाळ.