सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

सल....

सल....
न बोलताही सल
कळाया पाहिजे
मनातले सारे
आकळाया पाहिजे

आत साठलेले
पोखरते हा देह
तुंबलेले ते आसू
गळाया पाहिजे

पाहताना मागे
छळे गंड आता
गर्वाचा चढा पारा
ढळाया पाहिजे

उभा हा जन्म गेला
तुझ्यामाझ्यावारी
कळले आता सारे
वळाया पाहिजे

रागालोभाच्या सीमा
करू आता पार  
पिळ हा सुंभासह
जळाया पाहिजे
   .... प्रल्हाद दुधाळ.


रविवार, २२ ऑक्टोबर, २०१७

बेगडी शुभेच्छा...

बेगडी शुभेच्छा....
( हलकेच घ्या)

शुभेच्छा दिल्या वा घेतल्या म्हणून
 नशीब मुळीच बदलत नाही
दिर्घायुष्याच्या दिल्या आशिर्वादाने
अमरत्वही कुणा लाभत नाही

शुभेच्छांचे शब्द जरी हे ओठात
पोटात वेगळच असू शकतं
आजकाल गोड गोड बोलण्यात
मनात जहरही असू शकतं

गुडी गुडीच्या नात्यांना जपायला
शुभेच्छांचं इंधनच येतं कामाला
बेगडी जमान्यात आजकालच्या
महत्व आहे फक्त ते दिखाव्याला

आभासी दुनियेत या आधुनिक
शुभेच्छेसाठीचे निमित्त शोधावे
जिभेवर करून साखरपेरणी
अभिष्टचिंतन करत राहावे

 सद्भावना खरचं असल्या तर
 अव्यक्तपणेही पोहचतातच
जाणीवा त्या समृद्ध असल्या तर
शुभेच्छा सन्मित्रा समजतातच

कळले जरी वळेल असे नाही
जगासारखे वागावेच लागते
मनात असो वा नसो ते तुमच्या
हार्दिक शुभेच्छा म्हणावे लागते
        ..... प्रल्हाद दुधाळ.

शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

आई...

आई...
कोंबड आरवायच्या आधीच 
तिने घेतलेली असायची 
डोक्यावर माळव्याची पाटी
चालत रहायची अनवाणी 
नसायची अंधाराची अथवा 
विचूकाट्याची भीती 
मनात एकच ध्यास 
दिवस वर येण्यापूर्वी 
पाटीतला भाजीपाला 
खपायलाच हवा... 
परत धा वाजता 
मजुरीवर पोचायला हवं... 
तिच्या त्या ढोर मेहनतीत 
तिने पेरली होती 
उज्वल भविष्याची स्वप्ने... 
आज ना उद्या या घामावर 
सुखाचे पीक नक्की जोमात बहरेल.....
कधीच ती दिसली नाही हतबल 
पण....
माहीत नाही तिची स्वप्ने 
पूर्णत्वाला गेली की नाही 
सुखदु:खात कायम स्मरते 
माझी सतत राबणारी आई! 
.... प्रल्हाद दुधाळ.

रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

आयुष्य...

आयुष्य...
नको आटवू उगा रक्त
तुझ्यासाठी तूच फक्त
जोड माणसे तू खूप
नकोच अपेक्षांची भूक
समोर आहे तसेच जग
प्रेमाने स्वत:कडे बघ
खूप आहे सुंदर जीवन
विचलू नको देवू  मन
घडते जे भल्यासाठी
नको विचारांची दाटी
फक्त तू चालत रहा
वाईटात चांगले पहा
शुध्द ठेव व्यवहार
आयुष्य सुंदर फार
    .... प्रल्हाद दुधाळ.