गुरुवार, २३ जून, २०१६

कारण ....

कारण ....

लोक शोधतात कसे 
मरण्याची कारणे 
कुठे कह्यात हे तुझ्या 
तारणे वा मारणे 
समजूत ही तुझी
शिल्पकार जीवनाचा 
काळ शिकवतो धडा 
कोण ना तो कुणाचा 
शत्रू सहा भोवती 
चोहोबाजूंनी घेरले 
सुरक्षीत असशी 
जर सत्कर्म पेरले 
अमरत्व नाही तुला 
नक्की तेथे जायचे 
सारे जर हे असे 
गुर्मीत का जगायचे 
व्हावे जीणे आपले 
कुणा खुशीचे कारण 
आयुष्य जीवलगांसाठी 
असो सदा तारण 
..... प्रल्हाद दुधाळ

शुक्रवार, १७ जून, २०१६

भास आभास

भास आभास

जिथे मिळाला स्नेहाळ मायेचा ओलावा
नकळत भावनेत वाहवत गेलो
माणसांची गर्दी भोवती उसळता
अंतरातुन मी तसा उधाणत गेलो

चेहरे न पाहीले ओळख जशी युगांची
संवादानेच  एकमेकां जाणत गेलो
सादेस प्रतिसाद मिळता तो पुरेसा
अंतरातुन मी तसा उधाणत गेलो

फुरसत  कुणाला ना कुणासाठी येथे
आभासी जगाला वास्तव मानत गेलो
लाट बेगडी चाहत्यांची शाब्दिक येता
अंतरातुन मी तसा उधाणत गेलो

खोटारडे मुखवटे कसे ओळखावे
ओझे  ते  मनी भावनांचे लादत गेलो
आभासी भास ते वास्तवात उतरता
अंतरातुन  मी तसा उधाणत गेलो
              प्रल्हाद दुधाळ

मंगळवार, १४ जून, २०१६

येशील?

येशील?
चोहीकडून अशी  कोंडी  झाली
तारण्यास नाही  कुणीच वाली
दिलासा आता तू देशील का रे
एकदा पावसा येशील का रे

अवकळा साऱ्या रानास आली
झुडूपेसुध्दा ती वठून गेली
संजीवनी तया देशील का रे
एकदा पावसा येशील का रे

कोरडे इथले  हे नदी नाले
प्राणीही तहानेने व्याकूळले
तृप्त तयाना करशील ना रे
एकदा पावसा येशील का रे
          ....प्रल्हाद दुधाळ

शुक्रवार, १० जून, २०१६

पावसा आता ....

पावसा ....
विश्वास तुझ्यावर ठेवला 
सार्थकी तो लावशील का रे 
पेरले मातीत ते रुजण्या
आता पावसा येशील का रे?

अवेळीच तुझे येणे जाणे 
वागणे सुधरेल का रे 
हवाहवासा वाटे जेंव्हा तू 
आता पावसा येशील का रे ?

तहानले हे जीव इथले 
तृप्त त्या करशील का रे 
नाचत गात त्या वाऱ्यासंगे 
आता पावसा येशील का रे ?

तोल राखण्या या धरणीचा 
साथ आता देशील का रे 
जगविण्या नवी वृक्षलता 
आता पावसा येशील का रे?
प्रल्हाद दुधाळ

गुरुवार, ९ जून, २०१६

मार

मार
जिंकलो तरीही
माझीच हार आहे
जिव्हारी हा माझ्या
झाला प्रहार आहे
लावला जीव ज्याना
दूर तेच गेले
गोडी गुलाबीची
भीती ती फार आहे
भूमिका याचकाची
जमली कधी ना
बुडले दिले ते
सारे उधार आहे
पिसाळती ते
आखडता हात घेता
दांभिकतेचा तो
होतो प्रचार आहे
भिडस्तपणा माझा
नडतो हमेशा
आतबट्टयाचाच
हा व्यवहार आहे
अन्यायापुढे हा
झुकतो मम माथा  
दाबून हे तोंड
बुक्क्यांचा मार आहे  
       प्रल्हाद दुधाळ   



रविवार, ५ जून, २०१६

पावसा ....

पावसा ....
नक्षत्रे कोरडी हक्काची
शोभते तुज असे का रे
लौकिकास काळिमा असे
हे पावसा येशील का रे ?

हाल प्राण्यांचे तुझ्याविना
मनातले ते सांग ना रे
अंत पाहणे नाही बरे
हे पावसा येशील का रे?

आनंद असुरी कसला
जीव जाळणे हे का खरे
सोडते धरा उष्ण श्वास
हे पावसा येशील का रे ?

रखरखता हा उन्हाळा
कोरडे हे जलस्रोत सारे
शांतवण्या तुज प्रार्थना
हे पावसा येशील का रे ?
...... प्रल्हाद दुधाळ

शुक्रवार, ३ जून, २०१६

पावसा येशील?

पावसा येशील?

तापलीय धरणी अती तप्त वारा इथे
ओसाडसे रान पाण्याचा थेंब नाही कुठे
तहानेली अर्धमेली कासाविस पाखरे
आता तरी धोधो पावसा येशील का रे?

परवड माणसांची घरदार सोडले
पाहीलेल्या स्वप्नानाही खोल खोल गाडले
चारा पाण्याविना तडफडती जनावरे   
आता तरी धोधो पावसा येशील का रे?

माणसाच्या त्या सुखापायी जंगलांचा नाश  
बदल्यात आता गळ्यात दुष्काळाचा फास
मान्य सारे चुकीसाठी माफी असूदे ना रे
आता तरी धोधो पावसा येशील का रे?
          प्रल्हाद  दुधाळ, पुणे.