शुक्रवार, २३ जुलै, २०१०

आषाढधारा.

आषाढधारा.
बरसल्या धुवांधार आषाढधारा!
करे मजला धुंद, हा थंडगार वारा!
ही बोचरी थंडी, सहन रे होईना,
ये ना जवळी तू मला सहारा!
न्हाऊन सारा निसर्ग ताजातवाना,
गारठून मोरानेही, मिट्ला पिसारा!
पहा तू इथे एक जादुच झाली,
नाचुन गातोय हा खळाळता झरा!
धुंदीत संगे नाचण्याची उर्मी मला,
मी एकटी येथे अन,तू तिथे बिचारा!
प्रल्हाद दुधाळ.
काही असे,काही तसे!

शनिवार, १७ जुलै, २०१०

मेळा.

मेळा.
पंढरीच्या वारी मधे
ठेका भजनाचा लागला.
कुणी भजे मोक्षासाठी
कुणी पोटासाठी चालला.

वॆष्णवांचा जमला मेळा
भेटेल त्यांना सावळा.
संतांसंगे किर्तन रंगे
मळा भक्तीचा फुलला.

बहरला उत्सव असा
भेटती भक्त उराभेटी.
मराठी मुलखाचा न्यारा
महामेळा हा रंगला.
प्रल्हाद दुधाळ.
...........काही असे काही तसे!

शुक्रवार, १६ जुलै, २०१०

नाती.

नाती.
अशी जगण्याची उर्मी देतात काही नाती.
मात्र जगणे नकोसे करतात काही नाती.
मुलखात परक्या आहे कोण कुणासाठी,
जुळती तरीही जिव्हाळ्याची काही नाती.
अचानक उभी ठाके मालिका संकटांची,
घट्ट मागे आधारास येती काही नाती.
कधी वागते कुणी जसे हाडवॆर आहे,
जगणे अवघड करती हे काही नाती.
माणुसकी नात्याने जुळती काही नाती,
रक्तापेक्षाही महान असती काही नाती.
प्रल्हाद दुधाळ.
.......काही असे काही तसे!

गुरुवार, १५ जुलै, २०१०

चुरगळले स्वप्न.

चुरगळले स्वप्न.
जगताना इथे केव्हाच हे कळले होते.
भरजरी वस्र चारित्र्याचे मळले होते.
ती जवानीची मस्ती, होते उनाड वय ते,
उमगले हे जेव्हा,स्वप्न चुरगळले होते.
ठाऊक नाही कशी फितुरी मनाने केली,
क्षणभंगुर सुखासाठी कशी चळले होते.
जगणे हे मरणाहुनी भयंकर झाले,
कळले हे सारे पण कुठे वळले होते.
प्रल्हाद दुधाळ.

जागर.

जागर.
हाती न धरले शस्र, केल्या तरी लढाया.
पराक्रमाने त्यांच्या शत्रू लागे लड्खडाया.
तो जोश अनोखा,माणसे जिध्दीची होती,
खंबीर मनाने झाल्या तेव्हा यशस्वी चढाया.
नाकर्तेपणा भिनला आता,भय मनी आहे,
माजता दहशत नेतेच लागती रडाया.
करती ते वल्गना आमुलाग्र बदलांच्या,
आचरणात न येती, खोट्या त्या बढाया.
जनताजनार्दना आता जागवी स्वत:ला,
ललकार असे की शत्रु लागे गडबडाया.
प्रल्हाद दुधाळ.

मेवा.

मेवा.
आयुष्याच्या जमाखर्चाचा,
घालतोय मेळ!
ताळेबंद हा मांडण्याची,
हीच खरी वेळ!
भेटल्या माणसांनी ती
घातली अशी कोडी!
फार तेथली सोंगे अन
रात्र फक्त थोडी!
संकटांना जेव्हा केव्हा
जीवनात भेटलो!
समजून आव्हान नवे
पुन्हा मी पेटलो!
दिवस रोजचा जाणीवेने
जगतो हा नवा!
अनुभवांचा रोज चाखतो
तो कडूगोड मेवा!
प्रल्हाद दुधाळ

सवय.

सवय.
असुनी मर्द हे आम्ही,सोसण्याची सवय झालीय!
मुर्दाडासारखे जगण्याची,आता सवय झालीय!
पेटवा दंगे मारा कुणीही,जाळा या खुशाल वस्त्या,
रक्तबंबाळ जीवनाची,आता सवय झालीय!
करा तुम्ही नेहमीच्याच आश्वासनांची बरसात,
खोट्या स्वप्नातच जगायची,आता सवय झालीय!
नाही मिळाले तरी,बसणार गप्प गुमान आम्ही,
उपाशी रहायची काहीशी,आता सवय झालीय!
भरा तुम्ही आपली गोदामे,करणार कष्ट आम्ही,
जीवंतपणीच्या यातनांची,आता सवय झालीय!
प्रल्हाद दुधाळ.
....काही असे काही तसे!

शनिवार, ३ जुलै, २०१०

तुझ्याविना…… आई ……

तुझ्याविना…… आई ……

वात्सल्य करूणा माया ममता,
ह्र्दयात भरली ठाई ठाई,
त्यागास त्या तव लेकरांस्तव,
वर्णावयास योग्य शब्द नाही!
तव कष्टास त्या सीमा नव्ह्ती,
संकटांची मालिका ती भवती,
हसतमुखी गाईली अंगाई,
कसे ग आम्ही होऊ उतराई!
सुसंस्काराची ती दिली शिदोरी,
स्वाभिमानाची बळकट दोरी,
आशिर्वाद अन तुझी पुण्याई,
चाललो आड्वाट-वनराई!
जात्यावरली ती ओवी आठवे,
स्वाभिमानाची ती ज्योत आठवे,
आहे येथेच भास असा होई,
तुझ्याविना हे व्यर्थ जीणे आई!

प्रल्हाद दुधाळ.
५/९ रूणवाल पार्क,
गुलटेकडी पुणे ३७.
९४२३०१२०२०.

आव्हान.

आव्हान.
वाटतय सगळ आहे आयुष्य सुरळीत तरी,
कधी गाफिल उगा राहू नयेच माणसान!
कधी अचानक गडगडाटी मुसळधार पाऊस,
गोठवणारी थंडी,जाळणार कडाक्याच उन,
घोंगावणार वादळ, भयानक त्सुनामी,
वेळ कधीच सांगुन येत नाही,
एक घरट जरूर उभाराव माणसान!
भले भले कोसळतात,जगण्याला कंटाळतात,
गोंधळात या काही संधिसाधू भेटतात,
एवढ्या तेव्ह्ढ्यान असं निराश नसतं व्हायचं,
प्रत्येक क्षण नवं आव्हान समजून,
आनंदानं सामोरं जात रहाव माणसानं!
अकल्पित अपेक्षाभंग,जिव्हारी घाव,
संकटामागुन संकटं,जुलूम जबरदस्ती,
धर्मांध दंगली,माथेफिरूंची मनमानी,
विश्वासानं अशावेळी मान टेकता येईल,
एकतरी असा आधार जोडावा माणसानं!
वाटतय सगळ आहे आयुष्य सुरळीत तरी,
कधी गाफिल उगा राहू नयेच माणसान!
प्रल्हाद दुधाळ.

शर्यत.

शर्यत.

माणसांच्या गर्दित या लपला एक सैतान!
स्वत:कडे पहाण्याचे हरवले आता भान!

कुणासाठी कसे आता घालायाचे साकडे?
पैशासाठी विकला जातो खुला आत्मसन्मान!

नाती गोती व्यर्थ येथे दुरावली सारी मने,
आत्मकेंद्री जगात, उच्च झाले रहाणीमान!

बंगला माडी हाती गाडी ऐश्वर्याची धुन्दी,
मतलाबी तो हरेकजण,मस्ती झाली शान!

शर्यत चालू आहे आतमधल्या सैतानाशी,
धकाधकिच्या आयुष्यात मनशांती गहाण!

प्रल्हाद दुधाळ.

बिघडली लय.

बिघडली लय.

सुंदरशा जगण्याचे कसे वाटले रे भय!
असे हे संपण्याचे, होते कुठे तुझे वय?

जिंकण्यासाठी पुढे सगळे आयुष्य ते होते,
कसा न पचविला,एक छोटा हा पराजय!

असा-तसा हा घातकी,जेंव्हा निर्णय घेतला,
आई-बाबांच्या कष्टांची कशी आली नाही सय?

पराभवाने या साध्या,कसा खचून तू गेला?
कसा पाषाण ह्र्दयी,बिघडवली ती लय!

तडजोडीला आयुष्यात या जगणे म्हणती,
आली नव्हती रे येथे, जगबुडी वा प्रलय!

प्रल्हाद दुधाळ.

माझ्यासाठी!

माझ्यासाठी!

प्रेम जिव्हाळा नाती खोटी!
जगणे माझे माझ्यासाठी!
सेवा धर्म नावापुरता,
खटाटोप हा सत्तेसाठी!
जगणे माझे माझ्यासाठी!
निती अनिती फुका गप्पा,
कसरत सारी खुर्चीपोटी!
जगणे माझे माझ्यासाठी!
शिक्षण संस्कार बेगडी,
सारे इथे दिखाव्यासाठी!
जगणे माझे माझ्यासाठी!
येता जाता त्या गप्पा मोठ्या,
देखावा अहंकारापोटी!
जगणे माझे माझ्यासाठी!
कोण कुणाचा साथ खोटी,
उरते काय येथे शेवटी!
तरी.......
जगणे माझे माझ्यासाठी!

प्रल्हाद दुधाळ.

गुंता.

गुंता.

हसलो अती खुशीने भरले डोळ्यात पाणी!
दु:खातल्या वेदनांनी भरले डोळ्यात पाणी!

तेथल्या गांजल्या जिवांचे हाल हे अतोनात,
पाहता निराश डोळे भरले डोळ्यात पाणी!

शिखरावरूनी यशाच्या डोकावले पायथ्याला,
वळता नजर खाली भरले डोळ्यात पाणी!

हसलो खिदळलो महफिलीत त्या नाचलो,
मस्तीत डोलता नाचता भरले डोळ्यात पाणी!

आठवणींचा हा गुंता सुटता कसा सुटेना,
मुखवटा तो गळाला भरले डोळ्यात पाणी!

प्रल्हाद दुधाळ.

कायदा!

कायदा!
व्यवहारी बाजारात पाह्यला ना फायदा!
करंटा मी,पाळला न एकही वायदा!

सन्मार्ग जयाला मानीत होतो तो न तसा,
मार्ग सरळ माझा ठरला तो बेकायदा!

मिळविले ग्यान ते कुचकामी आहे इथे,
या जगाची तत्वे,आहे वेगळीच संपदा!

यशाचे गणित ते माझ्यास्तव होते साधे,
अपयशाचा कलंक लागला माथी सदा!

शिकलो आता मी वावगी ही भाषा येथली,
म्हणती आता पाळतो येथला कायदा!
प्रल्हाद दुधाळ.