शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६

मायमराठी...

मायमराठी...
स्तुती मराठीची
भाषेच्या या दिनी
एरवी मराठी
दिसे दीनवाणी....
आजकाल लाज
आईच्या भाषेची
गोड लागे बोली
सदा इंग्रजीची...
मराठी आपली
ओळख मातीची
आठवा ती भाषा  
बोबड्या बोलीची...
परक्या भाषेत
मिळवावे ज्ञान
माय मराठीचे
परी ठेवा भान...
बोलावे हसावे
गावे मराठीत
मराठी माणसा
बोल मराठीत...
  ...प्रल्हाद दुधाळ


मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

ऋतूराज.

ऋतूराज.

बोचरासा शिशिर संपला
कूहू कूहू चा नाद गुंजला
सुगंधीत आसमंत जाहला
ऋतूराज हा वसंत आला

स्वागतास या ऋतूराजाच्या
सृष्टी सारी बहरून आली
निसर्गदेवतेने कमाल केली
वठली फांदी हिरवी झाली

झाला शीतल तापट वारा
आम्रवृक्षा लगडल्या मोहरा
उतरला तपमानाचाही पारा
वसंतोत्सवाच्या छेडीत तारा
  

चोहोकडे रंगोत्सवाची होली
चैत्रगौरीचे आराधना झाली
गावदेवांची पालखी निघाली
लगबग सणासुदींची झाली

वसंत फुलताना पानोपानी
स्फुरती ह्रदयी मंगलगाणी
स्मरता प्रियेची मंजूळ वाणी
सांज होते मज उदासवाणी
    .....प्रल्हाद दुधाळ.